राज्यातील गुन्हेगारीत वाढ, पण छडा लावण्याचे प्रमाण वाढले
पणजी,दि.३१(प्रतिनिधी)
राज्यात गतवर्षीच्या तुलनेत डिसेंबरपर्यंत विविध गुन्हेगारी प्रकरणांत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गुन्हेगारीत वाढ झाली असली तरी या गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. राज्यात गुन्हेच घडणार नाहीत, यासाठीचे नियोजन करून काम करण्याचे लक्ष्य पोलिस खाते नव्या वर्षांत ठेवणार आहे.
पोलिसांकडून जारी झालेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये २०९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १८४४ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यात २९ खून, २९ खूनाचे प्रयत्न, १०६ बलात्कार, ३ दरोडे, १३ चोरी प्रकरणांचा समावेश आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण ८७.९८ टक्के आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने २०२४ मध्ये २७४ किलो ड्रग्स जप्त केले आहेत, ज्याची किंमत बाजारात ९.८१ कोटी रूपये होते. या प्रकरणी १५९ गुन्हे नोंद करून १८८ जणांना अटक करण्यात आली. राज्यात २०२४ मध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३.३ लाख वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २०.५३ कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ३२ हजार ५३६ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारस वाहतुक खात्याकडे करण्यात आल्याचेही गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.