
काणकोणचा श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर महापती जत्रोत्सव आणि देवस्थानचा दैवी चमत्कार शिर्षारान्नी उत्सवनिमित्त
कण्वमुनींच्या वास्तवाने पुनीत झालेली भूमी म्हणजे काणकोण. पार्वतीच्या विरहाने व्याकुळ झालेले श्री शंकर तिला शोधत शोधत ज्यावेळी इथे आले, त्यावेळी त्यांची स्थिती क्रौंच पक्ष्याप्रमाणे झाली.
याच भागात त्या दोघांची एकमेकांशी भेट घडून अंति त्यांचे मधुर मीलन झाले म्हणून हे क्रौंचेद क्षेत्र. कण्वपुरम व क्रौंचेद क्षेत्र
असा खास नामोल्लेख या भागाचा केला जातो व श्री अडवट सिंहासनाधिश्वर महापती काणकोण अशा बिरुदावलीने येथील श्री मल्लिकार्जुन देवाचा सन्मान केला जातो. श्रीस्थळ गावात हे श्री मल्लिकार्जुन देवाचे प्राचीन मंदिर आहे. देवालयाचा जीर्णोद्धार शके १७०० मध्ये करण्यात आल्याचा उल्लेख देवालयाच्या घुमटीवरील शिलालेखात आहे तर दुसरा जीर्णोद्वार अलीकडेच २००७ मध्ये करण्यात आला.
दसऱ्याच्या उत्सवात सीमोल्लंघनप्रसंगी पुरातन काळापासून शमिपत्र नावाचा जो एक लेख या देवस्थानात वाचला जातो. त्यात काणकोणच्या नावाच्या संदर्भात कण्वपुरम् क्रौंचेद क्षेत्र, क्रौंचपुर अडवट हे प्राचीन नामनिर्देश येतात. देवालय डोंगरांच्या घळीमध्ये असल्याने हा सर्व परिसर विलोभनीय सृष्टीसौदर्याने नटलेला आहे. त्याला छानदार दगडी तोरणाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. एखादा नवखा मनुष्य जेव्हा श्रीस्थळात प्रवेश करतो, तेव्हा येथील वातावरणात व्यापून राहिलेली निःशब्द शांतता आणि समोरचे धुसर निळे डोंगर पाहून तो मोहीत होतो.
देवालयाची वास्तु दुरुन बघितली असता नजरेत भरत नाही; परंतु आतील चौकाच्या लाकडी स्तंभावरील शिल्प प्रेक्षणीय आहे. स्तंभावरील कोरीव चित्रांचे काम करण्यासाठी दक्षिण भारतातील कारागिरांना पाचारण करण्यात आले होते. देवालयाचा भोगमंडप अथवा चौक सहा खांबांचा आहे. प्रवेशद्वाराजवळ आक्रमक घोडेस्वारांचे शिल्प साकारले आहे. महाद्वाराजवळ दोन्ही बाजूला वेगवेगळे भावमुद्रा असलेले दोन हती आले आहेत. तिथेच बाजूला काळभैरव व दुसऱ्या बाजूला वीरभद्रांची पाषाणी मूर्ती बसविण्यात आली आहे. ओरिसातील पारंपरिक कलाकारांनी खास कापडावर चित्रीत केलेले शिवपुराण चौकावरील दोन्ही बाजूंनी सजविले आहे.
अवतार पुरुष
श्रीस्थळातील दैवतांमध्ये अवतार देवांचे माहात्म्य फार मोठे आहे. त्यांची ठिकाणे तीन आहेत. त्यांना घरवई असे म्हणतात. ती अशी १. आसाळी २. खालवडे ३. मैथल भाटपाल. अवतार पुरुषाच्या तीन अश्वारूढ मूर्ती असून इतर परिवार देवताही त्यांच्यासमवेत आहेत.
त्या सर्व रंगीत चिरे (लुगडी) वेष्टिलेल्या रंगीत वाटोळ्या लाकडी खांबावर बसविलेल्या आहेत. त्यांना तरंगे म्हणतात. तरंगे एकूण सहा असून त्यात अश्वारूढ मुर्तींच्या तीन तरंगांचा अंतर्भाव होतो. इतर तरंगे नुसती कळसांची आहेत व तीन (पिल्लकुच्चे) निराकार आहेत.
पौष पौर्णिमेच्या रात्री अवतार पुरुषांची तरंगे त्यांच्या तिन्ही स्थानांतून अवसर येऊन निघतात व श्रीस्थळात येऊन एकमेकांना
भेटतात. अवसरास अवतार म्हणतात. भाविक लोक त्या त्या ठिकाणी जाऊन अवतार पुरूषाचा कौल घेतात. तरंगे सांभाळणाऱ्या अर्चकांचे अभिधान भक्त अथवा भगत आहे. या सर्व तरंगांचे जे विभाग आहेत, त्यांना मेळ म्हणतात. ते सर्व वर सांगितल्याप्रमाणे पौष वद्य प्रतिपदेचे दिवशी श्रीस्थळात जमतात. तेथे त्याचदिवशी सकाळी त्यांना अवसर येतो. अवसरास अथवा अवतारास निघण्यापूर्वी तरंगे धारण करणारे अर्चक अथवा गड़े स्नान करून स्वच्छ धोतर नेसून देवालयात जातात. सर्वांगास गंध लेपून देवाची प्रार्थना करतात. तत्पूर्वी मंदिराच्या राजांगणात तरंगे आणून उभी केलेली असतात. गडे देवाची प्रार्थना करून तरंगे सांभाळतात. प्रार्थनेसाठी देवळात जमलेले वांगडी गड्यांना बाधा होऊ नये म्हणून देवाला सांगणी करतात. ही सांगणी अवतार विधी होतो तेव्हा करण्यात येतात. नंतर ढोल आणि जघांटा
यांच्या आवाजात गड्यांना अवसराचे आवाहन करण्यात येते. यावेळी गड्यांमध्ये असलेला भगत तरंगासमोर नंगी तलवार धरून उभा असतो. त्याच्याही अंगात अवसर येतो. गड्यांच्या अंगात अवसर येऊन तरंगे हलू लागली की भगत त्यांच्यासमोर तलवार फिरवतो. हा प्रकार प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा असा आहे. अवसाराचा परमोच्च कळस झाला की गडे तरंगे घेऊन धावतात. ते देवळात जाऊन चौकात निश्चेष्ट पडतात. कौल घेण्यासाठी महाजन आणि भक्तगण तरंगाभोवती गर्दी करतात. त्यानंतर तरंगाचे मेळ काणकोण महालाबाहेर म्हणजे शिवेश्वर महालात (कारवार) देवाचे कुळावी महाजन विखूरलेले आहेत. त्यांना दर्शन कौल देण्यासाठी जातात. तिथे त्यांचे सुमारे दोन महिने वास्तव्य असते. कारवारात वरची मकेरी, खालची मकेरी, चेडिये, किन्नर व खारगे असे एकूण पाच अवतार होऊन भाविकांना कौल दिला जातो.
त्यांच्या घरी परंपरेनुसार कौलप्रसाद दिला जातो. तळ्या घेतल्या जातात. हे कार्य फाल्गुन शुद्ध षष्ठीपर्यंत चालू असते. शिवेश्वराहून आल्यानंतर काणकोण तालुक्यातील प्रत्येक विभागात अवसर येऊन देवाच्या तरंगाची पूजा करण्यात येते. काणकोणात करणको खालवडे, श्रीस्थळ, किंदळे, बाबरे, पाटणे, भगतामठ, आगोंद येथे अवतार होतात.
षष्ठीच्या दिवशी अखेरच्या अवसराने उत्सवाची सांगता होते. यावेळी भोवर काढण्यात येते. म्हणजे भक्तगण देवाची तरंगे घेऊन ती नाचवीत देवालयाला पाच प्रदक्षिणा काढतात. यावेळी दोघेजण दांडपट्टे घेऊन नाचतात, त्यांना वावडप असेही म्हणतात. भोवर जाताना कोणीही पादत्राणे घातलेली व्यक्ती तरंगे घेतलेल्या लोकांच्या नजरेस पडली की लगेच गड्यांच्या अंगी अवसर येऊन ते खाली कोसळतात. त्यानंतर त्याला देवळात नेऊन तीर्थ शिंपडून शुद्धीवर आणले जाते. अशी घटना घडू नये म्हणून फारच दक्षता घेण्यात येते. यासाठी पादत्राणे घालून देवळानजीक जाण्यास सक्त मनाई असते. शिमग्याच्या जत्रोत्सवानिमित्त दर दोन वर्षांनी एकदा शिर्षारान्नी व वीरामेळ हे दैवी चमत्कारांचे गूढ वलय असलेले उत्सव सादर केले जातात.
शिर्षारानी उत्सव
शिर्षारान्नी हा शब्द शिषरांधनी या शब्दाचा अपभ्रंश असावा. तीन शिरांची रांधण (चूल) करून त्यावर रांधणे (स्वयंपाक करणे) अशा अर्थावरून या शब्दाची उत्पत्ती असावी, षष्ठीच्या दिवशी अखेरच्या अवसराच्या वेळी हा प्रकार सादर करतात.
भोवर, तुळाभार आदी धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सायंकाळी अडीच-तीनच्या सुमारास या उत्सवाला सुरुवात होते. ढोल व जंघाट
या विशिष्ट वाद्यांच्या तालावर देवांती सहा तरंगे, एक टका व श्रींची छत्री घेऊन वेळीप लोक देवळाच्या राजांगणात येतात. काही वेळाने ठरावीक गडे व भगत देवालयाच्या चौकावर देवाला गाऱ्हाणे घातल्यावर देवालयाच्या राजांगणात येतात. त्यांच्या अंगावर चंदनाचा लेप असतो. गडे तरंगाचा ताबा घेतात. या वेळी देवाची सहाही तरंगे कोणी न धरता आपोआपच उभी राहतात त्यावर तीन ठरावीक गड्यांच्या डाव्या दंडावर टोकदार सळीने टोचले
जाते. त्याला गरा म्हणतात. नंतर त्या व्यक्तींना झोपवण्यात येऊन तिन्ही व्यक्तींच्या डोक्याची चूल करण्यात येते. त्यावर मातीचे भांडे ठेवतात. भांड्यात जवळजवळ अर्धा किलो तांदुळ घालून शिसवीच्या लाकडाचे तुकडे पेटविण्यात येतात. दरम्यान भगत तरंगांना प्रदक्षिणा घालतात. तरंगांवर व टक्क्यावर भगतांकडून तांदूळ मारण्यात येतात. गड्यांच्या अंगात अवसर येतो. ढोल व जघांट ही वाद्ये भयानकरित्या वाजतात. गड्यांना अवसर आल्यानंतर अकस्मात भगतांपैकी एकाच्या अंगात अवसर येऊन तो दाढेत सुपारी घेऊन खाली बसतो. दुसरा भगत त्याच्या डोक्यावर धारदार खड़ग धरून मोठा दंडुका मोठ्याने मारतो. डोक्यातून रक्त येते. ते शिजत ठेवलेल्या तांदुळात कालवतात व भात आजूबाजूला शिंपडतात. लोकांची पळापळ सुरू होते, कारण हा भात अंगावर पडू नये, अशी लोकांची श्रद्धा असते. अवसर अंगात असतानाच गडे, तरंगे व टक्क्यासह कौल देण्याच्या जागेवर पळत जातात. त्यानंतर कौल देण्यात येतो.
कौल देण्याचे काम रात्रीपर्यंत चालू असते. त्याला विशिष्ट भाविक लोकांची मोठी गर्दी असते. शिर्षारान्नी उत्सवासंबंधी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की प्राचीनकाळी विशिष्ट ठिकाणी जाऊन मानवांची शिरे धडावेगळी करून आणली जात असत. उत्सव संपल्यानंतर पुन्हा शिरे धडाला लावली जात, परंतु एकदा शिरांची व धडांची अदलाबदल झाल्याने ती न साधता त्या व्यक्तीचे शिळेमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून शिरे धडावेगळी करण्याचा विधी बंद करण्यात आला. शिर्षारान्नी उत्सवाला गोव्यातून तसेच अन्य राज्यांतील भाविक श्रध्देने उपस्थित असतात.
- रत्नाकर विठ्ठल देसाई
आगोंद – काणकोण महाजन