सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेला प्रचंड बाधा
पणजी,दि.१२(प्रतिनिधी)
राज्यात गेल्या २०१२ पासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या राजवटीत सरकारी नोकऱ्या विकत घेण्याच्या नावाखाली शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारी प्रकरणे एकामागोमाग एक उघडकीस येत आहेत. पक्षाशी तसेच पक्षाच्या नेत्यांशी संबंधीत लोकांचा ह्यात सहभाग आढळून येत असल्यामुळे सरकार आणि पक्षासाठी ही फार मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
चौथी महिला अटकेत
नोकऱ्यांसाठी व्यवहार करण्याचा आरोप असलेले श्रृती प्रभूगांवकर ही आणखी एक महिला पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. फोंडा पोलिसांनी तीला अटक केली आहे. ही महिला भाजप युवा मोर्चात यापूर्वी काम करत होती,अशी माहिती समोर आली आहे. या महिलेने सुमारे दीड कोटी रूपयांना लोकांना गंडवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वास्कोतील एका महिलेला सुमारे ४ लाख रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक झालेले गोविंद मांजरेकर हे देखील मुरगांव तालुक्यातील भाजपच्या आमदाराचे खास कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. आता पक्षाशी संबंधीत लोकांना अटक होत असल्यामुळे पक्ष आणि सरकारसाठीही ही मोठी अडचण ठरू लागली आहे.
भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही- विजय सरदेसाई
भाजप सरकारचे एका पाठोपाठ एक कारनामे उघड होत आहेत. हे चित्र पाहील्यावर भाजपला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. राज्यपाल महोदयांनी ताबडतोब यासंबंधीचा अहवाल केंद्राला पाठवून हे सरकार बरखास्त करावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमित पाटकर आक्रमक
नोकर भरती घोटाळ्याबाबत काँग्रेस पक्षाने काही महत्वाचे बनावट दस्तएवज उघड केल्यानंतर सरकारातील एक मंत्री बरेच अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थनार्थ सत्ताधारी आणि विरोधकांतील आमदारांचीही परेड सुरू केली आहे. मुळात या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,अशी मागणी केली असता आणि कुणावरही थेट ठपका न ठेवता चोराच्या मनात चांदणे या उक्तीनुसार हे मंत्री करत असल्याची धडपड पाहता त्यांनी स्वतःचाच पोलखोल केल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला. यासंबंधी सविस्तर तक्रार पोलिस महासंचालकांकडे दाखल केली असून या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुळ भाजपवासी नाराज
सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते पाहील्यानंतर कष्टाने आणि मेहनतीने उभारलेला तो हाच भाजप पक्ष आहे काय, असा विचार मनात येतो,अशी प्रतिक्रिया काही मुळ भाजप कार्यकर्त्यांनी केला. पक्षनिष्ठा आणि नैतिकता ही भाजपची ओळख बनली होती. ही ओळख बदलून आता पक्ष बदनाम होत आहे हे पाहील्यावर बरेच दुःख होते,अशी प्रतिक्रिया काहीजणांनी व्यक्त केली. मुळ भाजपवाल्यांनी आता पुढे येऊन हे सगळे थांबवण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.