देव सांभाळा, गाव सांभाळेल

देवस्थाने ही गावच्या अस्तित्वाची नाळ आहे. ही नाळ जपून ठेवण्याचे आव्हानात्मक काम देवस्थान कारभाऱ्यांना करावे लागेल.

राज्यातील पोर्तुगीजपूर्वकालापासून कार्यन्वित असलेल्या कोमुनिदाद आणि देवस्थान संस्था, तसेच पोर्तुगीज काळात भर पडलेल्या चर्चसंस्था. या तीन संस्थांच्या खांबावर आपल्या गोव्याचा डोलारा उभा आहे.
राज्यात मागील महिन्यात कोमुनिदाद संस्थांच्या, तर काल ९ फेब्रुवारी रोजी देवस्थान संस्थांच्या नव्या कारभाऱ्यांच्या निवडणूका पार पडल्या. या दोन्हीसह चर्चसंस्थांचे गोव्यासाठी फार मोठे महत्त्व आहे. एरवी आपण देवाकडे आम्हाला सांभाळण्याची प्रार्थना करतो, परंतु आजच्या घडीला आपल्या गोव्याला सांभाळण्याची जबाबदारी या तिन्ही संस्थांच्या कारभाऱ्यांवर आहे. आम्ही देवांना सांभाळले तरच देव आम्हाला सांभाळणार आहे. देव सांभाळल्यानंतर आपोआप आमचे गाव सांभाळले जाणार आहेत.
आपल्याकडे गोव्यात या देवस्थानांची स्थापना जात, ज्ञाती केंद्रित रचनेनुसार झाली आहे. गावची संसाधने, जमिनींची मालकी देवस्थानांकडे आणि त्याचे मालक म्हणजेच महाजन मंडळी. प्रत्येक ज्ञातीने आपले स्वतंत्र देवस्थान स्थापन करून आपली वेगळी ओळख जपली आहे. आजच्या घडीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल अनेक देवस्थानांच्या कारभारात होते. सहाजिकच अशा देवस्थानांवर आपली हुकूमत गाजवण्यासाठी महाजनांतच स्पर्धा होणे स्वाभाविक आहे.
देवस्थानांचा कारभार हा प्रामुख्याने बारा बलुतेदारांच्या रचनेतून चालतो. पूर्वापारपासून देवस्थानांच्या महाजनांनी या रचनेनुसार बारा बलुतेदारांना गावात आणून त्यांना सेवा वाटून दिल्या. त्या बदल्यात त्यांना देवस्थानच्या जमिनीत राहण्यासाठी घर आणि उदरनिर्वाहासाठी थोडी शेती दिली. कालांतराने परिस्थिती बदलली, शिक्षणाचा प्रसार झाला, सामाजिक चळवळीतून विचारांची क्रांती सुरू झाली आणि हळूहळू ही बारा बलुतेदारांची घडी विस्कटण्यास सुरुवात झाली.
देवस्थानांवर वर्चस्व गाजवणाऱ्या महाजनांचा आपल्या मर्जीप्रमाणेच इतर सेवेकऱ्यांनी वागावे हा अट्टाहास आणि शिक्षण, सामाजिक जाणीवेतून अन्याय सहन न करण्याची सेवेकरी घटकांची मानसिकता यातून तंटे, वाद, विवाद सुरू झाले. एवढेच नव्हे तर देवस्थानांच्या कारभारातील मान-सन्मानावरूनही दावे-प्रतिदावे सुरू झाले आणि त्यातून अनेक देवस्थानांचे देवपण बिघडून ही देवस्थाने धार्मिक परंपरेतून विस्कळीत व्हायला सुरुवात झाली आहे. अर्थातच या सगळ्या गोष्टीत जो प्रभावी गट आहे, त्याला राजकीय पाठिंबाही मिळू लागल्याने त्यात आणखी भर पडत गेली. देवस्थाने ही संवेदनशील संस्थाने बनू लागली आहेत. कोमुनिदाद संस्थांमध्येही हीच परिस्थिती आहे.
सरकारी पातळीवर आपण भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत बरेच काही बोलत असतो. भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे हा देवस्थाने आणि चर्च संस्थांतील वादाचा विषय बनत चालला आहे. अर्थात हे वाद आता न्यायालयातही पोहोचत आहेत. देवस्थाने ही गावच्या अस्तित्वाची नाळ आहे. ही नाळ जपून ठेवण्याचे आव्हानात्मक काम देवस्थान कारभाऱ्यांना करावे लागेल, आणि त्यामुळे पैशांच्या आमिषांना बळी पडून कुणीतरी बिल्डर किंवा गावांत प्रकल्प उभारणाऱ्यांकडून देणग्या घेऊन सण, उत्सवांवर लाखोंची उधळण करण्याच्या प्रकारांना आवर घालण्याची गरज आहे. हे सगळे करत असताना आपला देव आणि आपला गाव भलत्यांकडेच गहाण ठेवला जाणार नाही, याची काळजी नव्या देवस्थानांच्या कारभाऱ्यांनी घ्यावी एवढीच विनंती करावी असे वाटते.

  • Related Posts

    इंडेक्स फंड्स : आजची योग्य निवड, उद्याचा मजबूत पाया

    आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. महागाई, खर्चवाढ आणि अनिश्चित भविष्य यामध्ये बचतीबरोबरच गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. गुंतवणूक ही फक्त श्रीमंतांची गरज…

    रवी नाईक – आगे बढ़ो!

    सध्याच्या परिस्थितीत सर्वच मंत्र्यांनी गप्प राहण्याचा पवित्रा घेतलेला असताना, रवी नाईक यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते. गोव्याचे पात्रांव, म्हणजेच फोंड्याचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक. कधीकाळी गृहमंत्री असताना गुंडगिरीवर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रोहीतच्या बंगल्याची चौकशी करा !

    रोहीतच्या बंगल्याची चौकशी करा !

    बाप्पा, आम्हाला बळ दे !

    बाप्पा, आम्हाला बळ दे !

    25/08/2025 e-paper

    25/08/2025 e-paper

    “माझे घर” योजनेचा चतुर्थीत बोलबाला…

    “माझे घर” योजनेचा चतुर्थीत बोलबाला…

    इंडेक्स फंड्स : आजची योग्य निवड, उद्याचा मजबूत पाया

    इंडेक्स फंड्स : आजची योग्य निवड, उद्याचा मजबूत पाया

    ज्यूड कार्व्हालो साहेब काय हे ?

    ज्यूड कार्व्हालो साहेब काय हे ?
    error: Content is protected !!