आता इतर गोष्टींवर भ्रष्टाचार चालतो हे समजू शकते पण चक्क गोंयच्या सायबाच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करू शकतो काय. याचा निकाल आता गोंयच्या सायबालाच लावावा लागेल हे बाकी खरे.
पोर्तुगीज काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमणांनी पोर्तुगाल शासनाला त्रस्त केले होते. अशीच एक मोहीम फत्ते करण्यासाठी आलेल्या संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले असता या संकटातून बचाव करण्यासाठी पोर्तुगाल राजाने सेंट फ्रान्सिस झेवियरचा धावा केला. गोवा स्वारीवर आलेल्या संभाजी महाराजांना हेरांकडून काही महत्वाची माहिती मिळाल्यावरून त्यांना ही मोहीम अर्धवट सोडून स्वराज्यात परतावे लागले. संभाजी महाराजांची माघार हा चमत्कारच समजून अखेर पोर्तुगाल शासनाचा जीव भांड्यात पडला आणि सेंट फ्रान्सिस झेविअरची ख्याती गोंयचो सायब अशी बनली. पोर्तुगीज राजवट आणि इन्क्विझीशन याचा काळा इतिहास कुणीच विसरू शकणार नाही. धर्मांतराच्या नावाने बळजबरीने ख्रिस्ती बनवलेल्या तत्कालीन हिंदूंवर झालेले अनन्वीत अत्याचार अंगावर काटे उभे राहावेत इतके क्रुर होते. या इन्क्विझीशनला सेंट फ्रान्सिस झेविअर हे देखील कारणीभूत होते कारण ख्रिस्ती धर्मप्रसार हा एकमेव अजेंडा त्यांच्यासमोर होता. इन्क्विझिशनचा दरारा, दहशत इतकी होती की या भयाने हिंदूबरोबर ख्रिस्ती बांधवांनाही गोवा सोडुन अन्यत्र आसरा घ्यावा लागला. विशेषतः बार्देश तालुका हा धर्मांतरणाचा सर्वांत मोठा बळी ठरला. बार्देशातील अनेक कुटुंबे इतरत्र पळाली आणि बहुतांश ख्रिस्ती कुटुंबे ही घाटमाथ्यावर स्थिरावली. मराठ्यांची आक्रमणे आणि इन्क्विझीशन हीच या स्थलांतराची प्रमुख कारणे होती. हा सगळा इतिहास जरी असला तरी या व्यतिरीक्त एक संत म्हणून सेंट फ्रान्सिस झेवियरचे कार्य अनेकांना भावले किंबहुना ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी ते लोकांपर्यंत वेगवेगळ्या कथा, चमत्कार आणि आख्यायिकांनी पोहचवले आणि त्यातून त्यांचे असंख्य अनुयायी तयार झाले. केवळ ख्रिस्तीच नव्हे तर हिंदू, मुस्लीम लोकांचीही मोठी झुंबड शवदर्शन सोहळ्याला आणि फेस्ताला उडते हे त्याचे द्योतक आहे. आता तो काळा इतिहास उगाळून काहीच उपयोग नाही हे तितकेच खरे परंतु गोंयच्या सायबाबाबत जी मुळ भावना आणि श्रद्धा जी लोकांची आहे, त्याची कसोटीच आता लागणार आहे.
आपण धर्मशास्त्राच्या अनेक गोष्टी सांगत असतो. देवाला कुणीही फसवू शकत नाही,असे म्हणत असतो पण आमच्या राजकारण्यांनी लोकांनाच नव्हे तर देवांनाही ते सहजपणे फसवू शकतात हे दाखवून दिले आहे. अर्थात त्यांच्या हाता, गळ्यातील गंडे, दोरे पाहील्यानंतर ते सुरक्षा कवच त्यांनी मिळवल्याचे स्पष्टपणे दिसते. भगवान के घर देर है, अंधेर नही,असे धर्मशास्त्र सांगतो पण जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड अशी आपली न्यायव्यवस्था सांगते तरीही न्यायव्यवस्थेतील प्रलंबीत खटल्यांचा आकडा वाढत चालला आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शवदर्शन सोहळ्यासाठी कधीकाळी पर्रीकरांनी सुमारे ५० कोटी खर्चून अनेक सुविधा उभारल्या होत्या. आज अशाच सुविधांवर सरकार ३०० कोटी रूपये खर्च करत आहे. यावरून महागाई कुठे पोहचली आहे हेच दिसते. पण या कामांत मोठ्या प्रमाणांत भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका सुरू आहे. आता इतर गोष्टींवर भ्रष्टाचार चालतो हे समजू शकते पण चक्क गोंयच्या सायबाच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करू शकतो काय. याचा निकाल आता गोंयच्या सायबालाच लावावा लागेल हे बाकी खरे.