या नेत्यांनी समांतर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मुळ भाजपवाल्यांना दूर लोटले आहे. या सगळ्या गोष्टी सत्ता टीकवण्यासाठी भाजप पक्ष सहन करून घेत आहे. अशावेळी पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांना ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे वाटणे स्वाभाविकच आहे.
काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादविवाद, तंटे आणि खेचाखेची याचे थेट परिणाम जेव्हा पक्षसंघटनेवर पडत होते, तेव्हा यावर नेहमीच पक्षाचे नेते काँग्रेस हा एक महासागर आहे आणि त्यामुळे या बारीकसारीक गोष्टी घडणारच, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याची पद्धत होती. आजच्या घडीला या महासागराला खावटे पडले आहे आणि महासागरातील हे पाणी वाहून शेजारील भाजपच्या डोहात पसरून या डोहाचाच महासागर बनला आहे. कधीकाळी डोहात फुलणारे कमळ आज महासागरात फुललेले आपल्याला दिसते. या पाण्यासोबत माशांप्रमाणे भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, बेशिस्ती आदी सगळ्या गोष्टी भाजपच्या महासागरात एकरूप झाल्या आहेत. सुशासन, भ्रष्टाचाररहित प्रशासन आदी सगळ्या गोष्टी या महासागराच्या तळाशी जाऊन लुप्त झाल्या आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची गरज भासणार आहे,अशी परिस्थिती बनली आहे.
प्रारंभी १९७२ साली भारतीय जनसंघ आणि त्यानंतर १९८४ साली भारतीय जनता पार्टी म्हणून गोव्यात भाजपने विधानसभेच्या निवडणूका लढवल्या. परंतु भाजपला विधानसभेत प्रवेश मिळाला तर १९९४ साली आणि तो देखील मगो पक्षासोबत युती करून ते जमले. मगोसोबतची युती हा भाजपच्या राजकीय रणनितीचा भाग होता खरा परंतु या पक्षाने कधीच दैवावर निवडणूका लढवल्या नाहीत. मेहनत, श्रम, डावपेच आणि समर्पण या गोष्टींच्या आधारावरच देशात आणि गोव्यातही भाजपला सत्तेपर्यंत पोहचणे शक्य झाले. आमच्यासारख्याना अजूनही आठवते की जेव्हा मगो, काँग्रेसच्या सत्ताकाळात गावात जेमतेम चार ते पाच कार्यकर्ते स्वतःला भाजपचे कार्यकर्ते म्हणवून काम करत होते. त्यावेळी त्यांची होणारी थट्टा, भाजीपाववाले आले,असे म्हणून त्यांची उडवली जाणारी खिल्ली हे सगळे काही सहन करून या कार्यकर्त्यांनी भाजपचे हे बीज गोव्यात रोवले आणि आज त्याचा भलामोठा वटवृक्ष तयार झाला आहे. वास्तविक भाजपच्या सत्तेचा विस्तार होत असताना भाजपचा विचार मात्र दूर होत गेला. विचाराला चिकटून राहील्यास सत्तेवर पाणी सोडावे लागेल हे कळल्यानंतर वेगवेगळ्या विचारधारांना एकत्रित गुंफून नव्या भाजपची निर्मिती झाली. पहिल्यांदा एकहाती सत्ता संपादन करायची आणि नंतर प्रखरतेने विचार पुढे न्यायाचा, हे धोरण भाजपने स्वीकारले आहे आणि त्यातूनच आता सत्तेवर अनिर्बंध पकड मिळवल्यानंतर भाजप आपला वैचारिक अजेंडा पुढे नेताना आपल्याला दिसतो. पंडित नेहरूंनी ‘अजीब है ये गोवा के लोग’ म्हटले होते. गोव्याच्या भाजपवरून ते अजीबपण अधिक अधोरेखीत झाले आहे. आत्तापर्यंत ह्याच भाजपने जितक्या नेत्यांवर भ्रष्टाचार आणि अन्य अनैतिक गोष्टींचे आरोप केले होते ती सगळी मंडळी आज भाजपात आहे. हीच मंडळी आज भाजपचे पट्टे गळ्यात घालून भाजपाची धोरणे आणि विचार मुळ भाजप कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहेत. या नेत्यांनी समांतर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मुळ भाजपवाल्यांना दूर लोटले आहे. या सगळ्या गोष्टी सत्ता टीकवण्यासाठी भाजप पक्ष सहन करून घेत आहे. अशावेळी पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांना ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे वाटणे स्वाभाविकच आहे.