आपण ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामीनंतर आता मुक्त गोव्यात लोकशाहीतील गुलामी स्वीकारण्यातच धन्यदा मानणार आहोत की काय हे काळच ठरवणार.
सरकारी नोकरीच्या नावाने फसवणूक आणि लुबाडणूक, राजकीय वशिलेबाजीने होणारी नोकर भरती, पैशांच्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या, जमीन रूपांतरे, मेगा प्रकल्प आणि सगळ्या निमित्ताने येथील युवा पिढीचे अंधुक बनणारे भवितव्य हे सगळे अनुभवून आणि पाहुन देखील अद्याप आमच्या तरूणाईचे रक्त अजूनही सळसळत कसे नाही, हा प्रश्न पडतो. खरोखरच तरूणाई वेगळ्याच दुनियेत वावरत आहे का की त्यांना अशा कशातच रस नाही. खरोखरच तरूणाई भागूबाई बनली आहे की त्यांना कुणावरच विश्वास नाही. नेमकी ही तरूणाई काय विचार करते आणि त्यांची मानसिकता काय बनली आहे याचा शोध घेणे खूप गरजेचे ठरते. राज्यात आणि देशात जर बदल घडायला हवा किंवा अत्याचार, अन्याय दूर व्हायला हवा तर ही ताकद तरूणाईतच आहे. देशाचा स्वातंत्र्यलढा असू द्या किंवा गोव्याचा मुक्तीलढा. ओपिनियन पोल, विद्यार्थी चळवळ आणि अलिकडचा प्रादेशिक आराखडा- २०११ विरोधातील लढा या सगळ्या गोष्टींत तरूणाई पुढे होती हे आपण विसरता कामा नये. या तरूणाईला आपल्या राजकीय नेत्यांनी अशी काही भूरळ घातली आहे की ही तरूणाई आता त्यांच्या मागे-पुढे फिरण्यातच धन्यता मानते की काय,असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भूरूपांतरे आणि जमीन व्यवहारांनी धुमाकुळ घातला आहे. अर्थात यातून अनेक रिअल इस्टेट एजंटांची चांदी होऊन ते अलिशान बंगले आणि वाहने घेऊन फिरू लागले आहेत. राजकीय नेत्यांच्या गोतावळ्यात फिरणारे अनेकजण सरकारी नोकरीत रूजू झाले आहेत. सरकारशी चांगले संबंध ठेवून असलेल्यांना वेगवेगळ्या व्यवसायसंधी मिळून त्यांचीही बरकत झाली आहे आणि अगदीच काहीच नसलेले केवळ राजकीय नेत्याचे कार्यकर्ते बनून खुशाल बिअर पार्ट्या आणि मौजमस्तच दंग आहेत. या अशा कुठल्याच गोष्टीत नसलेली तरूणाई मात्र डोक्यावर आठ्या काढून आणि हातात फाईल्सची पिशवी घेऊन सत्यमार्गाने आपल्याला कुठेतरी संधी मिळेल या आशेने फिरताना दिसत आहेत. हे सगळे भेसूर चित्र जर समाजात तयार झाले असेल तर मग तरूणाई का आणि कशी म्हणून पुढे येणार आहे. आरजीपीच्या नावाने तो आक्रोश धारण करून ही तरूणाई रस्त्यावर उतरली होती पण त्यांनाही आपण नाकारले. वास्तविक मतदान हे गुप्त असते तरिही मतदान करताना मतदारांच्या डोक्यावर दबावाचे ओझे असणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट निश्चितच नाही. आरजीपीच्या त्या तरूणाईला आपल्याच समाजाने झिडकारले अर्थात अनेकांनी त्यांना पहिली संधी असूनही पाठींबा दिला हे जरी खरे असले तरी लोकांच्या मनांत ही दोलायमान परिस्थिती निर्माण झालीच का,असाही प्रश्न उदभवतो. मोफत टीशर्ट आणि कॅप आणि सोबत दुचाकीसाठी १ हजार रोख अशी ऑफऱ असलेल्या रॅलीसाठी तरूणांची रांग लागते पण आपल्या अवतीभोवती त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची फजिती उडविण्याची एकामागोमाग एक प्रकरणे उघड होत असतानाही त्यांना याबाबत रस्त्यावर उतरण्याचे सोडा पण चकार शब्दही काढण्याचे धाडस न होणे ही भयानकच गोष्ट म्हणावी लागेल. अर्थात तरूणाईतील हा जोश जागा करणारे नेतृत्वच आपल्याकडे राहीले नाही की काय,अशी परिस्थिती निश्चितच निर्माण झालेली आहे. आपण ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामीनंतर आता मुक्त गोव्यात लोकशाहीतील गुलामी स्वीकारण्यातच धन्यदा मानणार आहोत की काय हे काळच ठरवणार.