गणा धाव रे…

बाप्पांपासून काहीच लपून राहु शकत नाही आणि त्यामुळेच बाप्पांचे आगमन म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा पर्दाफाशच असतो असं म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चवथीची तयारी जय्यत सुरू आहे. प्रत्यक्ष देव घरी वास्तव्यासाठी येतो म्हटल्यावर त्याचे योग्य पद्थतीने आदरातिथ्य करण्यासाठी गोंयकारांची धामधुम सुरू आहे. एरवी आपण देवाच्या भेटीसाठी मंदिर किंवा धार्मिक स्थळी जात असतो. पण गणपतीचा उत्सव हा एकच असा अनोखा उत्सव आहे जिथे देव आपल्या घरी येतो आणि वास्तव करतो आणि देवाची मनोभावे सेवा केल्यानंतर आपण त्याचा निरोप घेऊन त्याला रितसर त्याच्या घरी पाठवतो.
गणा, बाप्पा, गणपती. श्री गणेश अशी सहस्त्र नावे धारण केलेली ही देवता म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबातलीच एक सदस्य. या देवतेशी प्रत्येकाचे भावनिक, अध्यात्मिक, कौटुंबिक असे नाते आहे. त्याच्याशी प्रत्यक्ष आपण संवाद साधतो. हा संवाद साधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतील पण आमची गाऱ्हाणी एकण्यासाठीच तर तो दरवर्षी घरी येत असतो. दरवर्षी घरी आल्यानंतर सहजिकच मागचे वर्षे आणि नवीन वर्ष या एका वर्षाचा लेखाजोखा बाप्पा करतच असणार. चांगल्या, वाईट गोष्टींचा हिशेबही बाप्पांकडे तयार असणार. कुटुंबाची प्रगती किंवा अधोगती याचाही आलेख बाप्पांकडे असणार. घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तो देवघरात आसनस्थ बाप्पा सगळं काही आपल्या बारीक डोळ्यांनी पाहत असतो. घरातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या गोष्टी, हीतगुज, कुजबुज, गडबड, बडबड आणि भांडणेही आपल्या सुपाएवढ्या कानांनी एकत असतो. बाप्पांपासून काहीच लपून राहु शकत नाही आणि त्यामुळेच बाप्पांचे आगमन म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा पर्दाफाशच असतो असं म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जसा व्यक्तीगत गणपती घरोघरी स्थानापन्न होतो तसाच सार्वजनिक गणपती मंदिर, मंडप किंवा खास जागेत प्रतिष्ठापीत केला जातो. घरचा गणपती घरच्या कुटुंबाचा हिशेब घेतो तसंच सार्वजनिक गणपती गांव, पंचायतन आणि राज्यातील हालहवाल जाणून घेत असतो. प्रत्येक ठिकाणच्या सार्वजनिक उत्सवांतून सामाजिक एकोपा, सामाजिक सलोखा आदींची टेहळणी करत असतो. एकंदरीत सांगण्याचे तात्पर्य म्हणजे चवथीच्या या उत्सवानिमित्त श्री गणेशाकडे आपल्या गोव्यातील घराघरातील, गांवातील आणि राज्यातील परिस्थितीची इत्यंभूत माहिती प्राप्त झालेली असते. मग घरी गेल्यानंतर तो या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन करूनच आपला न्यायनिवाडा करत असेल.
गोंयकार जगाच्या पाठीवर कुठेही असो पण गणपती आणि कुलदैवत आणि ग्रामदैवतेचा उत्सव त्याला तिथे थारा देणार नाही. आपला जन्मगांव तथा मुळस्थानाशी या उत्सवांनीच आपली नाळ जोडून ठेवली आहे. ही नाळ हीच तर आपल्या गोव्याचे वेगळेपण आहे. इतर राज्यांच्या लोकांना स्थलांतर किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त इतरत्र जाणे खूप सोपे वाटते पण गोंयकार मात्र कायम आपल्या मुळ गांवाप्रती संवेदनशील आणि अस्वस्थच राहतो. आजच्या घडीला आपली नाळ ठेचून आपल्याला आपल्याच गांव आणि मुळ स्थानापासुन वेगळे करण्याची आखणी काही स्वार्थी लोक करत आहेत. आपल्या आर्थिक, सामाजिक विवंचनेचा लाभ घेऊन इथल्या जमिनींवर कब्जा करण्याचा सपाटाच सुरू आहे. विकासाचे मोहजाल तयार करून त्यात सामान्यांना अटकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील लोकांचे स्थलांतर होणार आहे. पर्यटनाच्या नावाने संस्कृतीची छेडछाड होणार आहे आणि आपोआप आपण आपले अस्तित्व, आपली वेगळी ओळख, आपली भाषा, आपला गांव आणि आपला देव या सगळ्या गोष्टी विसरून कुठच्या कुठे फेकले जाणार आहोत.
यावर्षी म्हणूनच गणेशाचा धावा करण्याची गरज आहे. या आमिषांना बळी न पडण्याची बुद्धी, पैशांना बळी न पडण्याची सतर्कता, अन्याय सहन न करण्याची ताकद, अन्याय, अत्याचाराला तोंड देण्याची शक्ती आणि सर्वांनासोबत घेऊन या गोमंतक प्रांताचा धार्मिक, सामाजिक सलोखा जपण्याची सर्वसमावेशक मानसिकता प्राप्त करून देण्याची प्रार्थना श्रींच्या चरणी करूया आणि चला गोव्याचे रक्षण करण्यासाठी सज्ज होऊया…

  • Related Posts

    सिद्धीकीचा व्हिडिओ आणि अटक

    सत्ताधारी भाजपने विरोधकांची आयात करून त्यांचा आकडा केवळ ७ वर आणला आहे तरिही हे सात एकत्र आल्यास ३३ आमदार असलेले सरकार अस्वस्थ होते हे कशाचे चिन्ह म्हणावे लागेल. गोवा पोलिसांच्या…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    23/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 2 views
    23/12/2024 e-paper

    सिद्धीकीचा व्हिडिओ आणि अटक

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 4 views
    सिद्धीकीचा व्हिडिओ आणि अटक

    कुंकळळीकरिणीच्या चरणी धार्मिक सलोख्याची सेवा

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 23, 2024
    • 5 views
    कुंकळळीकरिणीच्या चरणी धार्मिक सलोख्याची सेवा

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 9 views
    ऑर्डर.. ऑर्डर…
    error: Content is protected !!