फोंडा येथील या महामार्गाचे रूंदीकरण होणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी काही विशेष अडचणींवर योग्य पद्धतीने मार्ग काढणेही तेवढेच गरजेचे आहे.
केंद्र सरकारने फोंडा ते भोमापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ५५७ कोटी रूपये मंजूर केले आहेत. केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तशी घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या घोषणेचे स्वागत केले. या घोषणेमुळे पुन्हा एकदा भोमाच्या महामार्ग रूंदीकरणाचा विषय चर्चेला आला आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भोमाच्या रूंदीकरणाचा विषय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घातला होता. या विषयावर योग्य तो तोडगा काढू,असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारात या विषयावर काही बोलणे किंवा चर्चा झाल्याचे मात्र काही एकिवात नाही. या महामार्गासाठीचे आरेखन आणि आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केला आहे. फोंडा येथील या महामार्गाचे रूंदीकरण होणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी काही विशेष अडचणींवर योग्य पद्धतीने मार्ग काढणेही तेवढेच गरजेचे आहे. भोमा हा छोटासा गांव आणि त्यात अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे याठिकाणी आहेत. या भूमीच्या प्रत्येक ठिकाणाला एक वेगळे धार्मिक महत्व आहे आणि या गांवचे रितीरिवाज, धार्मिक परंपरा, सण, उत्सवांचा या धर्मस्थळ आणि ठिकाणांशी संबंध आहे. याठिकाणी खांब उभारून महामार्ग नेण्याची योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची आहे आणि स्थानिकांनी बायपासची विनंती सरकारकडे केली आहे. सरकार मात्र बायपासबाबत अनुत्सुक दिसत आहे. केवळ चार घरे मोडावी लागतील आणि काही दुकाने बाधीत होतील,असे सरकारचे म्हणणे आहे पण स्थानिकांना सरकारवर विश्वास नाही. इथे अनेक बांधकामे आहेत आणि ज्यांची मालकी कागदपत्रे स्थानिक लोकांकडे नाहीत. त्यांची सरकारने गणनाच केली नाही आणि त्यांना लढण्यासाठी कोणताच अधिकार राहणार नाही. या गोष्टीचा सरकार गैरफायदा उठवायला पाहत आहे,असा स्थानिकांना संशय आहे.
पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग-६६ च्यावेळी सरकारने काय घोळ घातला आणि कशी गावांची वाताहात लावली हे सर्वश्रृत आहे. उगवे येथील श्री माऊली मंदिर, तोर्सेचे श्री माऊली मंदिर आणि श्री रवळनाथ मंदिराची परिस्थिती पाहील्यानंतर हे लक्षात येईल. तोर्सेतील दोन्ही मंदिरे तर महामार्गाला लागूनच आहेत आणि त्यामुळे सण, उत्सवावेळी देवावर विश्वास ठेवूनच भाविकांना देवदर्शन घ्यावे लागते. एकीकडे धर्म,संस्कृती जतनाच्या वल्गना करायच्या, पोर्तुगीज काळातील मंदिरे नव्याने उभारण्याच्या घोषणा करून हिंदूंना चेतवायचे आणि अल्पसंख्याकांचा डिवचायचे आणि दुसरीकडे कोट्यवधी रूपयांच्या खर्चाच्या निविदा असलेल्या महामार्गांच्या रूंदीकरणावेळी या सर्व धार्मिक भावना आणि श्रद्धांना पायदळी तुडवायचे हे नेमकी कुठली रित असा सवाल यावेळी करावाच लागणार आहे.