
धर्म म्हटला की त्यात प्रार्थना, पुजापाठ वगैरे गोष्टी येतात. याला ना हिंदु धर्म अपवाद आहे, ना ख्रिश्चन धर्म अपवाद आहे, ना मुस्लिम धर्म अपवाद आहे. फरक फक्त नामरूपाचा आहे. म्हणजे मूर्तीपूजक हिंदू कृष्ण म्हणून, राम म्हणून किंवा काली म्हणून देवाची मूर्ती बनवून पुजतो. ख्रिश्चन येशू ख्रिस्त व मेरीमातेची प्रतिमा पुजतो किंवा क्रूस हे प्रतिक पुजतो. मुस्लिम देवाला अल्ला म्हणतो आणि अवताराला पैगंबर म्हणतो. तो मूर्तीपूजक हिंदूप्रमाणे अल्लाला साकार मानत नाही, तो अल्लाला निराकार मानतो. पण तरीही हे सगळे धर्म देवाला जीवमात्राहून वेगळा मानतात. त्यातले काही देवाला निराकार मानत असले तरी सर्वचजण देवाला सगूण मानतात.
साकार, सगूण वगैरे शब्द आपण अनेकदा ऐकलेले असतात. पण त्यांच्या नेमक्या अर्थाबाबत आपण फारसा विचार केलेला नसतो. त्यामुळे या शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊ.
साकार म्हणजे आकार असलेला. निराकार म्हणजे आकार नसलेला. आपण पाणी आणि बर्फाचे उदाहरण घेऊ. बर्फाच्या तुकड्याला विशिष्ट आकार असतो. पण त्याचेच पाणी केले तर? तर त्या पाण्याला बर्फाच्या तुकड्याप्रमाणे विशिष्ट आकार नसतो. ते पाणी ज्या भांड्यात ठेवू, त्या भांड्याचा आकार त्याला येतो. बर्फ साकार आणि पाणी निराकार.
दुसरा शब्द आहे, सगूण. सगूण म्हणजे गुण असलेला. पातळपणा हा पाण्याचा गुण, घनपणा हा बर्फाचा गुण. आपण समजा मोगरीचे फुल घेतले तर वास, पांढरा रंग वगैरे त्या फुलाचे गुण. माणूस घेतला तर राग, इच्छा वगैरे त्याचे गुण. याच्या उलट निर्गुण. निर्गुण म्हणजे कोणताच गुण नसलेली गोष्ट. आपण लौकिक जगात ज्या काही गोष्टी पहातो त्या सर्वच सगुण आहेत. त्यांना काही ना काही गुण आहेत. त्यामुळे ‘निर्गुण’ गोष्टीची कल्पना करणे कठीण आहे. पण एक लक्षात येईल की निर्गुण म्हणजे अशी गोष्ट की जी ना प्रार्थनेने प्रसन्न होणार, ना टीकेने रागावणार. कारण प्रसन्न व्हायला किवा रागवायला तिच्यात काही गुण असला पाहिजे.
‘तुझ्या हे लक्षात येतेय का की निर्गुण ही गोष्टच सर्वशक्तिमान आहे?’ स्वामीजींनी विचारले.
‘कशी?’ मी विचारले.
‘ज्याला मोह नाही, ज्याला भिती नाही, त्यालाच पूर्ण स्वातंत्र्य आहे. ज्याला मोहात पाडता येते, ज्याला भिती वाटते, त्यालाच दुसरा आपल्या कामाला लावू शकतो. पण जो स्तुतीने भाळत नाही आणि टीकेने विचलित होत नाही, त्याला दुसरा कसा आपल्या कामाला जूंपू शकेल? दुसरा तुम्हाला मॅन्युप्युलेट करू शकत नसेल तरच तुम्ही सर्वशक्तिमान झाला ना! ब्रम्ह तत्त्व हे निराकार आहे आणि निर्गुण देखील आहे,’ स्वामीजी म्हणाले.
‘स्वामीजी, मीच ब्रम्ह असेन आणि ब्रम्ह निर्गुण निराकार असेल तर मी पूजापाठ, प्रार्थना वगैरे करण्याची काय गरज आहे?’ मी विचारले.
‘काहीच गरज नाही!’ स्वामीजी शांतपणे म्हणाले.
‘मग लोक जे पूजापाठ करतात, मंदिर, मशिद, चर्च बांधतात त्याचे काय?’ मी विचारले.
‘ते द्वैती आहेत. देव वेगळा आणि आपण (जीव) वेगळा असे त्यांचे मत आहे. अद्वैती ‘अहं ब्रम्हास्मि।’ हे सत्य स्वीकारतात. त्यामुळे पारंपरिक अद्वैती देव, देऊळ, मूर्तीपुजा वगैरे करत नाहीत. रामकृष्ण परमहंसांचे गुरू तोतापुरी हे मूर्तीपूजा वगैरे काही करायचे नाहीत. पारमार्थिक सत्याच्या पातळीवर हे ठिकच आहे,’ स्वामीजी म्हणाले.
‘पण रामकृष्ण परमहंस तर काली पुजा, विविध अवतारांची भक्ती करायचे. ते कसे?’ मी विचारले.
‘अंतिम वास्तव ‘ब्रम्ह सत्य, जगत मिथ्या’ हेच आहे. पण व्यावहारिक पातळीवर तू स्वतःला ब्रम्ह समजतोस की जीव?’
‘जीव!’
‘जीव समजून तू एकूणएक व्यवहार द्वैत पातळीवरच करतोस. बरोबर ना? माझ्याशी बोलतोस, प्रश्न विचारतोस, खातोस पितोस म्हणजे तुझा सगळा व्यवहार द्वैत पातळीवरच चालू आहे. बरोबर ना? म्हणजे आता या क्षणी तू जीव म्हणून वेगळा आणि ब्रम्ह वेगळे हाच तुझा भाव आहे, बरोबर ना?’ त्यांनी विचारले.
‘हो.’
‘एकदा प्रभू रामचंद्राने हनुमानाला प्रश्न केला होता की तुझं आणि माझं नातं काय?
त्यावर हनुमान म्हणाला,
‘देहबुद्ध्या त्वद्दासोहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।
आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता मति:।।
जेव्हा मी म्हणजे देह अशी बुद्धी असते तेव्हा तुम्ही प्रभू व मी दास. जेव्हा मी म्हणजे माझे मन (माझी जाणीव) असते तेव्हा मी तुमचा अंश. आणि जेव्हा मी म्हणजे आत्मा (जीवंतपणा) अशी बुद्धी असते तेव्हा मी म्हणजे तुम्हीच!
तेव्हा मी म्हणजे शरीर किंवा मी म्हणजे जीव या पातळीवर असताना पुजा-प्रार्थना या गोष्टींचा चित्तशुद्धीसाठी उपयोग होतो. त्यामुळे त्या आवश्यक आहेत. पण जर तू असे विचारशील की अद्वैत सिद्धीसाठी पुजाअर्चा, मंदिर- मशिद या आवश्यकच आहेत का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे!’ स्वामीजी म्हणाले.
- डॉ. रुपेश पाटकर
(आजच्या हनुमान जयंतीच्या आणि निसर्गदत्त महाराज जयंतीनिमित्त अध्यात्मिक चिंतनासाठी)