म्हापसा,दि.१४(प्रतिनिधी)- कुचेली कोमुनिदादच्या जागेत सुमारे १४० जणांना बनावट कागदपत्रे आणि खोटी आमिषे दाखवून भूखंड विक्री केल्याप्रकरणातील दोषी अजूनही मोकळेच आहेत. स्वतःच कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमणकर्ते ठरलेले लोक तक्रार कशी करणार आणि तक्रारदारच या प्रकरणातील गुन्हेगार असल्याचे चित्र पोलिस आणि प्रशासनाने तयार केल्याने या प्रकरणातील दोषींना अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
अस्पष्ट तक्रारी
कुचेली कोमुनिदाद जागेच्या या घोटाळ्याबाबत अद्याप गुन्हा का नोंदवण्यात आला नाही,असा सवाल काही पत्रकारांनी पोलिसांकडे केला असता त्यांनी तक्रारदारांकडून अस्पष्ट तक्रारी केल्याचे कारण पुढे केले आहे. मुळात तक्रारदारांनीच कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा घरे बांधली आहेत आणि त्यामुळे तक्रारदारांवरही गुन्हे नोंद होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. पोलिसांनी निर्माण केलेल्या या भितीमुळे आता तक्रारदारांची परिस्थिती द्विधा बनली असून हे लोक चक्रव्युहात सापडले आहेत.
संपादनाची प्रक्रिया अपूर्ण
चिखली कोमुनिदादची ही जागा नेमकी कुणी संपादन केली, याबाबत चौकशी केली असता नगर विकास खाते किंवा जीसुडाकडून ही जागा संपादन करण्यात आली नाही,असे स्पष्टीकरण नगर विकास खात्याकडून देण्यात आले. ही जागा संपादन करण्याची शिफारस उत्तर गोवा नियोजन विकास प्राधीकरणाकडून करण्यात आली होती आणि यानुसार संपादनाच्या भरपाईची रक्कम गोवा आर्थिक विकास महामंडळाकडे जमा करण्यात आली आहे. ही रक्कम चिखली कोमुनिदादला अद्याप मिळालेले नाही. प्राधीकरणाने अतिक्रमण विरहित जागा पाहीजे,असे सांगितल्यामुळे आता चिखली कोमुनिदाद अडचणीत आली आहे. चिखमी कोमुनिदादच्याच काही झारीतील शुक्राचार्यांनी स्थानिक नगरसेवक, पालिका अधिकारी आणि दलालांच्या सहाय्याने हा घोटाळा केला,असा आरोप आता सुरू झाला आहे.
सरकारची बघ्याची भूमीका
कोट्यवधी रूपयांच्या या घोटाळ्याची चर्चा गेले आठवडाभर सुरू असताना सरकार मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेतच वावरत आहे,असे म्हापसेकरांचे म्हणणे आहे. परप्रांतीय लोकांना बेकायदा पद्धतीने भूखंड विकण्यात आले, त्यांच्याकडून कोट्यवधी रूपये जमा करण्यात आले आणि त्यात बेकायदा अतिक्रमण करून सगळ्याच सरकारी यंत्रणांच्या डोळ्यांदेखत सुमारे १४० घरेही उभी झाली. हे सगळे घडत असतानाही आणि आता हा विषय उभा झाला असतानाही सरकार मात्र काहीच कृती न करता केवळ बघ्याची भूमीका घेऊन वागत असल्यामुळे दोषींना अभय देण्याचाच हा घाट आहे,असा आरोप केला जात आहे.