वास्तव्य दाखला, कोकणी सक्तीला विद्यापीठाकडून फाटा
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)
गोवा विद्यापीठाने नोकर भरतीप्रश्नी आपली दादागिरी चालूच ठेवली आहे. नव्या भरती नियमांतून १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणि कोकणी भाषेची सक्ती रद्द करून मुलाखती घेण्याचे सुरू असलेले काम अखेर गोवा फॉरवर्ड पक्षाने रोखले. या प्रकरणी चर्चेसाठी तातडीची बैठक बोलावली असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
नवा अभ्यासक्रम, नवी भरती
गोवा विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार जीआयएस आणि रिमोट सेन्सींग या भूगर्भ विज्ञान, सागरी विज्ञान आणि हवामान शास्त्र विद्याशाखेच्या नवीनच सुरु होण्याऱ्या अभ्यासक्रमासाठी शिक्षक भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अनिवार्य अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. या पदांसाठी स्थानिक उमेदवार उपलब्ध असूनही या अटी शिथिल केल्यामुळे नाराजी पसरली आहे.
विद्यापीठाला गोवा कुंकवाचा आधार
गोवा विद्यापीठ असे नाव या संस्थेला असले तरी यातील गोवा हा शब्द केवळ विद्यापीठाला कुंकवाचा आधार,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोमंतकीय उमेदवारांना आणि कर्मचाऱ्यांना सतावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कुलपती, कुलगुरू आणि कुलसचिव ही विद्यापीठाची महत्वाची पदे सर्वंच परप्रांतीयांच्या हाती असल्याने तिथे गोंयकारांचे काहीच चालत नाही. याविषयी अनेक खटले न्यायप्रविष्ठ आहेत. एका प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेल्या गोमंतकीय महिला अधिकाऱ्याला या चमूने निलंबित केले व तिला उच्च न्यायालयामध्ये आव्हान अर्ज करावा लागला तेव्हा न्यायालयाने विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढले व कुलसचिवांच्या आकसपूर्ण वागणुकीवर नाराजीही व्यक्त केली होती. या महिला अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देऊनही आता विद्यापीठाने या निर्णयाला सर्वोच न्यायालयात आव्हान दिले. तिथेही विद्यापीठाची नाचक्की झाली आणि अखेर मुकाट्याने या महिला अधिकाऱ्याला सेवेत रूजू करून घेणे त्यांना भाग पाडले.
स्वायत्ततेचा गैरवापर
गोवा विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी स्वायत्ततेचा गैरवापर करत असून राज्य सरकारचे आदेशही जुमानत नाहीत. विद्यापाठीचा स्तर खालावत चालला आहे. पात्रतेचे कारण पुढे करून विद्यापीठावर परप्रांतीयांचा भरणा सुरू असून तिथे स्थानिक केवळ नाममात्र राहीले आहेत.
गोवा फॉरवर्डचा घेराव
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाने आज गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव घातला. नोकर भरती नियम शिथिल करून सुरू असलेल्या मुलाखतींना हरकत घेण्यात आली आणि ही भरती पुढे ढकलण्यात यावी,अशी मागणी केली. प्राप्त माहितीनुसार या शिष्टमंडळाला कुलगुरूंनी चर्चेसाठी बोलावले असून चर्चेअंती या विषयावर विद्यापीठ स्पष्टीकरण देणार असल्याची माहिती मिळाली आहे.