त्रृटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार
पणजी,दि.२२(प्रतिनिधी)
राज्य सरकारने स्थापन केलेल्या कला अकादमीच्या कृती समितीने दुरूस्ती कामाबांबत पूर्णपणे नाखूषी व्यक्त करत हे काम नापास झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुरूस्ती कामांत अनेक त्रृटी राहीलेल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. पुढील महिन्याच्या १०,११ आणि १२ तारखेला कंत्राटदार, तज्ज्ञ आणि सर्व संबंधितांसोबत चर्चा करून कृती आराखडा तयार केला जाईल,अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी दिली.
पाहणीत आढळून आल्या अनेक त्रृटी
राज्य सरकारने कला अकादमीच्या दुरूस्ती कामांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या कृती समितीने कला अकादमीची पाहणी केली. या पाहणीवेळी कंत्राटदार हजर नव्हता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कृती समितीचे सदस्य यावेळी हजर होते. कला अकादमीच्या वास्तूचे जतन आणि संवर्धन करूनच दुरूस्ती काम हाती घेणे गरजेचे होते. येथील ध्वनी योजना, गळती, इकोस्टीक तथा अन्य अनेक त्रृटी या पाहणीत आढळून आलेल्या आहेत. या सर्व गोष्टी तज्ज्ञांच्या मदतीने दुरूस्त कराव्या लागणार आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. या एकूणच त्रृटींची एक यादी तयार करून त्याबाबत सविस्तर चर्चा करून कृती आराखडा तयार केला जाईल,असे विजय केंकरे म्हणाले.
कला अकादमीचे पावित्र्य महत्वाचे
कलाकार, श्रोते तथा या वास्तूत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळीच उर्जा प्राप्त करून देणारे हे ठिकाण आहे. हे पावित्र्य पुन्हा या वास्तूला प्राप्त होण्याची गरज आहे. भारतात कला अकादमीसारखे दुसरे नाट्यगृह नाही. दुरूस्तीच्या कामाबाबत कंत्राटदाराकडे चर्चा करून आणि त्यानंतर तज्ज्ञांची मदत घेऊन सर्व त्रृटी लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ही चुक कंत्राटदाराची असेल तर त्याची भरपाई कंत्राटदारालाच करावी लागेल परंतु काही गोष्टी जर कंत्राटदाराच्या हातात नसतील आणि त्या करणे गरजेचे असेल तर त्यासाठी राज्य सरकारला अतिरीक्त खर्चाचा भार सोसावा लागणार आहेच,असेही यावेळी केंकरे यांनी स्पष्ट केले.