सचिवालयातील महिला कर्मचाऱ्याने बेरोजगारांना लुबाडले
पणजी,दि.२१(प्रतिनिधी)
गुणवत्ता आणि पात्रतेच्या निकषांवर सरकारी नोकरी मिळत नाही. कुणा सरकारी एजंटांमार्फत पैसे देऊनच नोकरी मिळू शकते ही लोकांची मानसिकता पुन्हा स्पष्ट झाली आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी (पुजा) नाईक या सचिवालयातील महिला कर्मचाऱ्याकडून राज्यातील ठिकठिकाणच्या बेरोजगारांना सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपेवाळ- प्रियोळ येथील गुरूदास गोविंद गावडे यांच्या तक्रारीवरून म्हार्दोळ पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी यापूर्वी अन्यत्र या महिलेविरोधात तक्रारी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. जुने गोवे येथे अलिशान स्प्रिंग फिल्ड कॉलनीत दोन फ्लॅट घेऊन वास्तव करणाऱ्या या महिलेचे अनेक कारनामे आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. पैसे घेऊन नोकरी न मिळू शकलेल्या अनेकांना या महिलेने पोस्ट डेटेट धनादेश तथा वकिलांमार्फत पैसे परत करण्याचे प्रतिज्ञापत्रही दिल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
एका बड्या टोळीची शक्यता
सचिवालयात नोकरी करणाऱ्या या महिलेकडून अशा तऱ्हेने शेकडो जणांना गंडा घालण्याचा हा प्रकार पाहील्यानंतर सरकारी नोकरीच्या निमित्ताने पैसे गोळा करण्यासाठी एक मोठी टोळीच कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही महिला एकटीच हे धाडस करू शकेल,अशी शक्यता कमी असून सरकारातील अनेक मंत्र्यांपर्यंत या टोळीचे हात असण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने हे प्रकरण विशेष पोलिस तपास पथकाकडे सोपवून या महिलेकडून फसवणूक झालेल्या सगळ्यांच्या तक्रारी एकत्रित करून या प्रकरणाचा शोध घ्यावा,अशी मागणी आता पुढे आली आहे.
पोलिसांकडून तक्रारदारांनाच भीती
अनेक तक्रारदारांना पोलिसांकडूनच लाच दिल्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची भिती घातली गेली आहे. या कारणांमुळे अनेक तक्रारदार पुढे धजावत नसल्याचीही खबर आहे. पोलिसांकडून वेळीच कारवाई झाली असली तर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला असता,असेही आता अनेकांचे म्हणणे आहे.
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे लागत नाहीतः मुख्यमंत्री
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे लागत नाहीत. कुणीही सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करत असेल तर त्यांच्या आमिषांना बळी पडू नका,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. या प्रकरणी आपण पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी लोकांकडून पैसे उकळणाऱ्या अशा लोकांविरोधात सक्त आणि कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.