पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत.
सुभाष वेलिंगकर यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या १० रोजी सुनावणी होईल. मुळातच दोन वेळा नोटीसा पाठवूनही ते पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहीले नसल्याचा आधार घेऊन अतिरीक्त सत्र न्यायालयाने त्यांचा जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. तरिही ते अद्यापही पोलिसांसमोर हजर राहीले नसल्याने उच्च न्यायालय याबाबतीत नेमकी काय भूमीका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
समर्थकांकडून वक्तव्याची पुर्नरावृत्ती
राज्यात धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर चर्च तथा विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या ख्रिस्ती धर्मियांना शांत राहण्याचा आणि रस्त्यावर न उतरण्याचा सल्ला दिल्यानंतर काही प्रमाणात वातावरण निवळले परंतु वेलिंगकरांचे समर्थन करणारे काही हिंदू गट आणि संघटना तसेच वैयक्तीक कार्यकर्ते समाज माध्यमांवरून भडकाऊ पोस्ट टाकत असल्याने तसेच वेलिंगकर अडचणीत आलेल्या वक्तव्याचाच पुर्नउच्चार करत असल्याने पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशांवर लगेच कारवाई करावी,अशी मागणी सुरू झाली आहे.
डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांना चौकशीसाठी आता तिसरी नोटीस जारी केली आहे. त्यांना उद्या १० रोजी डिचोली पोलिस स्थानकावर बोलावण्यात आले आहे. उद्याच मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार असल्याने कदाचित ते पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. त्यांची चौकशीसाठीची अनुपस्थिती हेच जामीन फेटाळण्याचे कारण ठरल्याने ते पोलिसांसमोर हजर राहू शकतात.