जोपर्यंत डॉ. सावंत यांच्या नेतृत्व शत्रू निवारण अधिष्ठानाला कुठलाही हातातला गंडा, कपाळावरचे भस्म, अभिषेक, पूजाविधी किंवा सुवर्णालंकार दान हानी पोहचवू शकत नाही, तोपर्यंत त्यांचे आसन अढळ आहे हे मात्र नक्की.
राज्यातील भाजप आघाडी सरकारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील नेतृत्वसंघर्ष हा काही आता लपून राहिलेला विषय नाही. या विषयाभोवतीच सध्याचे राजकारण प्रदक्षिणा घालत आहे. विश्वजीत राणे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अचानकपणे राजकारणाला वेग प्राप्त झाला. यानंतर अचानक सरकारातील मंत्री, आमदारांच्या दिल्ली भेटी, मुख्यमंत्र्यांचा दोन आमदारांसह चार्टर दौरा, पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांच्या दिल्लीवारीवरून झालेला गदारोळ आदी गोष्टी घडत गेल्या. अचानकपणे राज्यपालपदी असलेले राजेंद्र आर्लेकर यांचे नाव चर्चेत आले. हे घडत असतानाच आर्लेकरांची केरळच्या राज्यपालपदी झालेली बदली आणि त्यांच्याकडूनच नेतृत्वाच्या स्पर्धेत आपण नसल्याचा झालेला खुलासा यावरून निश्चितच गोव्याच्या राजकारणाच्या आंदणावर काहीतरी शिजत असल्याचा वास येणे स्वाभाविक आहे. गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षांहून अधिक काळ सातत्याने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा पहिला मान डॉ. प्रमोद सावंत यांना प्राप्त झाला आहे. हा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना ते मागे टाकणार आहेत. सुदैवाने सरकारात भाजपचा एकही मुळ संघनिष्ठ नेता नसल्याने डॉ. सावंत यांना नेतृत्वाबाबत स्पर्धाच नसल्याची परिस्थिती आहे. सभापती रमेश तवडकर हे संघ स्वयंसेवक असले तरी मध्यंतरी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे तो डाग त्यांच्या पक्षनिष्ठेला लागल्याने निर्विवाद नेतृत्व म्हणून डॉ. सावंत यांच्याकडे पाहिले जाते. सरकारातील काही महत्वाकांक्षी नेत्यांसाठी हीच मोठी अडचण ठरली आहे.एखाद्या राज्याचा मंत्री थेट दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांची भेट घेणे हे सरकारच्या शिष्टाचारात बसत नाही. परंतु गोवा अजिब आहे हे भाजपनेही ओळखले आहे. विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची महत्वाकांक्षा आहे. त्यांनी सत्तरीच्या दोन काँग्रेसच्या जागा भाजपला मिळवून दिल्या, सदस्यनोंदणीत काँग्रेसचे नामोनिशाण मिटवले, लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद केली. या व्यतिरीक्त विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांत त्यांनी पक्षाला भसघोस मदत केल्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी छोटे खाशांना विशेष मान आहे. अशा विशेष मानसन्मानाचा लाभ नेतृत्वात होण्याची परंपरा काँग्रेसमध्ये असली तरी भाजपात ते सहजा घडत नाही. संयम, धूर्तपणा ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची जमेची बाजू आहे. नेतृत्व साडेसाती निवारणाचा काहीतरी रामबाण उपाय त्यांना गवसला आहे. जोपर्यंत डॉ. सावंत यांच्या नेतृत्व शत्रू निवारण अधिष्ठानाला कुठलाही हातातला गंडा, कपाळावरचे भस्म, अभिषेक, पूजाविधी किंवा सुवर्णालंकार दान हानी पोहचवू शकत नाही तोपर्यंत त्यांचे आसन अढळ आहे हे मात्र नक्की.