सुलेमान कर्नाटकातच लपल्याचा पोलिसांचा संशय
पणजी,दि.१४(प्रतिनिधी)
सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याला गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन करण्यास मदत केलेला आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सुलेमानचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असून तो कर्नाटकातच लपून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खून, खूनाचा हल्ला तथा अनेक मोठे जमीन घोटाळ्यातील प्रमुख गुन्हेगार सुलेमान खान याच्या पलायनामुळे पोलिस खात्याची बरीच बेअब्रु झाली आहे. सुलेमानला आपल्या दुचाकीवरून पलायन करण्यास मदत केलेला आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक हा रात्री हुबळी पोलिसांना शरण गेला. गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री हुबळीहून त्याला ताब्यात घेतले. तो शरण आला असला तरी सुलेमान मात्र पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सेवेतून बडतर्फ
आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार सुलेमान याने त्याला ३ कोटी रूपयांची ऑफर त्याला पलायन करण्यास मदत करण्यासाठी दिल्याची माहिती समोर आली आहे. एखादा सराईत गुन्हेगार पोलिसांना पैशांचे आमिष दाखवून जर अशा तऱ्हेने पलायन करू लागला तर मग पोलिसांची विश्वासाहर्ता काय राहीली,असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकारचीच नैतिकता मातीला मिळाल्यामुळेच हे घडत आहे,अशी टीका विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.
चार पथके कर्नाटकात तैनात
सुलेमान खान याचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांची चार पथके कर्नाटकात तैनात करण्यात आली आहेत. अमित नाईक याने सुलेमान याला हुबळी येथे सोडल्यानंतर तो कर्नाटकातच ठाण मांडून बसला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सुलेमानचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.
He may be paid through barter rule… Check his n family assets, flats,land n other property.The story of 3 cr. Is to fool goans…