प्रशासन की सरकार, कोण जबाबदार?

मुसळधार पावसाने म्हापसा शहर मुंबईसारखे जलमय स्थितीत अडकले. रस्त्यांची दुर्दशा, कचऱ्याचे ढीग आणि घरात शिरलेले चिखलमय पाणी या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरसेवकांना जनतेने जाब विचारायला हवा, परंतु सगळीकडे शांतता आहे.

राज्यात गेले तीन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. लवकरच मान्सूनचे आगमन होणार असून यापेक्षा तीव्र पावसाचे दर्शन घडणार आहे. सध्याच ही परिस्थिती असल्यास पुढे काय? या चिंतेने नागरिक व्यथित आहेत. राज्यभर पावसामुळे पडझड, सार्वजनिक गैरसोय, मालमत्तेची हानी आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही सत्ताधारी पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात व्यस्त असून २०२७ मध्ये २७ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. ही असंवेदनशीलता म्हणावी की सत्तेची गुर्मी? हा प्रश्न उपस्थित होतो. गेले तीन दिवस सरकारकडून या परिस्थितीवर कोणतेही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, तर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात कुठेच दिसत नाहीत.
कुठल्याही परिस्थितीचे नियोजन हे प्रशासनाचे कर्तव्य असते. हवामान बदल, वाढते पावसाचे प्रमाण आणि संभाव्य आपत्ती यांचा अंदाज घेऊन योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व कामांसाठी केवळ मे महिना का निवडला जातो? यापूर्वी ही कामे होऊ शकत नाहीत का? विविध खात्यांच्या वार्षिक नियोजनात मान्सूनपूर्व तयारीचा समावेश असणे आवश्यक आहे. पण मुख्यमंत्री अथवा संबंधित मंत्री आदेश देतील तेव्हाच प्रशासन काम करते, बाकीच्या वेळी त्यांना काहीच पडलेले नसते का? असा सवाल उपस्थित होतो.
म्हापसा हे उत्तर गोव्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून नेहमीच चर्चेत असते. मात्र चांगल्या कामांसाठी नव्हे, तर घोटाळे, वाद आणि गैरव्यवस्थेसाठीच अधिक चर्चेत असते. नगरसेवक हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी असले तरी ते आमदारांचे खाजगी प्रतिनिधी असल्यागत वागतात. नगराध्यक्षपदाची राजकीय वाटणी झाल्यानंतर नगरसेवक त्यातच गुंतून शहराकडे दुर्लक्ष करतात. मुसळधार पावसाने म्हापसा शहर मुंबईसारखे जलमय स्थितीत अडकले. रस्त्यांची दुर्दशा, कचऱ्याचे ढीग आणि घरात शिरलेले चिखलमय पाणी या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरसेवकांना जनतेने जाब विचारायला हवा, परंतु सगळीकडे शांतता आहे. केवळ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारच गैरव्यवस्थेवर आवाज उठवत आहेत. क्रांती, आंदोलने आणि संवेदनशीलतेची ओळख असलेले म्हापसेकर इतके निष्क्रिय कसे काय बनले हेच कळत नाही.
शहर अवकळीत असताना काही नगरसेवक दुबई दौऱ्यावर कुटुंबासह जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा दौरा पूर्वनियोजित असला तरी अशा परिस्थितीत तो रद्द करण्याचा विचारही मनात येऊ नये? म्हापसेकरांना या दौऱ्याची हरकत वाटत नाही, हेच त्यांच्या सध्याच्या परिस्थितीतून स्पष्ट होते. राजकीय दबावामुळे नागरिक उघड भूमिका घेण्यास असमर्थ आहेत. जर म्हापसा शहराची अशीच स्थिती कायम राहिली, तर हे शहर हाताबाहेर जाण्याचीच शक्यता आहे. श्री देव बोडगेश्वर म्हापसेकरांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना.

  • Related Posts

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    एकीकडे देशातील अव्वल दरडोई उत्पन्नाचे राज्य अशी शेखी मिरवायची आणि दुसरीकडे या सामाजिक योजनांतून गोंयकारांच्या मानसिक दारिद्र्याचे प्रदर्शन भरवायचे, असा हा खेळ गेली काही वर्षे सुरू आहे. समाज कल्याण खात्याचे…

    हे नेमकं चाललंय काय?

    समाज अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालला आहे. “मला काय त्याचे?”, “मला काय मिळणार?” अशी मानसिकता बळावत चालली आहे आणि त्यामुळे समूह, ग्रामसंस्था यांसारख्या संकल्पनाच कमकुवत होत आहेत. आज सकाळी धारगळ–पेडणे येथे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!