![](https://gaonkaari.com/wp-content/uploads/2025/01/main-1.jpg)
नारळांसाठी अनुदान द्या; गिरीश चोडणकरांची मागणी
पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
गोंयकारांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा जीन्नस असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडले आहेत. अगदीच ७० रुपये प्रतीनगपर्यंत नारळाचे भाव वाढल्याने सरकारने ताबडतोब नारळांसाठी अनुदान जाहीर करावे, अशी जोरदार मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.
राज्यात नाताळापासून नारळाचे भाव वाढत चालले आहेत. राज्यांतर्गत पुरवठा कमी झाला आहे तर राज्याबाहेरून नारळापेक्षा शहाळ्यांची मागणी वाढल्याने त्याचा फटका नारळांना बसला आहे. बाजारात मागणी असूनही कमी पुरवठ्यामुळे नारळाचे भाव वाढले आहेत. बारीक नारळ २५ रुपये, मध्यम ३० ते ४० तर साधारणतः चांगला नारळ ७० रुपये प्रतीनगपर्यंत वाढला आहे. गोंयकारांच्या रोजच्या जेवणातील महत्त्वाचा जीन्नस नारळ असल्यामुळे त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे.
गृह आधार नारळापुढे निराधार
गृहिणींना महिनाखर्च म्हणून गृहआधार योजनेअंतर्गत महिना दीड हजार रुपये दिले जातात. यातील बहुतांश खर्च हा घरगुती गॅस सिलिंडर आणि नारळांवर होत असतो. गोंयकारांच्या शाकाहारी किंवा मासांहारी जेवणात तितक्याच प्रमाणात नारळाचा वापर होत असतो. धार्मिक विधी आणि विशेष करून लग्नकार्यातही नारळांचा मोठा वापर होत असल्याने नारळांकडे तडजोड करणे हे गोंयकारांना शक्य नाही. मासे आणि नारळाचा खर्च हा रोजच्या खर्चाचा सर्वांत मोठा भाग आहे. बागायतीतील माडांना विशिष्ट रोग लागला आहे तसेच माकडांकडून नारळांची नासाडी केली जात असल्याने घरगुती नारळांसाठीही नारळ विकत घेण्याची वेळ गोंयकारांवर आली आहे.
गोवा बागायतदाराकडे मुबलक पुरवठा
गोवा बायागतदाराकडे नारळांचा मुबलक पुरवठा आहे, अशी माहिती बागायतदाराने दिली आहे. खुल्या बाजारात नारळाचे दर वाढले असले तरी बागायतदाराकडे नारळ उपलब्ध आहे. आता नारळांसाठी गोवा बागायतदाराच्या दुकानांत जाण्याची वेळ गोंयकारांवर ओढवण्याची शक्यता आहे.
नारळांवर अनुदान हवे
महागाईने आधीच लोकांचे कंबरडे मोडले आहे. आता गोंयकारांच्या जेवणातला नारळ लोकांना परवडेनासा झाल्याने सरकारने ताबडतोब अनुदान देण्यासंबंधीचा विचार करावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली. या विषयावर वेळीच तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.