विरोधक आक्रमक, सरकारात मात्र गुढ शांतता
पणजी,दि.१६(प्रतिनिधी)
वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल झालेला सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याने गुन्हा शाखेतील कोठडीतून केलेले पलायन आणि काल जारी केलेला व्हिडिओ यामुळे सरकार पूर्णपणे चक्रव्युहात सापडले आहे. विरोधकांनी या विषयावर चौफेर टीका सुरू केली असून सरकार आणि सरकार पक्षात मात्र गुढ शांतता पसरली आहे.
विरोधकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट
रविवारी रात्री सुलेमान खानचा व्हिडिओ जारी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे सरकार आणि विशेषतः पोलिस खात्याची पूर्णपणे नाचक्की झाली. सुलेमानचा विषय हा देखील जमीन व्यवहारांशी संबंधीत आहे आणि त्यात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचेही त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. आपल्याला गुन्हा शाखेतून पोलिसांनीच पळायला भाग पाडल्याचा सनसनाटी खुलासा त्याने केला आहे. आम आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांची भेट घेऊन तो पळाला त्या दिवसाचे सगळे सीसीटीव्ही फुजेट सार्वजनिक करा,अशी मागणी केली आहे.
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
सरकारच्या गृह खात्याने सर्वोच्च खालची पातळी गाठली आहे. राजकारणी आणि गुन्हेगारांचे साटेलोटे सर्वोच्च पातळीवर पोहचले आहे. जमीन हडप, जमीन रूपांतरणे आणि गोवा विकण्याचेच प्रकार सुरू आहेत, त्याचीच ही परिणती आहे,असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. राज्यपालांनी ताबडतोब हस्तक्षेप करून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचा जाब विचारावा आणि संबंधीतांना निलंबित करण्यात यावे,असेही आलेमाव म्हणाले.
सुलेमानचा शोध ही प्राथमिकता- डीजीपी
पोलिस महासंचालकांनी सुलेमानची अटक ही पोलिसांची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. सुलेमान हा हुशार गुन्हेगार असून तपासाची दिशाभूल करण्यासाठीच तो व्हिडिओतून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहे,असेही ते म्हणाले. त्याला ताब्यात घेतल्यावरच त्याने केलेल्या विधानाबाबतची चौकशी करता येईल,असेही पोलिस महासंचालक म्हणाले.
सरकारात गुढ शांतता
नोकऱ्यांच्या विषयावरून वातावरण कुठे शांत होते तोच आता सुलेमान प्रकरणाने डोके वर काढल्याने सरकारची कोंडी झाली आहे. सरकार आणि सत्ताधारी भाजपात गुढ शांतता पसरली आहे. विरोधकांच्या टीकेला कसे उत्तर द्यावे याची रणनिती आखली जात आहे. केंद्रीय स्तरावरही या घडामोडींची दखल घेण्यात आली असून लवकरच केंद्रीय निरीक्षक गोव्यात येण्याची शक्यता सुत्रांनी दिली.