ड्रग्स सेवन केलेल्या ५ जणांना पोलिसांची क्लीनचिट
पणजी, दि. ३१(प्रतिनिधी)
धारगळ येथील सनबर्न महोत्सवात शनिवारी मृत्यू पावलेल्या तरूणाच्या प्रकरणी सरकारात कमालीचे मौन पाहायला मिळत आहे. सरकारने या घटनेबाबत आपली अधिकृत भूमीका जाहीर केलेली नाही. सोमवारी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ५ जणांवर ड्रग्स सेवन केल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला, परंतु त्यांनी हे ड्रग्स महोत्सवाच्या ठिकाणाबाहेर सेवन केल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना क्लीनचिट प्रमाणपत्र बहाल केले आहे.
शवचिकित्सा अहवालात ड्रग्सचे संकेत
धारगळ येथील सनबर्न महोत्सवात कोसळल्यानंतर म्हापसा येथील खाजगी इस्पितळात मृत घोषित करण्यात आलेला युवक करण कश्यप हा आयआयटीचा टॉपर विद्यार्थी होता. त्याच्या शवचिकीत्सा अहवालात त्याच्या कीडनीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. सविस्तर अहवालासाठी व्हिसेरा चाचणी करावी लागेल असेही म्हटले आहे. प्राथमिक अहवालात त्याच्या मृत्यूला ड्रग्सच्या सेवनाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी अद्याप त्याला दुजोरा दिला जात नाही. याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे. हा मृत्यू नैसर्गिक होता किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे झाला असता तर ते लगेच घोषित झाले असते. सखोल अहवालासाठी वेळ मागून घेणे ह्यातच संशयाला जागा आहे,अशी टीका विरोधकांनी केली आहे. आयोजकांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या महोत्सवात सिगारेटही नेता येत नाही,असा दावा केला जात असला तरी तिथे हातात दारूच्या बाटल्या, ग्लास आणि सिगरेट घेऊन बेधुंद नाचणारी तरूणाई दिसत होती,असेही अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
एएनसीची कारवाई
पोलिस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी पथक(एएनसी) कडून महोत्सवाला जाणाऱ्या काही तरूणांची चाचणी केली. सुमारे ४५ लोकांच्या अशा चाचण्या केल्यानंतर ५ जणांनी ड्रग्सचे सेवन केल्याचे आढळून आले आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांचे रक्त आणि मुत्राचे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. या युवकांनी हे ड्रग्स महोत्सवाच्या ठिकाणाबाहेर सेवन केल्याची माहिती एएनसीचे पोलिस अधिक्षक तिकम सिंग वर्मा यांनी दिली. या व्यतिरीक्त एएनसीने राज्यभरात अशा तऱ्हेची कारवाई केली. ह्यात तुये- पेडणे येथे एका स्थानिक युवकाला ७.७ लाख रूपयांच्या ड्रग्ससह पकडण्यात आले. साळगांव आणि पर्रा येथे एका नायजेरियन नागरीकाला १२ ग्राम कोकेनसह ताब्यात घेण्यात असून या कारवाईचे मुल्य ४० लाख रूपयांवर जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
नवीन वर्षांसाठी खास टेहळणी
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आयोजित पार्ट्या आणि अन्य पर्यटकांचा गजबज असलेल्या जागी विभागाचे अधिकारी टेहळणी करणार आहे. पेडणे ते काणकोण अशी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत,अशी माहितीही अधिक्षक वर्मा यांनी दिली.
तक्रारींचा ओघ सुरूच
वागातोर येथे विनापरवाना रात्रभर चालणाऱ्या सर्कस एक्स नमासस्क्रे या संगीत कार्यक्रमावर कारवाईची मागणी करणारी तक्रार हणजूण- कांयसुवेचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी केली आहे. पंचायतीचा परवाना न घेता तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे उल्लंघन करून ही पार्टी आयोजित केल्याने त्याचा स्थानिकांना बराच त्रास होत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी हणजूण पोलिस स्थानकावर वागातोर येथील इको क्लबच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात ध्वनी अटींचे उल्लंघन करून आयोजकांनी सगळे नियम धाब्यावर बसवल्याचा ठपका त्यांनी तक्रारीत ठेवला आहे.