पेडणे,दि.१२(प्रतिनिधी)
धारगळसह संपूर्ण पेडणे तालुक्यातून विरोध होणाऱ्या सनबर्न महोत्सवाला पाठींबा देऊन तालुक्याच्या विरोधात भूमीका घेतलेल्या पंचसदस्य तथा त्यांच्या काही समर्थकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तीनो येथील बंगल्यावर हजेरी लावली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनीच पुढे काढले होते काय ?
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर तथा पेडणे तालुक्यातील असंख्य लोकांनी सनबर्न महोत्सवाला हरकत घेतल्यामुळे धारगळ पंचायतीचे सत्ताधारी मंडळ आणि त्यांच्या काही समर्थकांना पुढे काढून ना हरकत दाखला मिळवण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाच हात होता काय,असा सवाल माजी सरपंच अनिकेत साळगांवकर यांनी केला आहे. या पंचसदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कामगिरी फत्ते केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्यांनाच धारगळीत आणून लोकांच्या मनातील संशय दूर केला असता तर ते अधिक चांगले ठरले असते. स्थानिक जनतेच्या विरोधात जाऊन त्यांची प्रतारणा करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,असेही साळगांवकर म्हणाले.
भाजपने साधला डाव
पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गांवस यांना सनबर्न विरोधी आंदोलनापासून पक्षाने परावृत्त केले. धारगळीतील मुळ भाजप कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी सनबर्न समर्थनार्थ सभा आयोजित करण्याचाही डाव साधला. पेडणेचे भाजप आमदार प्रविण आर्लेकर यांनी सनबर्न विरोधी भूमीका घेतल्यानंतर ह्याच मुळ कार्यकर्त्यांना वापरून सनबर्न समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करून भाजपने आपल्याच आमदाराला अद्दल घडविल्याची चर्चा पेडण्यात जोरात सुरू आहे.