वेडा वाकुडा गाईन…!

प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा.

आम्हाला शाळेत असताना आठवी ते दहावी या इयत्तांत संस्कृत भाषा घेण्याची मुभा असे. आमच्या शाळेत शंभर गुणांचे संस्कृत नव्हते. त्यामुळे पन्नास गुणांचे हिंदी आणि पन्नास गुणांचे संस्कृत घ्यावे लागे. पण संस्कृत शिकण्याचा आनंद शंभर गुणांचाच मिळे. याचे कारण म्हणजे आम्हाला संस्कृत शिकवणारे सिधये सर. ते स्वतः संस्कृत पाठशाळेत शिकले होते. त्यांची शिकवण्याची हातोटी खूपच सुंदर होती. त्यांचा तास ही आमच्यासाठी परवणी असे. ते कधी ऑफ तासाला आले तर पंचतंत्रातील एखादी गोष्ट सांगत. एकच गोष्ट उपलब्ध वेळेनुसार कमीअधिक करून सांगण्यात त्यांची हातोटी असे. त्यांनी गोष्ट कितीही वेळ घेऊन सांगितलेली असली तरी प्रत्येकवेळी ऐकणार्‍याला रोचक वाटे. गोष्टींप्रमाणे पुस्तकाबाहेरील संस्कृत सुभाषिते ऐकवणे हीदेखील त्यांची विशेषता होती. शुद्धलेखन आणि शुद्ध उच्चारांबाबत आग्रही असलेल्या सिधये सरांनी एकदा आम्हाला खूपच गमतीशीर सुभाषित ऐकवले.
मूर्खो वदति विष्णाय धीरो वदति विष्णवे!
तयो फलं तु तुल्यं हि भावग्राही जनार्दनः!!
याचा मी केलेला मराठी अनुवाद,
गावठी म्हणे विष्णूले पंडित म्हणे विष्णुला!
दोघांनाही समान पुण्य भाव पाहतो जनार्दन!!
म्हणजे परमेश्वर भक्ताचा भाव बघतो, त्याची प्रार्थना व्याकरणदृष्ट्या किती बरोबर आणि किती चूक हे पाहत नाही. मला हे सुभाषित खूपच आवडले. कारण ते माझ्यासारख्या सुमार बुद्धीच्या मुलासाठी खूपच आश्वासक होते. मी घरी गेल्यावर बाबांना ते ऐकवले. ते म्हणाले,
“भाव तोचि देव! गीतेच्या सतराव्या अध्यायात अर्जुन भगवंतांना याच संदर्भात प्रश्न विचारतो, जे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धापूर्वक पूजिती। त्यांची सात्विक ती निष्ठा किंवा राजस तामस।।
यावर भगवान सांगतात की प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा. पण याच्या उलट असेही अनेक लोक असतात ज्यांना ‘प्रस्थानत्रयी’ तोंडपाठ असते, त्यांना धर्माचे शास्त्र माहीत असते, पण त्यांना परमेश्वराची ओढ नसते. स्वत:ला शास्त्र समजते, याचाच त्यांना अभिमान असतो. ते आपल्या नावामागे शास्त्री, पंडित वगैरे बिरुदे लावून मिरवत असतात. ते इतरांना तुच्छ लेखतात. अशा लोकांना उद्देशून आदी शंकराचार्य ‘भज गोविंदम्’ मध्ये म्हणतात,
भज गोविंदम् भज गोविंदम् गोविंदम् भज मूढमते
संप्राप्ते सन्निही ते काले नही नही रक्षति डुकृ करणे।
म्हणजे जेव्हा मरण समोर उभे राहते तेव्हा व्याकरणाचे नियम उपयोगी पडत नाहीत. तेव्हा हे मूर्खा, गोविंदाला म्हणजे परमेश्वराला भज. दुसरे काही असेही लोक असतात, जे संपत्ती, सत्ता, चैनीच्या वस्तू वगैरे लौकिक गोष्टी साध्य करण्यासाठीच देवाला भजतात. लौकिक गोष्टी प्राप्त करणे एवढेच त्यांचे ध्येय असते. त्यांना त्यांच्या लौकिक इच्छा पूर्ण करणारे एक यंत्र म्हणून देव हवा असतो. त्यांना नवसाला पावणारा देव हवा असतो. त्यांना मुक्ती नको असते. त्यांना देवाशी तादात्म्य पावायचे नसते. त्यांच्या कल्पनेतला देव हा अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातून येणार्‍या राक्षसासारखा असतो. अशा लोकांची श्रद्धा ही राजस किंवा तामस असते.” “बाबा, धार्मिक शास्त्रांचा अभ्यास नसताना देखील माणूस देवाच्या जवळ पोचू शकतो का?” मी विचारले. “तू या प्रश्नाचा स्वतःच विचार केलास तरी तुला तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल. संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा वगैरे मंडळी धर्मशास्त्र अभ्यासायला कुठे गेली होती? त्यांनी धर्मशास्त्र शिकायचे ठरवले असते तरी त्यांना ते शिकवायला कोणता पंडित तयार झाला असता? जनाबाई तर नामदेवांच्या घरात वाढलेली अनाथ मुलगी. तिचा बहुतांश वेळ घरकाम करण्यात जायचा. कान्होपात्रा तर वेश्येची मुलगी. आणि चोखोबा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार जातीतले. पण ही सगळी मंडळी औपचारिक शास्त्र न शिकतादेखील संत झाली, मोक्षाची अधिकारी झाली. एवढेच नव्हे तर ती इतरांना अध्यात्माचा मार्ग दाखवणारी गुरू झाली,” बाबा म्हणाले. मी चोखोबांवरचा ‘ही वाट पंढरीची’ हा सिनेमा पाहीला होता. चोखोबा महार जातीत जन्मलेले. महार ही अस्पृश्य मानण्यात येणार्‍या जातींपैकी एक जात. अस्पृश्य म्हणजे भारतीय समाजातील सर्वात जास्त छळ सोसावा लागणाऱ्या जाती. अख्ख्या गावाच्याच गुलाम असलेल्या या जाती. अठरा विश्वे दारिद्र्य हेच त्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य. कष्ट, छळ आणि अवहेलना नित्याचेच. आयुष्यात नवा कपडा कधी अंगावर चढणार नाही की पोटभर कधी अन्न मिळणार नाही. अशा परिस्थितीत जगणारे चोखोबा. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘आम्हा अधिकार उच्छिष्ट सेवन!’ म्हणजे ‘उष्टे खाण्याचाच आपल्याला अधिकार’ अशी परिस्थिती. म्हणजे शास्त्र, धर्म, पुराण, स्तोत्रे कानावर पडण्याची दुरान्वयेदेखील शक्यता नाही. अशा परिस्थितीतून चोखोबा आध्यात्मिक बनतात. आणि त्यांच्या मुखाने अभंग जन्म घेतात. त्यांची भक्ती एवढी गाढ की साक्षात पांडुरंग त्यांच्या बायकोचे बाळंतपण काढायला येतो, त्यांच्यासाठी गुरे हाकतो. पण तरीही कष्ट, अवहेलना चुकत नाहीत. पंढरपुरच्या वाळवंटात भक्तीरसात बुडालेल्या चोखोबांना गावात भिंत बांधण्यासाठी जबरदस्तीने आणले जाते. ती भिंत बांधत असताना भिंत कोसळते आणि चोखोबा ढिगाऱ्याखाली गाडले जातात. सिनेमातला शेवटचा प्रसंग पाहताना बघणारा आतून हेलावल्याशिवाय रहात नाही. त्या ढिगाऱ्याखाली असलेली चोखोबांची हाडे गोळा करायला नामदेव महाराज येतात. ते प्रत्येक हाड उचलून कानापाशी नेतात. चोखोबांच्या प्रत्येक हाडातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा ध्वनि येत असतो. मी बाबांना विचारले, “चोखोबांच्या हाडांतून खरंच ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत असेल का?” “जो समाज महारांना स्पर्श करण्याच्या योग्यतेचे देखील समजत नाही, त्यांना प्राण्यांपेक्षाही कमी दर्जाचे मानतो आणि वागवतो, तो समाज चोखोबांना फुकाफुकी मोठेपण देईल असे वाटते का तुला? त्यांना संतत्व देणाऱ्या गोष्टी अशा समाजात उगीचच कुणी रचेल का? एका महाराच्या नावावर कोणी अशी प्रासादिक अभंग रचना करून ठेवेल का? चमत्कार हा नाही की चोखोबांची हाडे ‘विठ्ठल’ उच्चारात होती, चमत्कार हा आहे की जातीय विषमतेने आणि अस्पृश्यतेने बरबटलेल्या समाजात गेली तब्बल सातशे वर्षे लिखापडी न शिकलेल्या एका अस्पृश्य शेतमजूराची अभंग रचना श्रद्धापूर्वक गायली जात आहे! हा भक्तीचा महिमा आहे, ‘हृदय बंदीखाना करून, त्यात विठ्ठल कोंडणाऱ्या’ भक्तीचा महिमा आहे. त्याला शास्त्राने तोलता येणार नाही!” बाबा म्हणाले.
डॉ. रूपेश पाटकर

  • Related Posts

    पडत्या फळाची आज्ञा !

    हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.…

    “कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

    रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन! अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!