वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हा ‘खास दोस्त’ कोण?
गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)
गोव्याच्या अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील २७ लाख रुपयांचा कथित व्यवहार म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असून, विविध कामे करून देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या अजित शंखवाळकर नामक व्यक्तीचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी कथित निकटचे संबंध असल्याची चर्चा रंगली आहे.
मनोज तळेकर याने आपली अबकारी आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचा दावा करीत थेट कार्यालयात प्रवेश करून पदाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत तळेकर याने अजित शंखवाळकर याला २७ लाख रुपये दिल्याचे सांगितल्याची माहिती आहे. शंखवाळकर याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, शंखवाळकर याच्या नावाने सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका छायाचित्रामुळे चर्चेला उधाण आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयातील खुर्चीवर बसलेला हा फोटो असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यासोबत त्याचा सतत वावर असल्याने अनेकांना तोदेखील पोलिस अधिकारी असल्याचा समज होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या कथित संबंधांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
पोलिस सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार, शंखवाळकर याने सरकारी नोकऱ्या तसेच कोमुनिदाद भूखंड मिळवून देण्याच्या नावाखालीही काही व्यक्तींकडून लाखो रुपये घेतल्याचा संशय आहे. या कथित व्यवहारांची रक्कम एक कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
………
अजित शंखवाळकर याच्याविरोधात पणजी पोलिसांनी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका व्यक्तीला (अकाउंटंट) पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्र दिल्याचा आणि त्या बदल्यात २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शंखवाळकर याच्यावर आहे.





