गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा अभिमान केवळ भाषणांमधून, घोषणांमधून किंवा साहित्य संमेलनांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष व्यवहारातही दिसला पाहिजे. घरापासून शैक्षणिक संस्थांपर्यंत आणि प्रशासनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत मराठीचा वापर वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाने स्वीकारली पाहिजे. त्याचबरोबर गोव्यातील मराठी आणि कोंकणी भाषिकांनी परस्पर संघर्षाऐवजी दोन्ही भाषांना भगिनी भाषा मानून एकमेकांचा सन्मान राखावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. घनश्याम बोरकर यांनी केले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कुजिरा-बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात आयोजित नांदी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या पुढाण्याने समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग आणि लोकमान्य सहकारी संस्थेच्या सहकार्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, डॉ. नितीन संगमनेरकर, पुरुषोत्तम सप्रे आणि धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
मराठी-कोंकणी या संघर्षाच्या नव्हे, तर भगिनी भाषा
गोव्याच्या भूमीशी मराठी भाषेचा संबंध पोर्तुगीजपूर्व काळापासून असून यादवकालापासून येथे मराठीची समृद्ध परंपरा अस्तित्वात असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनात मराठीचे मोठे योगदान आहे. मात्र मराठीचा गौरव करताना कोंकणीला कमी लेखण्याची आवश्यकता नाही. दोन्ही भाषा गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या महत्त्वाच्या वाहक आहेत. दोन बहिणींप्रमाणे या भाषांनी परस्परांच्या प्रगतीला हातभार लावावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव वाढत असताना मातृभाषेकडे दुर्लक्ष होऊ नये. मराठीत संवाद साधणे शक्य असतानाही इंग्रजीचा आग्रह धरणे, मराठीत स्वाक्षरी करता येत असूनही इंग्रजीत सही करणे, ही मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दर्जेदार साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांची विचारक्षमता विकसित होते. केवळ माहिती मिळविण्यापेक्षा त्या माहितीचे आकलन करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची आहे. त्यासाठी नव्या पिढीचा ‘विज्डम कोशंट’ वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
गोव्याचे थोर कवी बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करताना त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सरकारने दहा हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
शतकमहोत्सवी संमेलनानिमित्त देशभर नांदी संमेलने
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील ९९ ठिकाणी नांदी संमेलने आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती योगेश सोमण यांनी दिली.
आतापर्यंत २६ नांदी संमेलने पूर्ण झाली असून नोव्हेंबरअखेरीस ३२ आणि डिसेंबरअखेरीस ५३ संमेलने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य संमेलनात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा साहित्यविश्वावर होणारा परिणाम यावर विशेष विचारमंथन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने काही सेकंदांत मराठी सुनीत तयार करणाऱ्या रोबोटिक साहित्यिकाची संकल्पनाही सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वागताध्यक्ष किरण ठाकूर यांनी मराठी साहित्य संमेलनांच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा गौरव करताना यापूर्वी संमेलने झालेल्या विविध ठिकाणांच्या साहित्यिक योगदानाला उजाळा देण्यासाठी नांदी संमेलने आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. गोव्याने मराठी साहित्याला अनेक नामवंत कवी, लेखक आणि नाटककार दिले आहेत. या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्याच्या मराठी साहित्यिक वारशाचे जतन आवश्यक
माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी पोर्तुगीज राजवटीतील प्रतिकूल परिस्थितीतही गोमंतकीयांनी मराठी भाषा आणि शिक्षणाची परंपरा जिवंत ठेवल्याचे सांगितले. पूर्वजांनी केलेल्या त्यागामुळेच आज मराठी भाषेचा विकास झाला असून त्यांच्या योगदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी गोव्याच्या मराठी साहित्यिक योगदानाचे पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रादेशिक कादंबरी, नाटक आणि गुप्तहेर कादंबरीसारख्या साहित्यप्रकारांत गोमंतकीय साहित्यिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णदास शामा यांच्या ‘श्रीकृष्ण चरित्रकथा’ ग्रंथाच्या लेखनाला ५०० वर्षे पूर्ण होत असल्याचा विशेष योगही त्यांनी अधोरेखित केला.
साहित्यिक संस्थांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन प्रा. सामंत यांनी केले.
धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी महाविद्यालयाच्या साठ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत मराठी, कोंकणी आणि हिंदी भाषांमधील साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले. मराठीचा अभिमान बाळगताना कोंकणीविषयी कोणताही आकस नसून दोन्ही भाषा गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. गोव्यातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





