हात दाखवून अवलक्षण !

काँग्रेस पक्षातील घडामोडी सामान्य गोंयकारांचा भ्रमनिरास करणाऱ्या ठरल्या आहेत हे मात्र नक्की.

स्वतःहून संकट ओढवून घेण्याला “हात दाखवून अवलक्षण” असे म्हणण्याची प्रथा आहे. काँग्रेसचे राजकीय चिन्ह “हात” असून, तो हात बळकट करून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याऐवजी काँग्रेस पक्ष स्वतःच संकट ओढवून घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर पक्ष संघटना अंतर्गत स्पर्धा आणि स्वहिताच्या मनोवृत्तीने जखडली गेली आहे. भाजपच्या पराभवासाठी आवश्यक पात्रता काँग्रेसने गमावली आहे. संघटन कौशल्य आणि संघटन शक्तीच्या आधारे भाजपचा पराभव करण्याऐवजी लोकक्षोभावर राजकीय पोळी भाजण्याचे स्वप्न पाहणारा हा प्रमुख विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी अडचण ठरू लागला आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
राज्यात विधानसभा निवडणुकांना अवघे चौदा महिनेच शिल्लक असताना पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष बदलाचे वारे घोंगावत आहेत. गिरीश चोडणकर हे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. दिल्लीतील राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी राखून हे पद मिळवणे त्यांच्यासाठी सोपे आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा होणार होती, पण विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षात प्रचंड संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गटांनी सामूहिक राजीनाम्याचा शस्त्र उगारल्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाच्या चिंधड्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोव्यात ४ ऑक्टोबर रोजी भव्य स्वागत होणार की काय, असा उपहासात्मक प्रश्न एका ज्येष्ठ पत्रकार स्नेहीने उपस्थित केला.
गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले नशीब आजमावले आहे, मग अमित पाटकर यांना एक संधी का दिली जाऊ नये? ते एक युवा चेहरा असून उत्साही आहेत आणि पक्षाची आर्थिक धुरा सांभाळण्याचीही क्षमता त्यांच्यात आहे. अशा वेळी त्यांचे हात बळकट करण्याऐवजी चोडणकर समर्थक गटाकडून पाटकर यांच्याविरोधात सुरू असलेल्या कुरघोड्या आता लपून राहिलेल्या नाहीत. पाटकर अध्यक्ष झाल्यानंतर चोडणकर समर्थक गटाने आपले लक्षच काढून घेतले. गिरीश दिल्लीला पोहोचल्यामुळे गोवा काँग्रेसला त्याचा फायदा होईल, पक्षातील निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि केंद्रीय नेतृत्व नेत्यांना कामाला लावेल, अशी अपेक्षा होती.
काँग्रेस पक्षात सध्या एकमेकांवरील विश्वासाचा अभाव हा प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला भाजपच्या जवळीक असल्याच्या शंकेच्या नजरेतून पाहत आहे. काँग्रेस नेते स्वतःहूनच एकमेकांची बदनामी करत आहेत. सत्ताधारी भाजपसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. दिल्लीनंतर गोवा काँग्रेसमुक्त करण्याची योजना प्रत्यक्षात आणण्याची नामी संधी भाजपला मिळणार आहे. दुसरीकडे, आपचे नेते अरविंद केजरीवाल देखील काँग्रेसवर झडप घालण्यासाठी आतुर आहेत. काँग्रेस पक्ष सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे आणि त्यामुळे केजरीवाल त्यांच्या बळावर स्वतःच्या पक्षाचे ब्रँडिंग जोरात करत आहेत. आता ४ ऑक्टोबर रोजी तेही गोव्यात दाखल होत आहेत. हे सगळे अजाणतेपणे होत आहे असे मानणे अशक्य आहे; हे राजकीय व्यूहरचनेचा भागच आहे.
अलिकडेच अमित पाटकर यांनी सर्व ४० मतदारसंघांत बीएलएची नियुक्ती केली होती. यापूर्वी हे कधीच घडले नव्हते. बीएलए म्हणजे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता, जो पक्षासाठी महत्त्वाचा असतो. अशा कार्यकर्त्यांना शोधून जबाबदारी देण्याचे काम पाटकर यांनी केले. ते संघटन उभे करण्यात यशस्वी ठरले, तर पक्षातील महत्त्वाच्या पदांवर घुसखोरी करता येणार नाही, हे लक्षात घेऊनच काही लोकांनी पाटकर यांना अपशकून करण्याचा प्रयत्न केला असावा. काँग्रेस पक्षातील घडामोडी सामान्य गोंयकारांचा भ्रमनिरास करणाऱ्या ठरल्या आहेत हे मात्र नक्की.

  • Related Posts

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    उटाचा मेळावा कारापूरात का नको ?

    मेळावा क्रांती मैदानावर का, कारापूरच्या आंदोलनस्थळी का नाही? हा प्रश्न उटा संघटनेच्या नेतृत्वाला समाजबांधवांनी विचारला पाहिजे. उटा संघटनेचा नियोजित आझाद मैदानावरील मेळावा आता म्हार्दोळ येथील क्रांती मैदानावर होणार आहे. राजकीय…

    You Missed

    13/08/2026 e-paper

    13/08/2026 e-paper

    रोजगार: आभास आणि वास्तव

    रोजगार: आभास आणि वास्तव

    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    12/08/2026 e-paper

    12/08/2026 e-paper

    “आज नाही तर कधीच नाही”

    “आज नाही तर कधीच नाही”