डॉ. लोहिया यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी लढा दिला; आता गोव्याच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागेल : के. सी. वेणुगोपाल

पणजी, दि. ४ जुलै : “डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी लढा दिला होता, आज गोव्याच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी लढा देण्याची वेळ आली आहे,” असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

दोना पावला येथे आयोजित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार एल्टन डी’कोस्ता, आमदार कार्लोस फेरेरा तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वेणुगोपाल म्हणाले, “जमीन ही माणसासाठी सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. मात्र भाजप सरकार गोव्याची जमीन विकण्याचे काम करत आहे. मौल्यवान जमिनी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातल्या जात आहेत. गोव्याचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. त्यामुळे भाजपच्या कुशासनाविरोधात जनतेने निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा राज्याचा मुख्यमंत्रीच भ्रष्ट असेल, तेव्हा राज्याचा विकास होणे अशक्य आहे. बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था अशा प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेला दिलेली आश्वासनेही पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.”

गोव्याच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, गोवा मुक्ती आंदोलनापासून राज्याचा दर्जा मिळवून देणे आणि कोंकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यापर्यंत काँग्रेसने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गोव्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर टीका करताना वेणुगोपाल म्हणाले की, गेल्या चार वर्षांत राज्यात १२७ खून, ३८३ बलात्कार, २,११३ चोरी, घरफोडी व दरोड्याच्या घटना, ३५४ अपहरण आणि १,१२७ मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब असून राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

गोव्याच्या संरक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस समिती कडून संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही देताना ते म्हणाले, “धर्माचा वापर राजकारणासाठी करू नये, मात्र भाजप समाजात धार्मिक ध्रुवीकरण करून लोकांमध्ये फूट पाडत आहे. एवढेच नव्हे, तर मंदिरांमधील गरीब भाविकांच्या अर्पणावरही डल्ला मारला जात आहे.”

अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “या प्रकरणावर भाजप आणि पंतप्रधान मौन का बाळगून आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींना तातडीने अटक करण्यात यावी.”

वेणुगोपाल यांनी विश्वास व्यक्त केला की, २०२९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. “राहुल गांधी युवक, विद्यार्थी आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे ते निश्चितच देशाचे नेतृत्व करतील,” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजप ज्या जनतेच्या प्रश्नांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे, ते प्रश्न काँग्रेसने प्रभावीपणे लोकांसमोर मांडले पाहिजेत, जेणेकरून जनतेला न्याय आणि त्यांचे हक्क मिळू शकतील.

गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, भाजप काँग्रेसविरोधात खोटे कथानक उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता सत्य जाणून आहे आणि अशा प्रचाराचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. विरोधी पक्ष एकत्र येत असल्यामुळे भाजप घाबरले असून, एकजूट झाल्यास त्यांचा पराभव निश्चित असल्याची त्यांना जाणीव झाली आहे.

के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केल्याचे सांगताना चोडणकर म्हणाले की, २०२७ मध्ये गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. गोव्याचे रक्षण करण्यासाठी जनतेची भावना लक्षात घेऊन सर्व विरोधी पक्ष एकत्र काम करतील, असे ते पुढे म्हणाले.

युरी आलेमाव यांनी सर्वांना “गोवा राखण यात्रा” यशस्वी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “भाजप धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याची संस्कृती आणि सामाजिक सलोखा कधीच असा नव्हता. भाजपचे हे षड्यंत्र जनतेसमोर उघड करून गोव्याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे.”

  • Related Posts

    Enough is Enough to Intensify Agitation; General Council Announces Tougher Action on 10-Point Charter

    The Enough is Enough, Goa movement, led by Retd. Justice Ferdino Rebello, has resolved to intensify its agitation against the Government’s disregard for public concerns over Goa’s land, environment, and governance. The General Council reviewed its 10-Point Charter of Demands and announced plans for more aggressive public campaigns and protest programmes across the state.

    डीडीएसएसवायचा विस्तार करा; प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण द्या : अरविंद केजरीवाल

    पणजी, दि. ४ जुलै : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील आरोग्य व्यवस्थेवर टीका करत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला कोणत्याही अटींशिवाय १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याची मागणी…

    You Missed

    Enough is Enough to Intensify Agitation; General Council Announces Tougher Action on 10-Point Charter

    Enough is Enough to Intensify Agitation; General Council Announces Tougher Action on 10-Point Charter

    डीडीएसएसवायचा विस्तार करा; प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण द्या : अरविंद केजरीवाल

    डीडीएसएसवायचा विस्तार करा; प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण द्या : अरविंद केजरीवाल

    डॉ. लोहिया यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी लढा दिला; आता गोव्याच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागेल : के. सी. वेणुगोपाल

    डॉ. लोहिया यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी लढा दिला; आता गोव्याच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागेल : के. सी. वेणुगोपाल

    04/07/2026 e-paper

    04/07/2026 e-paper

    करिअर की संस्कृती ?

    करिअर की संस्कृती ?

    वेणुगोपाल यांच्यासमोर एकजुटीची परेड

    वेणुगोपाल यांच्यासमोर एकजुटीची परेड