२०२२ मधील तीन मोफत गॅस सिलेंडर आणि १६ हजार लिटर मोफत पाणी योजनेचे काय झाले, असा सवाल
मडगाव, दि. ४ : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायद्यांपेक्षा घोषणांवर अधिक भर दिला असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार पुन्हा एकदा फसव्या आश्वासनांचा ‘गाजरांचा पाऊस’ पाडत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी २०२२ मध्ये महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी कितपत झाली, असा सवाल चोडणकर यांनी उपस्थित केला. आता पुन्हा एलपीजी सहाय्याची नवी योजना जाहीर करण्यात आली असली तरी, सरकारला खरोखर महिलांची काळजी असेल तर ही मदत २०२२ पासून लागू करावी, असे त्यांनी म्हटले.
सरकारच्या १६ हजार लिटर मोफत पाणी योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाण्याच्या या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठे आणि किती प्रमाणात झाली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
गोव्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे सरकार मोठ्या प्रमाणात घोषणा करत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारे घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित गोवा दौऱ्यावरही चोडणकर यांनी टीका केली. भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने होणाऱ्या या दौऱ्याचा वापर पुन्हा एकदा राजकीय प्रचार आणि भाषणबाजीसाठी केला जाईल, असा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या धोरणांबाबत आणि आश्वासनांबाबत जनतेमध्ये आता जागरूकता वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये मतदार सरकारच्या कामगिरीचा हिशेब मागतील, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात बदलाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगत, गोव्यातील जनतेनेही भाजपच्या अपूर्ण आश्वासनांचा आणि कारभाराचा विचार करून आगामी निवडणुकांत निर्णय घ्यावा, असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले.





