गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) : हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत पत्रकार साईप्रसाद कुबडे यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश द्यावेत. तसेच हल्ल्यात सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष उदय सावंत आणि सचिव बी. डी. मोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.
संघटनेचे सभासद असलेले पत्रकार साईप्रसाद कुबडे यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली. संबंधित पोलीस निरीक्षकांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष तपास करावा. हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे संघटनेने म्हटले आहे.
पत्रकार हे लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून समाजातील अन्याय, गैरप्रकार आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या निर्भीडपणे मांडण्याचे काम करतात. अशा पत्रकारांवर हल्ले होणे किंवा त्यांना धमकावण्याचे प्रकार घडणे ही लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार स्थानिक प्रश्नांना वाचा फोडत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकार आणि पोलीस प्रशासनाने स्वीकारली पाहिजे, असे संघटनेने स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पत्रकार कुबडे यांना न्याय मिळवून द्यावा. पत्रकारांवरील हल्ले आणि दबावाचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा इशारा संघटनेने दिला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या मागणीसंदर्भात हणजूण पोलीस निरीक्षकांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले आहे असे उदय सावंत आणि सचिव बी. डी. मोटे यांनी स्पष्ट केले आहे.





