मुख्यमंत्री म्हणतात भिवपाची गरज ना
गांवकारी,दि.२४(प्रतिनिधी)
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री उत्पल पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची भेट भाजपचे संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याशी झाल्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अनभिज्ञता हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता माजी नेत्यांना पक्षात फेरप्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे सरकारातील मंत्री, आमदार अस्वस्थ बनले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारातील मंत्री, आमदारांनी काळजी करण्याची गरज नाही,असे सुतोवाच दिले आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा भाजपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे २७ रोजी आगमन होणार आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीला ते संबोधीत करणार आहेत. हा मुहुर्त साधून उत्पल आणि पार्सेकरांना फेरप्रवेश दिला जाणार आहे का, अशी उत्सुकता पक्षात सुरू झाली आहे.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या भाजपमधील संभाव्य पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पुनरागमनाबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत असतानाच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्ष बळकट करण्यासाठी इच्छुक नेत्यांचे स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे.
शिवप्रकाश यांनी या दोघांच्या पुनरागमनाबाबत थेट भाष्य करण्याचे टाळले. या विषयावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक भूमिका स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. आपली भेट घेणाऱ्यांमध्ये केवळ पार्सेकर आणि उत्पलच नव्हे, तर भाजपचे अनेक कार्यकर्ते होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येणाऱ्या नेत्यांचे स्वागत करण्यास भाजप तयार असल्याचे म्हटले आहे.
बाबूश यांचा हिरवा कंदील?
उत्पल पर्रीकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. उत्पल यांनी भाजप सोडायलाच नको होता. उशिरा का होईना, त्यांचे पुनरागमन होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे मोन्सेरात यांनी म्हटले. आपल्याला स्वतः मनोहर पर्रीकर यांनी भाजपमध्ये आणले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. उत्पल यांच्या पुनरागमनाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, त्याला आपला विरोध नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.





