म्हापसा पोलिसांचा तपास सुरू: विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
—————————————————————————–
गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी)
दिवाळीच्या सायंकाळी म्हापसा येथे एका चिमुरडीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी, तसेच राज्यातील बालसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
म्हापसा बाजारपेठेत दिवाळीनिमित्त फुगे विक्रीसाठी आलेल्या एका कुटुंबातील चिमुरडीचे रविवारी सायंकाळी कथित अपहरण करून तिला लोहिया उद्यानाजवळील एका पडक्या इमारतीत नेण्यात आल्याचे वृत्त आहे. या मुलीचे वय चार वर्षे असल्याचे काही वृत्तांत नमूद करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी स्थानकाजवळील निर्जन इमारतीबाहेर ही चिमुरडी विवस्त्र अवस्थेत रडताना आढळली. एका वाटसरूने तत्काळ तिच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पीडित बालिकेला सुरुवातीला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) हलविण्यात आले. सुरुवातीला तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त होते. मात्र, नंतर पोलिसांनी तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी रविवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली जात आहे. घटनेचा क्रम स्पष्ट करून संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न म्हापसा पोलिसांकडून सुरू आहेत.
गोव्यात बालकांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक : युरी आलेमाव
या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पीडित बालिकेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण देण्याची मागणी केली. तिच्या कुटुंबीयांनाही सर्वतोपरी मदत मिळावी आणि बालिकेची ओळख गोपनीय ठेवली जावी, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कालबद्ध तपास आणि जलदगती न्यायालयामार्फत खटला चालवावा, अशी मागणी आलेमाव यांनी केली.
या अमानुष गुन्ह्यातील आरोपीला तातडीने पकडले पाहिजे. तपासात कोणताही विलंब किंवा आरोपीबाबत कोणतीही दयामाया खपवून घेतली जाणार नाही, असे आलेमाव म्हणाले.
वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? : गिरीश चोडणकर
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
म्हापशाच्या मध्यवर्ती भागातील लोहिया उद्यानाजवळील ज्या पडक्या इमारतीत हा कथित गुन्हा घडला, त्या परिसरात वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांचा गैरवापर आणि अन्य बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच प्रसारमाध्यमांनी वारंवार चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही, असा सवाल चोडणकर यांनी केला.
या परिसरातील असुरक्षित परिस्थितीबाबत यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींचे काय झाले? पोलिसांनी या इमारतीची तपासणी केली होती का? परिसरात नियमित पोलीस गस्त होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहखात्याने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली.
पीडित बालिकेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार, मानसिक आधार, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच तिची ओळख आणि प्रतिष्ठा अबाधित राहील याची विशेष काळजी घेण्याची मागणी चोडणकर यांनी केली.





