दारूबंदी… धर्मानंद कोसंबी यांचे व्याख्यान डॉ.रूपेश पाटकर (मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक)

आज ९ ऑक्टोबर आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी यांची जयंती. त्यानिमित्ताने कुमारवय ‘निराशा आणि संभ्रम’ यात गेलेला साधासुधा माणूसदेखील एखाद्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने कसा बदलू शकतो, याचे चिंतन करण्यासाठी हा छोटेखानी लेख.

मला बराच काळ हा प्रश्न पडत असे की ‘एखाद्या विचारधारेचा, एखाद्या संप्रदायाचा स्विकार केल्यामुळे माणसे बदलतात का ?
असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे एखाद्या विचारधारेचे आपण पाईक आहोत किंवा एखाद्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत, अशी जाहीर घोषणा करणारी माणसे प्रत्यक्ष जीवनात मला बदलाताना दिसत नव्हती. ना त्यांच्या विचार करण्यात काही बदल दिसे, ना त्यांच्या वागणूकीत.
पण मला असा एक माणूस भेटला की ज्याने बौद्ध धम्माचा स्विकार केल्यानंतर तो पूर्णपणे बदलून गेला. या माणसाने त्याला नोकरी देणाऱ्या व्यवस्थापनाकडे आपल्या पगाराची अपेक्षा व्यक्त करताना आपल्याला का अमुक इतक्या पगाराची गरज आहे ते सांगितले. त्याची विद्वत्ता इतकी होती की व्यवस्थापनाने त्याच्या अपेक्षेप्रमाणे पगार मान्य करून त्याला कामावर ठेवले. काही महिने काम केल्यानंतर या माणसाने एक चमत्कारिक पत्र व्यवस्थापनाला लिहीले. त्यात त्याने सांगितले की ‘ज्या कारणासाठी मी वाढीव पगार मागितला होता, ती माझी गरज आता पूर्ण झाली आहे. आता मला उदरनिर्वाहासाठी इतक्या जास्त रकमेची गरज नाही. तेव्हा माझा पगार कमी करावा !’
कधी अशा पत्राची आपण कल्पना तरी करू शकतो का? पण असा माणूस या पृथ्वीच्या पाठीवर होऊन गेला आणि तो देखील चक्क या गोमंतभूमीत.
त्याचा जन्म १८७६ चा, सांकवाळचा. जो गांव आज आपल्या अस्तित्वासाठी लढतो आहे. सारस्वत कुटूंबात जन्मलेल्या आणि जेमतेम पाचवी शिकलेल्या या माणसाचे कुमारवय निराशेने घेरलेले होते. या निराशेवर मात करण्याचा उपाय भगवान बुद्धांकडे असेल असे त्याला भगवान बुद्धांचे छोटेसे चरित्र वाचून वाटले.
वयाच्या तेविसाव्या वर्षी (१८९९ च्या डिसेंबरात) बौद्ध दर्शनाचा माग घेण्यासाठी त्याने घर सोडले. घर सोडले तेव्हा वडिलांचे निधन होऊन दीड वर्ष झाले होते. दोन महिन्यांची मुलगी होती. हातात प्रवासासाठी पैसा नव्हता. तरीही तो निघाला.
पुणे, ग्वाल्हेर, उज्जैन, वाराणसी करत त्याने मोठ्या कष्टाने नेपाळ गाठले. सव्वाशे वर्षापूर्वीचा हा प्रवास होता. तेव्हा ना मांडवीवर पूल होता, ना झुआरीवर!
जेव्हा हा बौद्ध धम्माच्या शोधात नेपाळला पोचला तेव्हा तेथील भिक्खूना बघून त्याची निराशाच झाली. कारण ते तिथे लोकांना चक्क भविष्य सांगण्याचा उद्योग करत होते. आपली ही यात्रा अपयशी ठरल्याचे जाणवत असतानाच त्यांना बोधगयेला जाण्याचे कोणीतरी सुचवले. म्हणून या माणसाने बोधगयेचा रस्ता धरला. बोधगयेत समजले की बौद्ध दर्शन शिकायचे असेल तर श्रीलंकेत जायला हवे. मग कलकत्ता, मद्रास करत तो श्रीलंकेत पोचला. तिथे सिंहली लिपीत लिहीलेले पाली भाषेतील बौद्ध वाङमय अभ्यासता आले. अशा तब्बल सात वर्षांच्या ध्यासपर्वानंतर हा माणूस कलकत्यात आला, तेव्हा तो बौद्ध पंडीत तर झाला होताच, शिवाय संस्कृत, पाली आणि इंग्लिश या तीन भाषांत तरबेजही झाला होता. या गोवेकराचे नाव धर्मानंद कोसंबी!
धर्मानंदांना कलकत्ता विद्यापीठाने पाली भाषेचा प्राध्यापक म्हणून रुजू करून घेतले. पण धर्मानंदानी थोडेच प्राध्यापकी करण्यासी बौद्ध वाङमय अभ्यासले होते. दुःख मुक्तीचा मार्ग म्हणून त्यांनी तो स्विकारला होता. आपल्याला सापडलेल्या या मार्गाचा मराठी मुलखात प्रचार प्रसार करावा हे त्यांचे ध्येय होते. पण उदरनिर्वाह चालणेदेखील गरजेचे होते. म्हणून त्यांनी यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे महिन्याकाठी पन्नास रुपयांची फेलोशिप मागितली. त्यावेळेस कलकत्ता विद्यापीठातील त्यांचा पगार होता दीडशे रुपये. तोदेखील विद्यापीठाने वाढवून अडीचशे रुपये केला. पण धर्मानंदानी पाचपट जास्त पगारावर पाणी सोडत पन्नास रुपयांची फेलोशिप स्वीकारली.
फेलोशिपसाठी धर्मानंदांवर दोन अटी होत्या. एक म्हणजे त्यांनी संस्थानसाठी वर्षाला एखादे पुस्तक लिहीणे आणि दुसरे म्हणजे दरबारासाठी काही व्याख्याने देणे. असेच व्याख्यान बडोद्याच्या दरबारात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खुद्द सयाजीराव अध्यक्ष होते. त्या दिवशीच्या व्याख्यानाचा विषय होता ‘सम्राट अशोक’. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी संस्थानाच्या एका भागातील काही मंडळी महाराजांकडे निवेदन घेऊन आली होती. त्यांची मागणी होती, त्यांच्या भागात दारूबंदी करण्याची. महाराज त्यांना म्हणाले,’दारूच्या विक्रीमुळे संस्थानाला महसूल मिळतो. महसूलाशिवाय कारभार कसा चालवता येईल. जर तुम्ही दारूबंदीमुळे गमवाव्या लागणाऱ्या महसुलाइतकी रक्कम मिळवून देणारा महसूलाचा दुसरा काही मार्ग सुचवाल तर दारूबंदी करेन!’ धर्मानंदानी हा संवाद ऐकला.
त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम सुरू झाला. धर्मानंद बोलायला उभे राहीले. ते म्हणाले, ‘सम्राट अशोकाने आपल्या राज्यात दारूबंदी केली होती. पण त्यासाठी प्रजेकडे महसुलाचा पर्याय मागितला नव्हता!’ हे शब्द कानी पडताच अध्यक्षपदी असलेले महाराज उठून निघून गेले. महाराज धर्मानंदांच्या शब्दांमुळे संतापून निघून गेलेत असे सर्वांना वाटणे साहजिक होते. थोड्या वेळाने महाराज परत आले आणि अध्यक्षीय मनोगतासाठी उभे राहिले. ते म्हणाले, ‘भले डोळे उघडलेत. मी दारूबंदीच्या हुकूमावर सही करून आलो!’
डॉ. रूपेश पाटकर

  • Related Posts

    सूर्याचे लग्न !

    (सध्या क्रिकेटचे सामने गावोगावी भरवले जात आहेत. हे केवळ खेळणे नसते. हे सेलिब्रेशन असते. त्यासाठी हजारो रुपयांची देणगी देणारे प्रायोजक असतात. हे सामने बघितले की मला इसपाने सांगितलेली ‘सूर्याचे लग्न’…

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नाईक कुलभूषण दामू भाजपाध्यक्ष नूतनअपेक्षित आता सच्चा भाजपाईंना चैतन्यमय परिवर्तन||धृ|| गत कैक वर्षात भाजपाला आली केवळ असह्य सूजस्वार्थास्तव पक्षात आलेल्यांचा पदोपदी जाणवतो माजसंघ,तत्व अन् विचारनिष्ठांना वाटते प्रचंड लाजअश्रू ओघळती त्यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!