भाऊसाहेब नावाचा गलिव्हर…!

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ
भाऊसाहेब बांदोडकर यांची आज ५२ वी पुण्यतिथी.

गोव्यातील परिवर्तनवादी लेखक राजाराम रंगाजी पैंगीणकर यांनी ‘मी कोण?’ हे आत्मचरित्र लिहून येथील चंगळवादी समाजाने निर्माण केलेल्या अमानुष देवदासी प्रथेची लक्तरे प्रथम वेशीवर टांगली. येथील सामाजिक बदलाची आणि सामूहिक पुरूषार्थ जागविण्याची ती जणू नांदी ठरली. या वैचारिक घुसळणीतून पुढे आलेल्या भाऊसाहेब बांदोडकर नावाच्या परिवर्तनशील नेत्यामुळे गोमंतक गायक मराठा ते गोमंतक मराठा अशी या समाजाची क्रांतिकारी वाटचाल सुरू झाली.
१९ डिसेंबर १९६१ रोजी साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाला. दरम्यानच्या काळात मुक्त गोव्याची नीट घडी बसवण्याचे विविध पातळीवर प्रयत्न झाले. तत्कालीन गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी २१ फेब्रुवारी १९६३ रोजी केंद्र शासित प्रदेशासोबत गोवा दमण दीवला कायदेमंडळ व मंत्रिमंडळ देण्याची तरदूत असलेले विधेयक संसदेत मांडले आणि गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले.
२० मे १९६३ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू गोव्यात दाखल झाले. पणजी आणि मडगावातील सभांमधून त्यांनी गोव्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार केला. पंतप्रधान नेहरूंना मंगेश देवस्थान दर्शनासाठी नेण्यात आले. त्यावेळी काही दलित मंडळींनी ‘आम्हाला मंदिर प्रवेश द्या’ असे फलक दर्शवून नेहरूंना गोव्यातील सामाजिक भेदभावाची जाणीव करून दिली. पण नेहरूंनी त्यावर प्रतिक्रिया न देता मौन बाळगले, याचे त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले.
मुक्त गोव्यातील पहिल्या वहिल्या निवडणुकीत नेहरूंच्या स्थानिक चेल्यांनी पक्षाची सर्वाधिक तिकिटे येथील सारस्वत म्हणजे ‘बामण’ समाजाला दिली. त्याचा राग म्हणून भाऊंनी काँग्रेसला राम राम केला आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना करत बहुजनवादी राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. मुक्त गोव्यात भाऊंना ‘महाराष्ट्रवादी’ पक्ष का स्थापन करावा वाटला, याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ लेखक वामन राधाकृष्ण यांच्या ‘मुक्तिनंतरचा गोवा’ या पुस्तकात आले आहे. त्यात भाऊसाहेब बांदोडकर यांचे उद्गार त्यांनी नोंदवले आहेत ते असे-” ….जे देशी वसाहतवादी एका रात्रीत टोपी फिरवून देशभक्त म्हणून मिरवू लागले तेच लोक पुन्हा नव्या राजवटीत बहुजन समाजाचे शोषण करणार ही वस्तुस्थिती मी हेरली व गोव्याच्या आशाआकांक्षा ज्या महाराष्ट्र प्रदेशाशी निगडीत आहेत त्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यास जाऊन भेटलो.”
पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने २८ पैकी १६ जागा जिंकल्या. युनायटेड गोवन्स पक्षाने १२ जागा मिळवल्या. काँग्रेसचे या निवडणुकीत पानिपत झाले. नामवंत स्वातंत्र्यसैनिक देखील काँग्रेस तिकिटावर विजयी होऊ शकले नाही. पुढे बॅरिस्टर नाथ पै व वसंतराव नाईक यांच्या आग्रहापोटी भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
भारतातील पहिले साम्यवादी नेते एम. एन. रॉय यांच्या विचारांचा भाऊसाहेबांवर असलेला प्रभाव त्यांच्या अनेक कृतीतून वेळोवेळी व्यक्त झालेला आहे. भाऊंनी केलेले कायदे, सामाजिक सुधारणा, शैक्षणिक उपक्रम, उभे केलेले प्रकल्प, राबवलेल्या योजना यातून त्याचे प्रतिबिंब दिसते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याही आधी वैश्विक नेते बनलेले एम. एन. रॉय हे मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद आणि शेवटी नवमानवतावादापर्यंत येऊन पोहोचले होते. रशियन राज्यक्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन यांचे मार्गदर्शक मित्र बनलेल्या रॉय यांचे राष्ट्रवादाच्या मुद्यावर रशियन साम्यवाद्यांशी मतभेद झाले. या मतभेदामुळेच रॉय यांनी रशिया सोडला. दरम्यान ते मेक्सिकोमध्ये गेले. तिथे त्यांनी सोशलिस्ट पार्टी स्थापन केली. मेक्सिकोच्या पहिल्या राष्ट्रपतींचे काही काळ सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. ‘फिलॉसॉफी ऑफ मॉर्डन सायन्स’ या शीर्षकाचा त्यांचा लेख वाचून आल्बर्ट आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ रॉय यांचे चाहते बनले. भारतीय राज्यघटनेचा पहिला मसूदा एम. एन.रॉय यांनी तयार केला होता. पण गांधीजींनी तो अतिवादी असल्याचे सांगत नाकारला. स्वतंत्र भारताची नवी राज्यघटना लिहिण्याचे आव्हान मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले. त्यानंतर कुठे भारताची स्वतःची राज्यघटना आकारास आली.
रॉयवादी असण्याबरोबरच भाऊसाहेब बांदोडकर हे नित्य नव्या वैचारिक प्रवाहांचे स्वागत करणारे आधुनिक विचारांचे सुधारणावादी होते. म्हणून तर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू, बाबासाहेब आंबेडकर या त्रयींच्या विचारांचा वसा आणि वारसा गोव्यासाठी स्वीकारला पाहिजे, असे भाऊसाहेबांना वाटायचे. परकीय पोर्तुगीज राजवटीत तब्बल साडेचार शतके खितपत पडलेली गोमंतभूमी नव्या विचारांनी नांगरण्याचे स्वप्न ते पाहात होते. पण त्यासाठीचा पुरेसा वेळ आणि अनुकूल स्थिती त्यांना मिळू शकली नाही. अन्यथा आजच्या गोव्याचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. आजही भाऊसाहेब हे गलिव्हर तर बाकी नेते लिलीपूट वाटावेत अशीच स्थिती आहे.
नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात १९६७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूचा पुतळा उभारायचे ठरले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी जनतेला निधीसाठी आवाहन केले. आंबेडकरी समाजाने लोक वर्गणीतून निधी गोळा केला. त्यात २५ हजार रुपये कमी पडत होते. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाऊसाहेब बांदोडकर एकदा यशवंतराव चव्हाण यांना भेटायला गेले होते. त्यावेळी यशवंतरावांनी भाऊंना विचारले, ‘प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असे कार्य केलेल्या बाबासाहेबांचा पुतळा संसदेसमोर लोकवर्गणीतून उभा राहात आहे. त्यात गोव्याचा सहभाग असणार आहे की नाही?’ भाऊंनी सांगितले, बाबासाहेब आमचेही प्रेरणा पुरूष आहेत. सांगा आमचा वाटा किती? यशवंतरावांनी आकडा सांगताच भाऊंनी तत्काळ धनादेश पाठवून दिला.
या क्षणाचे साक्षीदार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपूत्र यशवंत ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनी ती आठवण ठेवली. भाऊसाहेब बांदोडकर यांना खास समारंभासाठी आमंत्रित करून मुंबईत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. भाऊंचे दातृत्व गोव्यात सर्वपरिचित होतेच. मुंबईतील सत्काराने दानशूर भाऊ देशाला ठाऊक झाले.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक तथा सांस्कृतिक वाटचालीची त्याच तोलामोलाची चिकित्सा गोव्यात अजूनही पुरेशी झालेली नाही. भाऊंचा राजकीय वारसा पुढे चालवलेल्या त्यांच्या कन्या तथा गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर या त्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण त्यांच्या निधनामुळे भाऊंच्या समग्र कर्तबगारीचा आढावा घेण्याचे काम अजूनही बाकी राहिले आहे. ते होणे हीच भाऊंना खरी आदरांजली ठरेल.
— प्रभाकर ढगे
(फेसबुक पोस्टवरून हा लेख वापरला आहे )

  • Related Posts

    MLAs Cannot Control Behaviour of Pass Holders

    GFP MLA Vijay Sardesai responds to the notice of speaker in Assembly Panaji, 10 : Vijai Sardesai on Tuesday responded in the Goa Legislative Assembly after Speaker Dr. Ganesh Gaonkar…

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi