सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांचे आवाहन
पणजी,दि.१(प्रतिनिधी)-
आपल्या गोव्याच्या रक्षणासाठी प्रत्येकाने वेळ काढून काही मिनिटे जरी दिली तरीही मोठा फरक पडू शकतो. या नव्या वर्षांत मातृभूमीचे ऋण फेडण्याचा संकल्प करू, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केले.
आपल्या गोव्यासमोर असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांना एकत्रित यश मिळण्यासाठी प्रत्येकाने किमान दिवसातील पाच मिनिटे गोव्यासाठी द्यावीत,असेही आवाहन शेर्लेकर यांनी दिली.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्या क्षेत्रापूरती जरी गोव्याचा विकास केला तरीही ते फायद्याचे ठरेल. गोव्याच्या जमीनींचे गैरव्यवहार सुरू आहेत. त्याबाबतचे वास्तव समजुन घेऊन लोकजागृती करणे आणि सत्य परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या गांवचा जरी विचार केला तरीही संपूर्ण गोव्याचा विचार होऊ शकेल,असेही शेर्लेकर म्हणाले. आपल्या गावांत काय काय घडामोडी सुरू आहेत, जमिनींचे काय काय व्यवहार सुरू आहेत, याबाबत प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.
डॅरील डिकॉस्ताचे कौतुक
दोनापावला येथील सीए डॅरील डिकॉस्ता यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. www.askpedru.com हे संकेतस्थळ त्यांनी तयार केले आहे. या संकेतस्थळावर जमिनींसंबंधी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची संपूर्ण माहिती मिळू शकेल. सुमारे २५ हजार जाहिरातींचे संकलन त्यांनी केले आहे. या जाहीरातींवरून जमिनींच्या व्यवहारांची इत्यंभूत माहिती मिळू शकते आणि त्यासाठी प्रत्येकाने दिवसातून फक्त ५ मिनिटे जरी दिली आणि आपल्या गावांतील जमिनींबाबतची माहिती मिळवली तरीही मोठी जागृती होऊ शकेल,असेही शेर्लेकर यांनी सांगितले.