
३० तासानंतर अखेर अबकारी खात्याचा खुलासा
गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)
तब्बल ३० तासांच्या तपासणीनंतर अखेर पेडणे अबकारी कार्यालयाने धारगळ येथे आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कंटेनरमधील दारूचा साठा फक्त ६१,४४,४८० असल्याचे जाहीर केले.
पोलिसांनी हा साठा जप्त करून अबकारी खात्याकडे सुपूर्द केला असून, सध्या तो खात्याच्या ताब्यात आहे. पंचनाम्यादरम्यान प्रत्येक बॉक्समधील बाटल्यांची मोजणी करण्यात आली. एकूण १२६८ बॉक्समध्ये ७५० मि.ली.च्या आणि क्वार्टर साइजच्या बाटल्या होत्या.
दारू सामान्य दर्जाची असल्यामुळे तिची बाजारभावाने किंमत कमी आहे, मात्र करासह तिची किंमत ₹१ कोटीच्या पुढे जाते. ही दारू गोव्याबाहेर पाठवली जाणार होती आणि तिथे तिची किंमत ₹२ कोटींपेक्षा अधिक ठरली असती, अशी माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली.
अबकारी आयुक्तांकडून चौकशी सुरू
अबकारी आयुक्त अंकिता मिश्रा (आयएएस) यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या बाटल्यांवरील लेबले बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा माल गोव्यातील कोणत्या डिस्टिलरीत तयार झाला आणि डिस्टिलरी निरीक्षकांच्या नजरेआड कंटेनरमधून बाहेर कसा गेला, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर हा माल अधिकृत डिस्टिलरीत तयार झाला नसेल, तर राज्यात बेकायदेशीर दारू उत्पादन सुरू असल्याचा संशय बळावतो, जो आणखी गंभीर आहे.
खरा सूत्रधार कोण?
घटनेनंतर पोलिस आणि अबकारी खात्यात खळबळ उडाली. एका गोपनीय सूत्रानुसार, एका बड्या राजकीय नेत्याच्या कार्यालयातील कर्मचारी आणि जवळचे लोक या प्रकरणात अधिक सक्रिय दिसले. त्यामुळे या तस्करीला राजकीय आशीर्वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तस्करीसाठी वापरलेला कंटेनर (एनएल-०१ एन- २५९८) नागालँड नोंदणीचा असून, तो ब्रह्मपुत्रा कार्गो कॅरिअर लिमिटेड कंपनीचा आहे.
दारू तस्करीचे सूत्रधार कोण?
कंटेनरमधून दारूची तस्करी सुरू झाली आहे, यावरून भाजप सरकारमधील गैरकारभार आणि भ्रष्टाचार किती गंभीर पातळीवर पोहोचला आहे, हे स्पष्ट होते. ही दारू कुठून पाठवली जात होती आणि कुठे नेली जात होती, हे समोर येणे अत्यावश्यक आहे. जर हे सर्व प्रकार अबकारी निरीक्षकांच्या डोळ्याआड घडत असतील, तर आपला गोवा आणि गोंयकार अजिबात सुरक्षित नाहीत. या तस्करीचे सूत्रधार कोण आहेत, हे उघड होणे गरजेचे आहे.
— अमित पाटकर अध्यक्ष, गोवा प्रदेश काँग्रेस समिती