
पक्षनिष्ठेचा आदर्श हरवला
पेडणे,दि.१७(प्रतिनिधी)
गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे निस्सीम भक्त, मगोचे ज्येष्ठ नेते तथा पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील पक्षनिष्ठेचा एक आदर्श हरवला,अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गोवा विधानसभेतून १९९४ साली पेडणे मतदारसंघातून ते मगोचे आमदार म्हणून निवडून आले होते. अत्यंत साधारण राहणीमान, स्पष्टवक्तेपणा, मगो पक्षाबद्दल प्रचंड निष्ठा आणि जनसेवेची तळमळ हे त्यांचे गुण होते. तत्कालीन काँग्रेस पक्षाकडून मगो पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याचा बाजार सुरू असता त्यावेळी त्यांच्यासमोर ऑफर असूनही त्यांनी मगो पक्षाचा विश्वासघात करण्यास स्पष्ट नकार दिला. फक्त एकदाच आमदार बनण्याची संधी त्यांना प्राप्त झाली असली तरी मगो व्यतिरीक्त त्यांनी अन्य पक्षात जाण्याचा कधीच विचार केला नाही आणि शेवटपर्यंत मगोनिष्ठ म्हणून आपली राजकीय पवित्रता जपली.
पेडणे नगरपालिकेचे २० वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. आदर्श क्रीडा क्लबच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य केले. मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर ते सातत्याने होते. ढवळीकरबंधूंच्या कार्यपद्धतीला आव्हान देण्याचे धाडस ते नेहमीच करत होते आणि ढवळीकरबंधूंकडूनही त्यांचा पक्षाचे ज्येष्ठ नेते या नात्याने आदर राखला जात होता. राजकारणात स्वार्थाला बळी न पडल्यामुळे समाजमानसात त्यांना प्रचंड आदर होता.