शाब्बास, गोवा पोलिस!

पैशांसाठी गोंयकार खरोखरच इतका लाचार बनू लागला, तर मग गोंयकारांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे हा देखील मूर्खपणाच ठरेल.

राज्याच्या पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रकरणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. अशावेळी गुन्हेगारी घटना गोव्याची, किंबहुना देशाच्या पर्यटनाची बदनामी करणाऱ्या ठरतात. कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर गोवा पोलिस आणि सहाजिकच गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे टीकेचे लक्ष्य बनत आहेत.
पर्तगाळ येथील एका खाजगी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर वास्को बायणा येथील दरोड्याचा छडा लावून सातपैकी सहाजणांना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना मिळालेले यश सरकारला दिलासा देणारे ठरले आहे. भाजपचे भक्त कदाचित ही प्रभू रामचंद्रांची किमया असेही म्हणू शकतात, कारण मोदी यांच्या हस्ते ७७ फूट उंचीच्या प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या ‘रामराज्यात’ या बिकट प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवली, असेही भक्त म्हणतील.
वास्को पोलिसांनी दरोड्याचा छडा लावण्यासाठी घेतलेले परिश्रम, मेहनत, अभ्यास, गुन्हा शोधण्याचे तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचे कौतुक करावेच लागेल. या कौतुकात काटकसर करणे अन्यायकारक ठरेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वास्को पोलिसांनी केलेल्या या कामगिरीची दखल गोवा सरकारकडूनही घेतली जाईल. पोलिसांनी ठरवले तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते, हेच या घटनेतून सिद्ध झाले. सागर नायक यांच्या कुटुंबाकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत झाले आणि त्यांनी समाधान व्यक्त केले, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आता हा दरोडा नेमका कोणत्या उद्देशाने घातला गेला? त्याचे कारण केवळ चोरी होते की अन्य काही, याचाही शोध घेण्याची गरज आहे. हे नेमके दरोडेखोर कोण? या कुटुंबाशी संबंध असलेल्या कामगाराकडूनच हा कट रचण्यात आला असेल, तर त्याच्या मनात हा विचार का आला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने कोणता मार्ग अवलंबला, याचा सखोल अभ्यास आणि तपास होणे आवश्यक आहे.
केवळ गुन्हेगारांना पकडून चालणार नाही. वैद्यकीय क्षेत्रात जसे रोगांची कारणे शोधली जातात, त्याप्रमाणे गुन्ह्यांची कारणे आणि गुन्हेगारांची मानसिकता यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जोपर्यंत अशा गोष्टींचा अभ्यास होणार नाही, तोपर्यंत गुन्हेगारी जगतातील मानसिकतेचा अंदाज येणार नाही. माणूस गुन्हा करताना काय विचार करतो, गुन्हा करण्यास त्याला काय भाग पाडते आणि हा मार्ग तो का स्वीकारतो, याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी पोलिस खात्यातील एका विशिष्ट विभागाची गरज आहे.
राज्यातील गुन्हेगारी प्रकरणांत बहुतांश परप्रांतीयांचा समावेश आहे, असे स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकवेळा म्हटले आहे. हे जर खरे असेल, तर त्याबाबत गोवा पोलिसांची भूमिका आणि कार्ययोजना काय आहे? भाडेकरूंची नोंदणी सक्तीची करण्यात आली असतानाही ती का केली जात नाही? मग नोंदणी न करणाऱ्या घरमालकांची जबाबदारी पंचायत किंवा पालिकांवर का सोपवली जात नाही? भाडेकरू ठेवत असाल, तर त्याची नोंद पंचायत किंवा पालिकांकडे असणे गरजेचे आहे. भाडेकरूंची माहिती आणि त्यांची ओळखपत्रे जमा करणेही आवश्यक आहे.
इथे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या धोरणानुसार बेकायदा पद्धतीने एकमेकांना पैसे कमवण्याची संधी देण्याचा उद्योग चालतो. पैशांसाठी गोंयकार खरोखरच इतका लाचार बनू लागला, तर मग गोंयकारांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे हा देखील मूर्खपणाच ठरेल.

  • Related Posts

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    प्रत्येक मतदारसंघात भाजपविरोधात एकच सक्षम उमेदवार उभा राहिला, तरच खरी लढत होऊ शकते. अन्यथा विरोधी पक्षांच्या स्वतंत्र मोहिमा आणि स्वतंत्र दावे हे भाजपसाठीच सोयीचे ठरतील. गोव्यातील राजकारणात निवडणुकांची चाहूल लागताच…

    सत्तेच्या नशेला आवरा

    लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही. ती प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, स्वतंत्र प्रसारमाध्यमांमुळे, निर्भय सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आणि निष्पक्ष प्रशासनामुळे मजबूत होते. गोव्यातील राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अधिक धूसर होत…

    You Missed

    15/06/2026 e-paper

    15/06/2026 e-paper

    स्मार्ट मीटरवरून ढवळीकर टार्गेट

    स्मार्ट मीटरवरून ढवळीकर टार्गेट

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    सत्तेच्या रडारवरील कार्यकर्ता; स्वप्नेश शेर्लेकर

    सत्तेच्या रडारवरील कार्यकर्ता; स्वप्नेश शेर्लेकर

    GPCC Chief Girish Chodankar Urges SEBI to Halt Vedanta Iron & Steel Listing Over Alleged ₹16,500 Crore Goa Liability

    GPCC Chief Girish Chodankar Urges SEBI to Halt Vedanta Iron & Steel Listing Over Alleged ₹16,500 Crore Goa Liability

    Four-Day ‘Rakhandar Padyatra’ Begins Across Goa-Karnataka-Maharashtra Border Region

    Four-Day ‘Rakhandar Padyatra’ Begins Across Goa-Karnataka-Maharashtra Border Region