
मुळगांव श्री वेताळाचा कौलप्रसाद; ब्राह्णाचेही तिथे वास्तव
पणजी,दि.८(प्रतिनिधी)
पर्वरी येथे सरकारने अगदी विटंबना करून तिथून हटविलेल्या श्री खाप्रेश्वराला त्याची हक्काची जागाच हवी असा कौलप्रसाद आज मुळगांवातील श्री वेताळाने दिला आहे. याठिकाणी श्री खाप्रेश्वराच्या सोबतीला श्री ब्राह्णाचेही वास्तव असल्याचे कौलातून सिद्ध झाले आहे. श्री खाप्रेश्वराच्या बिटंबनेमुळे कौलप्रसादाला बऱ्याच अडचणी उदभवल्यानंतर महतप्रयासाने शेवटी हा कौल मिळाल्याची माहिती श्री खाप्रेश्वर देवस्थानचे कारभारी तथा जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर यांनी दिली.
सरकारी कौलप्रसाद कसा काय लागू होणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीतील काही लोकांना कौलप्रसाद घेण्याची सूचना केली होती. वास्तविक श्री खाप्रेश्वर देवस्थानच्या कारभाऱ्यांना डावलून ही सूचना देण्याची त्यांची कृती कितपत योग्य आहे, याचा विचार जनतेनेच करावा,असे कार्तिक कुडणेकर म्हणाले. श्री खाप्रेश्वराचा प्रसाद हा केवळ मुळगांवातील श्री वेताळाकडेच होतो. आत्तापर्यंतच्या सर्व विधी हे तिथून प्रसाद घेऊनच पार पाडल्या आहेत. या देवस्थानची माहिती नसलेल्यांकडून या देवस्थानच्या पुर्नप्रतिष्ठापनेचा कौल घेणे हे कुठल्या धर्मात येते, हे त्यांनीच सांगावे,असेही कुडणेकर म्हणाले. पर्वरी गांवकऱ्यांत फुट घालून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. पर्वरीवासियांनी याला बळी पडू नये तसेच सरकारने धार्मिक विटंबना करून जे पाप केले आहे, त्यात वाटेकरी होऊ नये,असे आवाहन कुडणेकर यांनी केले.
वडाच्या त्या फांदीवर वास्तव
पर्वरी येथे वडाचे झाड हटविल्यानंतर तिथे एक फांदी राहीलेली आहे. ही फांदी तिथे उभारलेल्या सरंक्षक भिंतीतून बाहेर आली आहे. या फांदीवर श्री खाप्रेश्वर आणि श्री ब्राह्णाचे वास्तव असल्याचे कौलप्रसादातून सांगण्यात आले आहे. ह्या ठिकाणीच देवाची स्थापना व्हावी,असे म्हटले आहे. कौलप्रसादात दिलेला कौल आणि श्री वेताळाने सांगितलेल्या विधीप्रमाणे विचार करून आणि सर्व सदस्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कार्तिक कुडणेकर यांनी म्हटले आहे.