तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे महत्वाचे निकाल

गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी दोन महत्वाच्या निकालांत पत्रकार तरुण तेजपाल यांना २०१३ मधील महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना लवकर मुक्त करण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे.
निर्दोष मुक्तता रद्द
न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या न्यायपीठाने राज्य सरकारने दाखल केलेली आव्हान याचिका मंजूर करत म्हापसा सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये तेजपाल यांची निर्दोष मुक्तता रद्द केली. उच्च न्यायालयाने यापूर्वी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता आणि निकाल सुनावणीच्या वेळी आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी निकाल जाहीर करताना तरुण तेजपाल स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये ‘तेहलका’ मासिकातर्फे आयोजित ‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्या महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. मे २०२१ मध्ये म्हापसा सत्र न्यायालयाने पुराव्यांचा अभाव आणि पीडितेच्या वर्तनावर शंका उपस्थित करत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठात आव्हान दिले होते.

मंदार सुर्लकरच्या मारेकऱ्यांची मुक्तता

वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना लवकर मुक्त करण्याचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. गोवा सरकारने या आरोपींना मुक्त करण्यास नकार दिला होता. सरकारच्या या निर्णयाला आरोपींनी, तर राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाच्या शिफारशीला मंदारच्या वडिलांनी न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला.
१४ ऑगस्ट २००६ रोजी मंदार सुर्लकर याचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोवितो रायन पिंटो आणि अल सलेटा बेग यांनी मिळून हा कट आखला होता. अपहरणानंतर आरोपींनी मंदारचा खून करून त्याचा मृतदेह फोंडा येथील आर्ला-केरी भागात फेकून दिला होता. मृतदेह सापडल्यानंतर तत्कालीन पणजी पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली होती. २३ जून २०१४ रोजी बाल न्यायालयाने रोहन पै धुंगट, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि जोवितो रायन पिंटो या चार जणांना दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. पाचवा आरोपी अल सलेटा बेग हा माफीचा साक्षीदार बनल्यामुळे त्याची सुटका झाली होती.

तेजपाल सर्वोच्च न्यायालयात
गोवा खंडपीठाच्या निकालाला किमान एका आठवड्याची स्थगिती मिळावी अशी याचिका तरूण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. गोवा खंडपीठाने त्याला १० वर्षे सश्रम तुरूंगवास तथा ५ लाख २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्याला चार आठवड्यांची मुदत शरण येण्यासाठी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील तेजपाल यांच्या आव्हानाला प्रत्यूत्तर देण्यास राज्य सरकार तयार आहे,अशी माहिती राज्याचे एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure