विद्यारण्यस्वामींचा तर्क!

विद्यारण्य स्वामी हे विजयनगरच्या साम्राज्याचे मंत्री आणि नंतर शृंगेरी पिठाचे प्रमुख. सहाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या आचार्यांनी अद्वैत वेदांताच्या प्रचारासाठी अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी पंचदशी हा त्यांचा गाजलेला ग्रंथ. पण मला त्यांची पहिली ओळख झाली, ती त्यांच्या ‘दृकदृश्य विवेक’ या प्रकरण ग्रंथातून. हा अगदी लहानसा ग्रंथ आहे. त्याला ग्रंथ तरी म्हणावे का, असा प्रश्न उपस्थित होईल इतका तो लहान. फक्त शेहेचाळीस श्लोक.

आणखीही एक गम्मत आहे या ग्रंथाची. सर्वसाधारणपणे कोणत्याही भारतीय ग्रंथाची सुरुवात गणपतीला किंवा कोणत्याही देवतेला वंदन करून केली जाते. कधीकधी गुरूंना वंदन केल्याचा उल्लेख असतो. ज्ञानेश्वरीची सुरुवात देखील ‘ओम नमोजी आद्या’ अशी केलेली आहे. पण या ग्रंथात असा काहीही उल्लेख नाही. हा ग्रंथ पाहिल्याच श्लोकात विषयाला हात घालतो.
खूप रोचक तर्क हा पहिला श्लोक मांडतो. काय त्याचा तर्क? तो विचारतो, दृश्य कोण पाहतो? डोळा! डोळा आणि त्याने बघितलेले दृश्य या दोन भिन्न गोष्टी आहेत ना? हो! म्हणजे अनुभवणारा आणि ज्याचा अनुभव घेतला जातो त्या भिन्न गोष्टी असतात.
आता पुढचा विचार करू. डोळा बघतो हे कोणाला कळते? मनाला! म्हणजे आता मन बघणारे आणि डोळा हा दृश्य. (अर्थात हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाबाबत म्हणता येईल. जसे आवाज आणि कान, नंतर कान आणि मन). मन आणि डोळा या दोन भिन्न गोष्टी आहेत ना? हो! म्हणजे अनुभवणारे मन आणि ज्याचा अनुभव मनाला येतो तो डोळा या दोन भिन्न गोष्टी आहेत ना? हो!
आता आणखी पुढे जाऊ. मनात उठणारे विचार, भावना या जाणवतात ना? हो. म्हणजे मन व ज्याला मनात काय चाललेय ते समजते ती गोष्ट, या दोन्ही गोष्टी भिन्न असायला हव्यात ना? हो. मग मनात काय चाललेय हे ज्याला जाणवते ते काय? तो आपला जीवंतपणा! त्याला साक्षी म्हणू. हा साक्षी म्हणजेच जीवंतपणा! हा जीवंतपणा म्हणजेच खरा मी नाही का? या खऱ्या मी पासून मन आणि शरीर भिन्न नाही का? हा जीवंतपणा स्थिर असतो. तुम्ही बालक असता तेव्हा तो असतो, तुम्ही तरुण होता, तेव्हा तो असतो, तुम्ही म्हातारे होता, तेव्हाही तो असतो. बालक असल्यापासून म्हातारे होईपर्यंत तुमचे शरीर बदलत असते, मन बदलत असते, पण तुमच्यातला हा जीवंतपणा बदलत असतो का? हा साक्षी बदलत असतो का? नाही. शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो. जीवंतपणाला त्रास होतो का? नाही! म्हणजे खरा मी जो आहे, तो निर्विकार आहे. पण आपण देहाला किंवा मनाला मी मानतो, म्हणून आपल्याला दुःख होते.
दुसरा एक तर्क विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये देतात. तुम्ही जागे असता तेव्हा तुमचे शरीर आणि मन सक्रिय असते. तुम्ही झोपता आणि स्वप्नावस्थेत जाता. तेव्हा तुमचे मन सक्रिय असते. आणि तुम्ही गाढ झोपेत जाता, जेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय नसतात. जेव्हा तुम्ही गाढ झोपेतून जागे होता, तेव्हा तुम्ही सांगता की मला गाढ झोप लागली होती. ही गाढ झोप ज्याने अनुभवली ते काय? तो तुमच्यातला जीवंतपणा!
तेव्हा तुमच्यातला जीवंतपणा आणि तुमचे मन व शरीर हे भिन्न आहेत. तुम्ही म्हणजे न बदलणारा जीवंतपणा आहात. हा जीवंतपणाच तुमच्या मनाला आणि शरीराला जीवंतपणा देत असतो. जसे रात्रीच्या वेळी चंद्र प्रकाश देत असतो, पण तो प्रकाश चंद्राचा नसतो, तो रात्री न दिसणार्‍या सूर्याचा असतो.
विद्यारण्य अग्नीने तापून लाल झालेल्या लोखंडाच्या गोळ्याचे उदाहरण देतात. गोळ्याचा लालपणा आणि उष्णता ही गोळ्याची भासत असली तरी ती गोळ्याची नाही. ती अग्नीकडून उसनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मूळ जीवंतपणापासून शरीर आणि मनाला जीवंतपणा येतो.
सहाशे वर्षांपूर्वी किती सूक्ष्म विचार ही मंडळी करत होती. त्याआधी म्हणजे बाराशे वर्षांपूर्वी शंकराचार्य असाच सूक्ष्म विचार करत असल्याचे आढळते. असा सूक्ष्म विचार करण्याचा वारसा लाभलेले आम्ही आज एकविसाव्या शतकात सूक्ष्म विचार करण्याची आपली क्षमता वापरतोय का? की मूर्ख हातचलाखीने, उन्मादक भाषणांनी आणि भाकड जादूटोण्यांच्या कहाण्यांनी वहावत चाललो आहोत?

  • डॉ. रुपेश पाटकर
  • Related Posts

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    आमदार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून मंजुरीपत्र उघड पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) – पर्यटन खात्याकडून बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चनजीकच्या वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाला नगर नियोजन…

    पाण्यासाठी दाही दिशा

    कोणत्याही विवेकी माणसाला ही केवळ आपली थट्टाच सुरू असल्याचे जाणवेल. परंतु राजकीय लोकांना हे पूर्णपणे माहित आहे की लोकांनी आपला विवेक बाजूला काढून ठेवला आहे आणि त्यामुळे त्यांना सहजपणे आपल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    25/03/2025 e-paper

    25/03/2025 e-paper

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    24/03/2025 e-paper

    24/03/2025 e-paper

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    पाण्यासाठी दाही दिशा

    पाण्यासाठी दाही दिशा
    error: Content is protected !!