विरोधकांनी भानावर यावे

एकीकडे जनता सरकारला धडा शिकवण्याची मानसिकता बाळगून असताना विरोधकांनी आपल्या बेजबाबदार वर्तनातून जनतेची निराशा करणे ही सर्वांत मोठी चूक ठरेल.

राज्यात एकीकडे हडफडे अग्निकांडानंतर भ्रष्टाचार, बेकायदा आणि अनागोंदी कारभार यावरून सरकार व प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. दुसरीकडे आगामी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना सरकारविरोधी वातावरणाचा उपयोग करून अधिकाधिक लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची नामी संधी असताना, विरोधकांकडून सुरू असलेल्या बेजबाबदार आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकांची साफ निराशा झाली आहे.
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांइतकीच विरोधकांचीही संविधानिक आणि नैतिक जबाबदारी असते. केवळ सत्ता हेच लोकशाहीचे अंतिम ध्येय नाही, तर या सत्तेवर योग्य वचक ठेवण्याची जबाबदारी विरोधकांनी निष्ठेने पार पाडण्याची गरज आहे. हे जर झाले नाही तर सत्ता अनियंत्रित बनू शकते. आज केंद्रात आणि राज्यात तीच परिस्थिती आहे. सत्ताधारी एवढे मदांध झाले आहेत की ते विरोधकांना कस्पटासमान समजतात आणि त्यातूनच लोकशाहीच्या मूळ ढाच्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कधीकाळी काँग्रेसच्या कार्यकाळात इंदिरा गांधी यांच्याविरोधात राष्ट्रव्यापी उठाव झाला होता आणि त्यांना सत्तेवरून खाली उतरावे लागले होते. आज भाजप त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली होती, तर आगामी काळात भाजप देखील तसेच करू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी देशाला नेमक्या कुठे नेणार आहेत, हेच समजत नाही.
गोव्यात गेली बारा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने लोकांना भ्रमनिरास केला आहे. तरीही सगळ्या निवडणुका भाजपकडून जिंकल्या जातात म्हणून लोक आपल्यासोबत आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. गत विधानसभेत भाजपला २० जागा मिळाल्या होत्या, पण विरोधात १९ आमदार निवडून आले होते. यानंतर विरोधकांना आपल्याकडे आणून भाजपने बहुमत प्राप्त केले असले तरी त्या विरोधी १९ आमदारांमागे भाजपविरोधी जनभावना होती, हे विसरून चालणार नाही.
विरोधी पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. जोपर्यंत ही विश्वासार्हता ते पुन्हा प्राप्त करणार नाहीत, तोपर्यंत लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काँग्रेस अपयशातून काहीच बोध घेत नाही, हे स्पष्टपणे जाणवते. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई हे नेमके काय करावे या संभ्रमात आहेत आणि आरजीपी अजूनही राजकीय परिपक्वता दाखवताना दिसत नाही. भावना आणि वास्तव यात फरक असतो. राजकीय पक्षाला संवेदनशीलता हवीच, परंतु राजकारणात लागणारी प्रगल्भता आणि परिपक्वतेची गरज अधिक महत्त्वाची आहे.
अपमान सहन करण्याची, अनिच्छा पोटात गिळण्याची आणि दूरदृष्टीने एक पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवावी लागते. एखादा राजकीय नेता आपल्या भावना आणि संवेदना या पक्षापेक्षा अधिक प्रखर समजू लागतो तेव्हा त्या पक्षाच्या प्रगतीला खंड पडतो.
विरोधकांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा होती. ते झाले नाही तरीही चालेल, पण विरोधकांनी आपल्या मूळ ध्येयाकडे नजर ठेवण्याची गरज आहे. या एकत्र येण्याला कोण जबाबदार याचे दाखले देण्यासाठी आरोप-प्रत्यारोपांची गरज नाही. एकीकडे जनता सरकारला धडा शिकवण्याची मानसिकता बाळगून असताना विरोधकांनी आपल्या बेजबाबदार वर्तनातून जनतेची निराशा करणे ही सर्वांत मोठी चूक ठरेल. मग जनतेला दोष देण्याचा कुठलाच अधिकार विरोधकांना राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President