लहानपणी मला देव-देवतांचे, विशेषतः संतांचे सिनेमे पाहायला फार आवडत असे. त्याकाळी सिनेमा पाहण्याची एकमेव संधी म्हणजे उन्हाळ्यात गावात येणारे टूरिंग टॉकीज. त्याला ‘तंबूतला सिनेमा’ म्हणत. आमच्या गावात थिएटर नव्हते. तंबूत कोणता सिनेमा लागला आहे, हे सांगणारा हाताने रंगवलेला कापडी फलक गावातील रहदारीच्या ठिकाणी लावलेला असे. तंबूत एखाद्या संताचा किंवा पौराणिक कथांवर आधारित सिनेमा लागला की मी घरी जाऊन सिनेमाला जायचा हट्ट करत असे.
“तू दरवेळेस सिनेमा पाहायला इतका उत्सुक असतोस, पण त्यातून काही शिकतोस का?” एकदा बाबांनी विचारले. तेव्हा मी सातवीत होतो, म्हणजेच समज यायला लागली होती. पण सिनेमातून काही शिकायचे असते, असा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. मला सिनेमे आवडत म्हणून मी ते पाहत असे. संतांच्या सिनेमांत चमत्कार असत, तर पौराणिक सिनेमांत लढाईची दृश्ये. हीच माझ्या सिनेमा पाहण्याच्या हौशीची कारणे होती.
सिनेमा पाहताना जणू काही ते सत्य आहे, अशा प्रकारे मनात भावना हिंदोळत असत. मला आठवते, मी पहिलीत असताना बाबा मला ‘संत ज्ञानेश्वर’ हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा दाखवायला घेऊन गेले होते. तो पाहताना मी आणि बाबा सतत अश्रू पुसत होतो. ज्ञानोबा आणि त्यांच्या भावंडांचा छळ पाहून मनात कालवाकालव होत होती. पण त्यातून काही शिकायचे असते, असा विचार मात्र मनात आला नव्हता.
बाबांनी विचारलेला ‘सिनेमातून काय शिकतोस?’ हा प्रश्न मला उत्तर देता आला नाही. पण तो प्रश्न मनात खोलवर ठाण मांडून बसला. बाबा नेहमी एक ओळ ऐकवत असत—
“थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा।”
या ओळींचा अर्थही त्या प्रश्नासारखाच होता.
बाबांनी आणखी एक प्रश्न विचारला होता—”संतांनी जे ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, तुकोबांनी गाथा, ते त्यांनी कोणासाठी लिहिले असेल? दुसऱ्या संतांसाठी की तुझ्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी? वाचणाऱ्याला काय उपयोग व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असेल का? की धर्माच्या वाटेवर सामान्य माणसाने कसे चालावे, याचे मार्गदर्शन म्हणून त्यांनी लिहिले असेल?”
तेव्हा आमच्याकडे आजोबांच्या वयाचे एक दूरचे नातेवाईक आले होते. ते म्हणाले, “आधी अभ्यास करून मोठा हो. डॉक्टर हो, इंजिनिअर हो. नाव कमाव. मग या गोष्टी कर.” बाबा काही बोलले नाहीत, पण त्यांचे मौन मला खटकले. पाहुणे निघून गेल्यावर बाबा म्हणाले, “धर्म ही गात्रे थकल्यावर रिकामपणी वेळ घालवण्याची गोष्ट नाही. तरुणपणापासून मनाला सवय लावली नाही, तर म्हातारपणी मन तयार होणार नाही.”
मला कळायला लागल्यापासून बाबा माझ्याकडून काही स्तोत्रे नियमित म्हणवून घेत. ती संपल्यावर ‘सर्वेपि सुखिनः संतु’ हा श्लोक म्हणवून घेत आणि म्हणत, “जगातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, कोणीही दुखी नसावे, हेच धर्मिक माणसाचे ध्येय असले पाहिजे. हीच त्याची देवाकडे प्रार्थना असली पाहिजे.”
पुराणकथांतील ऋषींचे कठोर तप ऐकताना मला वाटे, आपल्याकडून असे तप होणारच नाही. बाबा म्हणत, “कलियुगात अन्नगत प्राण आहे. त्यामुळे कठोर तपश्चर्या अशक्य आहे. पण साधना सोपी आहे. तुकोबा म्हणतात—
‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाची साधला।
विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाम गावे।।’
सतत नामस्मरण करण्यापेक्षा सोपी साधना नाही. पण हे ‘नामस्मरण’ आहे बरं का! ‘स्मरण’ म्हणजे आठवण. अनेकदा जीभ नाम पुटपुटते, पण मन सांसारिक गोष्टींचे स्मरण करत राहते. त्याबाबत सावध असले पाहिजे.”
मला देव-देवतांचे सिनेमे जितके आवडत, तितक्याच त्यांच्या गोष्टी वाचायला आवडत. वाचताना वैकुंठात शेषावर पहुडलेला विष्णु, कैलासावर ध्यानस्थ शंकर, ब्रह्मलोकातील ब्रह्मदेव डोळ्यांसमोर उभे राहत. मी एकदा बाबांना विचारले, “बाबा, वैकुंठ कुठे असेल?”
“का रे? असा प्रश्न का विचारतोस?” त्यांनी विचारले.
“विष्णु तिथे राहतो ना?” मी म्हणालो.
“विष्णु जिथे नाही, अशी जागाच नाही. तो सर्व चराचर सृष्टीत भरलेला आहे. संत नामदेवांना वाटे की विठ्ठल फक्त पंढरपूरच्या देवळात आहे. त्यांच्या निरागस भक्तीमुळे विठ्ठलाने मूर्तीमधून सजीव रूपात दर्शन दिले. एकदा सर्व संत मंडळी पंढरपूरात जमली होती. मुक्ताबाई गोरोबा काकांना म्हणाली, ‘काका, आमची मडकी म्हणजे डोकी कच्ची की पक्की, तपासून सांगा.’ गोरोबा काका थट्टेत सामील झाले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर थोपटून ‘पक्के’ म्हणाले. नामदेवांच्या डोक्यावर थोपटल्यावर मात्र ‘कच्चे’ म्हणाले. नामदेवांना राग आला. ते देवळात गेले आणि विठ्ठलाला सांगितले. विठ्ठल म्हणाला, ‘गोरोबा खरे म्हणतो. तुला गुरुकृपा झालेली नाही. विसोबा खेचरकडे जा.’
नामदेव औंढ्या नागनाथला गेले. विसोबा एका शिवमंदिरात पिंडीवर पाय ठेवून निजले होते. नामदेव म्हणाले, ‘पाय बाजूला करा.’ विसोबा म्हणाले, ‘मी थकलोय, तूच पाय बाजूला ठेव.’ नामदेवांनी पाय हलवले, तर तिथेही पिंडी दिसली. जिथे पाय ठेवले, तिथे पिंडी दिसू लागली. नामदेवांना गुरुबोध झाला—देव सर्वत्र आहे. मूर्ती ही मनाच्या मशागतीसाठी आहे, पण देव ठराविक जागी मर्यादित नाही. हे सत्य आपल्या विचाराचा सहजभाव व्हावा, यासाठी भक्ती केली पाहिजे.”
बाबांनी म्हटलेले—”देव सर्वत्र भरलेला आहे हे सत्य आपल्या विचाराचा सहजभाव व्हावा”—हे वाक्य मला अत्यंत महत्त्वाचे वाटले.
- पूर्वाध
– डॉ. रूपेश पाटकर




