तानावडे खरे बोलले पण…

तानावडे यांनी खरे म्हणजे विश्वजीत राणे यांना कारापूर- सर्वण येथील जमीन विकण्याची वेळ का आली, याचे उत्तर त्यांच्याकडून घेतले असते तर बरे झाले असते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांनी किमान भूतानी प्रकल्पाच्या विषयावरून बोलण्याचे धाडस केले. लोकांनी आपल्या जमिनी विकू नयेत. त्यांनी जमीनीच विकल्या नाहीत तर हे प्रश्न उदभवणार नाहीच,असे साधे आणि सोपे उत्तर त्यांनी देऊन या जटिल प्रश्नावर आपले भाष्य केले. तानावडे यांनी खरे म्हणजे विश्वजीत राणे यांना कारापूर- सर्वण येथील जमीन विकण्याची वेळ का आली, याचे उत्तर त्यांच्याकडून घेतले असते तर बरे झाले असते. या जमीनीचा वापर संबंधीत कंपनीला व्हावा यासाठी नगर नियोजन कायद्यात दुरूस्तीही करण्यात आली. सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घरे बांधून देण्यासाठी ही जमीन विकल्याचे विश्वजीत राणे यांनी सांगितले होते. हे कोण सर्वसामान्य इथे येणार आहेत ते पाहायला मिळणार.
सरकारने जेव्हा गुंतवणूक आणि विकासाच्या नावाने नगर नियोजन कायद्यात तरतुद करून कुठलीही जमीन व्यवसायीक वापरासाठी किंवा बांधकामांसाठी म्हणजे सेटलमेंट करून देण्याची वाट मोकळी करून ठेवली आहे तेव्हा स्वाभाविकच लोक आणि विशेष करून भाटकार आपल्या जमिनी विकणारच. एका झटक्यात जेव्हा जमिनीचे मूल्य बहुपटीने वाढले तेव्हा या जमीनी ठेवून काय उपयोग,असा विचार जमीन मालक करणारच. जमिनी सांभाळून ठेवल्या तर कधीतरी सरकार त्या संपादन करणार आणि कस्पटासमान दराने हिरावून घेणार हा अनुभवही लोकांना आहे.
मोपा विमानतळासाठी सुमारे ९० लाख चौरसमीटर जमीन सरकारने ताब्यात घेतली. तिथे लोकांकडे जमीन मालकीची कागदपत्रे नाहीत म्हणून सुमारे ७० टक्के लोकांची भरपाई सरकार दरबारी पडून आहे. खाजगी बिल्डर किंवा जमीन विकत घेणाऱ्यांना कागदपत्रांची ही अडचण कधीच का आडवी आली नाही. याचा अर्थ सगळ्या गोष्टी कायदेशीर करणारे दलाल हे प्रशासनात आणि सरकारात बसलेले आहेत. ते सर्वसामान्यांसाठी नाहीत तर विशेष लोकांसाठीच आहेत, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही.
कुणी जमीनी विकत घेतल्या म्हणून त्यांना सरसकट जमीन वापरात बदलाचे अधिकार का दिले जातात. शेतजमीन, बागायती जमीन विकत घेणाऱ्यांनी तिथे शेती संबंधीच प्रकल्प राबवावेत,अशी अट का घातली जात नाही. लोकांच्या माथी खापर फोडणे ही खूप सोपी गोष्ट आहे आणि ती करून तानावडे हे लोकांच्या रोषापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाहीत. सुशासनाचे वचन त्यांच्या पक्षाने लोकांना दिले आहे पण सरकारातील भ्रष्टाचाराने सगळ्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे. महसूल खात्यात सरकारचेच दलाल कसे जमीनींचे व्यवहार करतात हे त्यांना जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी सांगावे आम्ही पुराव्यांसहित ते सिद्ध करू शकतो. या गोष्टी सरकारला माहित आहे परंतु सरकारचेच अधिकृत एजंट म्हणून वावरणाऱ्या या लोकांवर सरकार कारवाई कशी काय करणार.
सदानंद तानावडे हे राज्यसभेचे खासदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना हवे असेल तर सगळ्या प्रकरणाची एका चुटकीसरशी ते माहिती मागवू शकतात. पण हे न करता ते लोकांकडे परवाने आणि दाखले दाखवा,असे आवाहन करतात याला काय म्हणावे. तानावडे यांनी भाजपसाठी बरीच वर्षे काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि अन्य गैरव्यवहारांचे आरोप केले होते त्याच लोकांना सन्मानाने त्यांच्या गळ्यात पट्टे घालून पक्षप्रवेश देण्याची वेळ त्यांच्यावर आली हे कोण कसे काय विसरणार. हे नेते जे त्यांनी भाजपात दाखल केले आहेत ते आपापल्या अवगुणांसहित भाजपला स्वीकारावे लागले आहेत. आता त्यांचे अवगुण ढळकपणे दिसू लागले आहेत आणि त्यामुळे विनाकारण लोकांवर दोष ठेवून भाजपने नामानिराळे होण्याचा प्रयत्न करू नये.

तानावडे यांनी खरे म्हणजे विश्वजीत राणे यांना कारापूर- सर्वण येथील जमीन विकण्याची वेळ का आली, याचे उत्तर त्यांच्याकडून घेतले असते तर बरे झाले असते.

  • Related Posts

    दामू नाईक व्हा पुढे…

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटल्यावर या पदाची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील या पदाचे वजन कायम राहणे ही खरी गरज आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामोदर उर्फ सर्वांचे जवळचे दामू नाईक यांच्या निवडीची…

    “कॅप्टन वेन्झी खूष हुआ”

    कॅप्टन वेन्झींचे प्रमाणपत्र विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देणारे ठरणार आहेच, परंतु विधानसभा अधिवेशनातही हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरेल हे निश्चित. आम आदमी पार्टीचे बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांनी कोलवा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!