
वाळपई, दि. २३ (प्रतिनिधी)
क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी २६ जानेवारी १८५२ ला गोवा स्वातंत्र्य संग्रामातील पहिली सशस्त्र क्रांती पोर्तुगीजांविरोधात सत्तरीतील नाणूस किल्ल्यावर केली. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून पर्येच्या आमदार देविया राणे २६ जानेवारी रोजी नाणूस किल्ल्यावर हजर राहून दीपाजी राणेंना मानवंदना देणार आहेत.
या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला कळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समिती २६ जानेवारी हा क्रांती दिन म्हणून नाणूस किल्ल्यावर साजरा करत आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने या उत्सवाला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या किल्ल्यावर प्रत्येक २६ जानेवारीला क्रांतिवीर दीपाजी राणे यांना सरकारतर्फे मानवंदना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगानेच आमदार देविया राणे यांच्यातर्फे ही मानवंदना दिली जाणार आहे. सरकारच्या सहकार्याने येणाऱ्या कालावधीत नाणूस किल्ल्याचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीही सुरवातीपासूनच नाणूस किल्ला संवर्धन मोहिमेस सहकार्य केले होते.
नाणूस किल्ला मोहीम
नाणूस किल्ला मोहीम ही अनेक इतिहास प्रेमींना पर्वणी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समितीने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे क्रांतिवीर दीपाजी राणेंचे कार्य उजेडात आले. गोवा हीरक महोत्सवी वर्षात क्रांतिवीर दीपाजी राणेंच्या इतिहासावर राष्ट्रीय स्तरावर वेबिनार सादर करण्याची संधी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अँड. शिवाजी देसाई यांना प्राप्त झाली. या किल्ल्याचा पर्यावरण दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. तसेच क्रांतिवीर दीपाजी राणे यांचा अश्वारूढ पुतळा सत्तरीत उभारणे तसेच सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मारक नाणूस किल्ल्यावर करावे अशी मागणी इतिहास संवर्धन समितीने केली आहे.
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रांतिवीर दीपाजी राणे यांचे पणतू दीपाजी राणे यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांचे आणि आमदार देविया राणे यांचे आभारी आहोत कारण हा किल्ला आज खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून मुक्त झाला आहे.