
धिरेंद्र फडते वाढदिवस विशेष
गावांगावांत असे धिरेंद्र फडते उभे राहिले तर आपल्या गावांकडे आणि गोव्याकडे वाकडी नजर लावण्याचे धाडस कुणालाच होणार नाही हे मात्र नक्की.
गोव्याचे पर्यावरण आणि भवितव्य राखून ठेवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आपापल्यापरीने झटत आहेत. अशा या पर्यावरण कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात का होईना आपला एक धाक आणि दरारा निर्माण केला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात प्रशासन आणि पर्यावरणाची हानी करू पाहणाऱ्यांना वचक बसला आहे.
धिरेंद्र फडते हा ह्याच पर्यावरण रक्षणासाठी धीरपणे आणि वीरतेने लढण्यासाठी सज्ज असलेला लढवय्या आहे. बार्देश तालुक्यातील एकोशी गावचा हा तरुण. हा गाव हळदोणा मतदारसंघात आणि पोंबुर्फा पंचायत क्षेत्रात येतो. धिरेंद्र हा सिव्हील इंजिनिअर तसेच इंटीरियर डिझाईन आणि डेकोरेशन या क्षेत्रात शिक्षण घेऊन तो काम करतो.
धिरेंद्र आपला व्यवसाय सांभाळून गोव्याच्या भूमीच्या रक्षणासाठी विविध चळवळींमध्ये सक्रियपणे सहभागी होतो. गोव्याच्या जमीन आणि पर्यावरण रक्षणाच्या लढ्यातील एक अग्रेसर योद्धा असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
आत्तापर्यंत त्याने अनेक आंदोलनांत भाग घेतला आहे. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास साल्वादोर दी मुंद पंचायत क्षेत्रात तरुण तेहलानी या बिल्डरकडून सुरू असलेल्या अवैध बांधकामाविरोधात त्याने दिलेला लढा सर्वांत प्रभावी ठरला आहे. या बिल्डरकडून याठिकाणी डोंगर पठार आणि जंगलाची नासाडी सुरू होती. गोव्याचे माजी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांच्याविरोधात नगर नियोजन कायदा १७(२) च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत तो एक प्रमुख याचिकादार आहे.
पोंबुर्पा पंचायतीच्या माजी सरपंच लिओपोल्डीना फर्नांडिस यांच्याविरुद्ध अवैध कृत्य केल्यावरून त्यांनी पंचायत संचालनालयाच्या न्यायालयात दाद मागणारी एक याचिका दाखल केली आहे. आपल्या कामांतून धिरेंद्र फडते हा गावांतील युवकांपुढे एक आदर्श ठरला आहे, ज्याच्या प्रेरणेतून आता इतर युवकांनीही गोव्याच्या रक्षणासाठी या लढ्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावांगावांत असे धिरेंद्र फडते उभे राहिले तर आपल्या गावांकडे आणि गोव्याकडे वाकडी नजर लावण्याचे धाडस कुणालाच होणार नाही हे मात्र नक्की. धिरेंद्र फडते याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्या या कार्याला आपला सलाम आणि उत्तरोत्तर हे कार्य करण्याची ताकद तसेच धीर आणि वीरता त्याला प्राप्त होवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
– एक हीतचिंतक