सोशल मीडियावरील फोटोने खळबळ
—————————————–
गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)
आजोशी-मंडूर कोमुनिदादच्या सुमारे १.१५ लाख चौरस मीटर जमिनीवरील कथित कूळ नोंद प्रकरणातील सादिक दोड्डामणी याचे राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळचे संबंध असल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका छायाचित्रामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
‘गांवकारी’च्या फेसबुक हँडलवर प्रसिद्ध केलेला हा फोटो दोड्डामणीच्या जुने गोवे येथील इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमच्या उद्घाटनाचा आहे. त्यात माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई आणि माजी कायदा सचिव तथा मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रमोद कामत उपस्थित असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, मंगळवारी या जमीन प्रकरणाच्या निषेधासाठी उपस्थित राहिलेल्या सिल्वेरा यांचा फोटोमध्ये समावेश असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.
सूत्रांच्या दाव्यानुसार, तिसवाडीतील मानशी आणि जमीन व्यवहारांच्या माध्यमातून दोड्डामणीने महसूल खात्याशी संबंधित राजकीय नेते, अधिकारी आणि मध्यस्थांशी संबंध प्रस्थापित केले. कूळ-भाटकार समझोते आणि जमीन कूळमुक्त करण्याच्या व्यवहारांतही त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले होते. प्रक्रिया रद्द झाली असल्यास उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी अद्याप का सुरू आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी उपस्थित केला.
सर्व्हे क्रमांक ७/०, ६४/१ आणि ६/० मधील जमिनीच्या नोंदीत दोड्डामणीचे नाव कूळ म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, महसूल खात्याने १० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या ताज्या फॉर्म I आणि XIV उताऱ्यांमध्ये त्याचे नाव आणि संबंधित फेरफार नोंदी दिसत नसल्याचा दावा प्रा. रामराव वाघ यांनी केला आहे.
आमदार वीरेश बोरकर यांनी सीबीआयकडे, तर प्रा. वाघ यांनी दक्षता खात्याकडे चौकशीची मागणी केली आहे. ग्रामस्थांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली असून जमीन व्यवहारावरील अंतरिम स्थगिती १ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील सुनावणी त्याच दिवशी होणार आहे.





