गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : गोव्यातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजकीय आणि संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे गोवा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि ‘गोंय राखण अभियान’च्या पुढील वाटचालीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार एल्टन डिकोस्टा, आमदार ॲड. कार्लोस आल्वारिस फेरेरा, एम. के. शेख आणि सुनील कवठणकर उपस्थित होते.
‘गोंय राखण’ अभियानावर विशेष भर
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘गोंय राखण यात्रे’ला मिळालेल्या जनप्रतिसादाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून निर्माण झालेली जनजागृती आणि जनसमर्थन अधिक व्यापक करण्यासाठी आगामी ‘गोंय राखण अभियान’ राबविण्याबाबत चर्चा झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून जनतेशी थेट संवाद साधणे आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणे, यावर विशेष भर देण्यात आला.
जमीन, पर्यावरण आणि अस्मितेच्या मुद्द्यांना प्राधान्य
राज्यातील कथित भ्रष्टाचार, जमीन बळकावण्याचे प्रकार, पर्यावरणाचा ऱ्हास तसेच गोव्याच्या अस्मितेसमोरील आव्हानांबाबत बैठकीत चर्चा झाली. महिला, युवक, आदिवासी समाज आणि समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला. गोव्याची जमीन, पर्यावरण, अस्मिता आणि जनतेच्या संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भाजपविरोधाबरोबरच सकारात्मक पर्याय मांडणार
राज्यातील विद्यमान सरकारच्या कारभाराविरोधात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच गोव्याच्या भविष्यासाठी विधायक आणि सकारात्मक दृष्टिकोन जनतेसमोर मांडण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. आगामी निवडणुकीसाठी जनतेच्या अपेक्षांवर आधारित सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
संघटनात्मक एकजुटीवर भर
आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरांवरील पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने काम करणे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
एकंदरीत, ‘गोंय राखण यात्रे’च्या माध्यमातून सुरू केलेल्या जनसंपर्क मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देत २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भक्कम राजकीय पाया तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.






