जोपर्यंत सरकार टॅक्सी चालकांच्या युक्तिवादाचे सुसंगत खंडन करून आपल्या प्रामाणिकतेचे स्पष्ट प्रमाण देत नाही, तोपर्यंत सरकारच्या हेतूंविषयी संशय घेणे हे रास्तच ठरते.
राज्य सरकारपुढे अनेक गंभीर समस्या आहेत, जसे की रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू, परंतु त्यावर चर्चा करण्याऐवजी अनेक मंत्री केवळ टॅक्सी चालकांनी अॅप स्वीकारावे, यावरच भर देताना दिसतात. खरंतर या अॅपमध्ये बरेच काही दडलेले आहे. टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्याच्या नावाखाली काहींना आर्थिक लाभाची लॉटरी मिळणार आहे. त्यामुळेच काही मंत्री सतत अॅपचा प्रचार करताना दिसतात. अलीकडेच कळंगुटमधील एका टॅक्सी चालकावर मालपे येथे हल्ला झाला आणि त्याची टॅक्सी पळवण्याचा प्रयत्न झाला. चालकाने धाडस दाखवून गाडी वाचवली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचा संदर्भ देत म्हटले की, “अॅप असता तर चालकाला शोधून मदत करता आली असती.” हे विधान टॅक्सी व्यवसायिकांच्या लक्षात राहते, जरी इतरांनी दुर्लक्ष केले तरी. टॅक्सी संघटनेचे नेते योगेश गोवेकर ऊर्फ ‘मोगेंबो’ यांनी सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, घटनेचा आणि अॅपचा काहीही संबंध नाही. सरकार टॅक्सी चालकांना मूर्ख बनवत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की टॅक्सी चालक अशिक्षित आहेत, हा समज चुकीचा आहे. अनेक चालक सुशिक्षित असून, योग्य नोकरी वा व्यवसाय मिळाला नसल्यामुळे टॅक्सी व्यवसायात आले आहेत. काहीजण आमदार-मंत्र्यांपेक्षा अधिक शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना फसवता येईल, असा समज दूर करणे आवश्यक आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार टॅक्सी मीटर सक्ती करण्यात आली असून त्यात ट्रॅकिंग, संकटबटन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. शिवाय, उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी सर्व वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. पण या पट्टीवरून खरोखर ट्रॅकिंग होते का? असा सवाल गोवेकर यांनी उपस्थित केला. साडेचार हजार रुपयांचे मीटर टॅक्सी चालकांना साडेअकरा हजार रुपयांना दिले गेले. वार्षिक नुतनीकरणाची सक्ती आणि आता अॅप वापरण्याचा अट्टाहास, हे सर्व टॅक्सी चालकांच्या आर्थिक शोषणाचे संकेत आहेत.
जेव्हा सामान्य व्यवसायिक अर्थपूर्ण मुद्दा मांडतो, तेव्हा काही लोकांना ते खटकते. त्यांना वाटते की सामान्यांनी फक्त मान खाली ठेवून लाचारी स्वीकारावी. पण हे व्यवसायिक परिस्थितीमुळे सामान्य आहेत, मूर्ख नाहीत. व्यवहारिक ज्ञानामुळेच ते व्यवसायात टिकून आहेत. योगेश गोवेकर, सुदीप ताम्हणकर हे टॅक्सी व्यवसायाशी जोडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची आक्रमकता काहींना खटकेल, पण म्हणून त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जोपर्यंत सरकार टॅक्सी चालकांच्या युक्तिवादाचे सुसंगत खंडन करून आपल्या प्रामाणिकतेचे स्पष्ट प्रमाण देत नाही, तोपर्यंत सरकारच्या हेतूंविषयी शंका घेणे क्रमप्राप्तच ठरेल.





