‘दशावतार’ मनपरिवर्तन घडवणार ?

किमान हा चित्रपट पाहिल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाची संवेदनशीलता जागृत होईल आणि सरकारच्या धोरणांतून पर्यावरणाची होणारी हानी व सामाजिक असंतोष कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

विकास आणि पर्यावरण संतुलन यांचा समतोल राखण्याची आवश्यकता असल्याचा संदेश देणारा दशावतार चित्रपट सध्या बराच गाजतो आहे. या चित्रपटाचे खास प्रदर्शन आयनॉक्समध्ये आयोजित करण्यात आले असून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह संपूर्ण चित्रपट कलाकारांची टीम हजर राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे या चित्रपटाचा लाभ घेणार असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
कोकणात विकासाच्या नावाखाली खाण उद्योगाचा शिरकाव आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय प्रश्न यावर झणझणीत प्रकाश टाकणारा हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. गोव्यातही तशीच परिस्थिती असल्यामुळे या चित्रपटाचे कथानक गोव्याला लागू होणारे आहे. राज्यातील खाण व्यवसायामुळे झालेली पर्यावरणीय हानी, भूरूपांतराच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्रांवर होणारे अतिक्रमण, शेती व बागायतींवर गंडांतर, पर्यटनाचा अतिरेक, किनाऱ्यांची धूप, जल प्रदूषण आदी विषय सध्या गंभीर बनत चालले आहे. विकासाच्या नावाखाली लाखो चौरस मीटर जमिनी लाटल्या जात असून, पायाभूत विकास महत्त्वाचा असला तरी त्यातून होणाऱ्या सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास होणे अत्यावश्यक आहे.
गोवा हे भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असल्यामुळे अशा बदलांचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतो. रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा मुद्दा तर विशेषतः तापलेला आहे. या पार्श्वभूमीवर विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल राखण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या दशावतार चित्रपटाचे विशेष स्क्रीनींग आज आयनॉक्स चित्रपटगृहात आयोजित होत आहे, ही जमेची गोष्ट ठरावी.
या चित्रपटात कोकणातील पारंपरिक लोककला, निसर्गसंवर्धन, आणि ग्रामिण जीवनावर होणाऱ्या बदलांचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर तसेच संपूर्ण चित्रपट टीम या स्क्रीनींगसाठी उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही या स्क्रीनींगला उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाचे कथानक गोव्यातील अनेक ज्वलंत विषयांशी संबंधित असल्यामुळे, या माध्यमातून काही सकारात्मक परिवर्तन घडेल का, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, किमान हा चित्रपट पाहिल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाची संवेदनशीलता जागृत होईल आणि सरकारच्या धोरणांतून पर्यावरणाची होणारी हानी व सामाजिक असंतोष कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
विकास प्रकल्पांच्या नावाखाली लोकदेवतांनाही वगळले गेले आहे. मोपा विमानतळ परिसरातील देव बाराजण आणि पर्वरीतील श्री खाप्रेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण याची उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. या सर्व गोष्टींचा समावेश दशावतार चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे आजचे स्क्रीनींग राज्य सरकारचे डोळे उघडणारे ठरो, अशी प्रार्थना जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सुर्ला गावांत झालेली हेसुमार वृक्षतोड आणि डंप हाताळणीसाठी तेथील खाण कंपनीला मिळालेली परवानगी हा तेवढाच महत्वाचा विषय आहे. लोकांना रोजगार, व्यवसायसंधीचे गाजर पुढे करून पर्यावरणाचा जो नाश खाण व्यवसायाने केला आहे तो पाहता पुढील पिढीसाठी काहीच शिल्लक राहणार नसल्याचेच चित्र सर्वंत्र पसरले आहे. खाणीच्या टाकाऊ मातीने भराव टाकून तयार झालेला डोंगर आणि आता त्याच मातीला मोल प्राप्त झाल्यामुळे तो डोंगर पोखरून पैसे कमावण्याचा सरकारचा हव्यास ही गोष्टच मुळी मानवतेला आणि मानवी जीवनाला क्षुल्लक महत्व दिला जात असल्याचे प्रतिक आहे. या सर्व गोष्टींतून सरकारची तिजोरी भरेल. राजकीय नेत्यांनाही बक्षिसी मिळेल पण या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी भावी पिढीच राहीली नाही तर या सगळ्याचा उपयोग काय.

  • Related Posts

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    ठिकाणी खाजगी मेडिकल कॉलेज स्थापन करण्यापेक्षा एम्ससारखी सरकारी संस्था उभी राहिली तर त्यातून आरोग्याच्या बाबतीत राज्याला मोठा आधार मिळेलच, परंतु त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय आणि स्थानिकांना अनेक रोजगारसंधीही उपलब्ध होतील. गोवा…

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    अपक्ष उमेदवारांचा कितीही भरणा असला तरी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विरोधकांचा फक्त एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभा राहिला, तर भाजपचा आत्मविश्वास कोलमडून पडेल आणि जनतेचा विश्वास ओसंडून वाहील. निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन…

    You Missed

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल