त्यांचे योगदान काय ?

महात्मा गांधींविषयी मला सर्वप्रथम कुतूहल वाटले ते एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात असताना. परीक्षेच्या काळात अभ्यास करून कंटाळा आला होता. तेव्हा विरंगुळा म्हणून, आणि दुसरे काही साधन उपलब्ध नसल्यामुळे, मी गांधींचे आत्मचरित्र वाचले. परीक्षेच्या काळात माझे बाबा माझ्यासोबत राहायला आले होते. त्यांनी त्यांच्या विरंगुळ्यासाठी गांधींचे आत्मचरित्र आणले होते. त्यामुळे मी ते वाचू शकलो.
त्या पहिल्या वाचनाने मला गांधीविषयी फारसे समजले नाही किंवा त्यांच्याविषयी विशेष आदर निर्माण झाला नाही. पण या माणसाविषयी कुतूहल मात्र निर्माण झाले. फोटोत जसा चंपू दिसतो, तसा प्रत्यक्षात नाही, हे प्रकर्षाने जाणवले. हा माणूस अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा होता, हे लक्षात आले. त्याच्यात अशी आकर्षकता नसती, तर अप्पासाहेब पटवर्धन, विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, पां. स. साने, परचुरेशास्त्री, धर्मानंद कोसंबी यांसारखी विद्वान मंडळी त्यांच्याभोवती गोळा झाली असती का?
त्यांचे आत्मचरित्र वाचूनही माझ्या मनात एक प्रश्न शिल्लक होता. या माणसाच्या प्रयत्नाने स्वातंत्र्य मिळाले, हे कितपत तार्किक आहे? तर्क सांगतो की तुम्हाला कोणी हरवले असेल, तर त्यावर उपाय म्हणजे तुम्ही त्याला हरवणे! इंग्रजांनी भारत जिंकला, तो युद्धात राजेरजवाड्यांना हरवून. त्यामुळे ब्रिटिशांना परत घालवायचे असेल, तर त्यांच्याशी युद्ध करून, त्या युद्धात त्यांना हरवूनच ते शक्य आहे.
मी माझा विचार बाबांना सांगितला. त्यावर त्यांनी त्यांच्या आजोबांशी झालेला संवाद मला ऐकवला. बाबांचे आजोबा म्हणजे माझे पणजोबा. त्यांना सगळे ‘ताताजी’ म्हणत. ते व्यवसायाने व्यापारी होते. १९३४ पासून काँग्रेसचे पदाधिकारी होते. फैजपूर काँग्रेसला प्रतिनिधी म्हणून गेले होते.
बाबांनी जेव्हा त्यांना गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले, “मी व्यापारी आहे. जर माझ्या विरोधकाला माझे दुकान बंद करायचे असेल, तर तो काय करेल?”
“तुमचे दुकान चालू द्यायचे नाही,” बाबा म्हणाले.
“माझे दुकान चालू द्यायचे नसेल, तर नक्की काय करावे लागेल?” तातांनी विचारले.
“तुमच्या दुकानात ग्राहकच येऊ नयेत, अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल,” बाबा म्हणाले.
“गांधीजींनी नेमकी हीच कल्पना सुचवली. ब्रिटिश मुळात व्यापारी होते. ईस्ट इंडिया कंपनीने इथे राज्य स्थापन केले ते व्यापारासाठी. त्यांचा मुख्य व्यापार होता कापडाचा. ते आपल्या देशात तयार झालेले कापड इथे विकत होते. गांधींनी कल्पना मांडली की आपण त्यांचे कापड विकत घेणे बंद केले, तर त्यांचे दुकान बंद होईल. पण वस्त्रे तर लागणारच. ती आपली आपण तयार करायची. त्यासाठी गांधींनी अडगळीत गेलेला चरखा परत आणला.”
तू जर संघर्ष म्हणजे समोरासमोरची लढाई असा विचार करत असशील, तर तुला याचे उत्तर मिळणार नाही. गांधींनी एक आयडिया मांडली. ती प्रभावी मंडळींना पटली आणि त्यांनी ती लोकांपर्यंत पोहोचवली. खादी आणि स्वदेशी चळवळीने ब्रिटिशांच्या राज्याच्या मूळ हेतूला हादरा दिला.
(तातांनी आयुष्यभर खादी वापरली होती. त्यांच्या चिरंजीवांनी, माझ्या आजोबांनी बेचाळीसच्या सत्याग्रहात भाग घेऊन जेलची हवा खाल्ली होती. त्यांनीही शेवटपर्यंत खादीचे कपडे वापरले.)
बाबांनी तातांना विचारले, “सशस्त्र क्रांतिकारक, सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना, नेव्हीचे बंड यांची काहीच भूमिका नाही का?”
तातांनी उत्तर दिले, “माझा अर्थ असा नाही की इतरांचे काही योगदान नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी प्रत्येकाचे योगदान आहे. निर्णायक घाव नेव्हीच्या बंडाने घातला. पण त्याआधी जनतेची मानसिक तयारी गांधींच्या आयडियांनी झाली. गांधींची दुसरी आयडिया होती सविनय कायदेभंग. एक लाख ब्रिटिश तेहतीस कोटी भारतीयांवर राज्य कसे करत होते, याचा विचार केलास का? गांधी म्हणायचे, आम्ही त्यांना राज्य करू देतो म्हणून ते राज्य करत आहेत. आम्हाला त्यांची भीती वाटते, हीच त्यांची ताकद आहे. आम्ही घाबरणे बंद केले, कायदे पाळणे बंद केले, तर ते आमच्यावर राज्य कसे चालवतील?”
गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला सामान्य जनतेपर्यंत नेले. जनता मनाने लढ्याचा भाग होऊ लागली. कोणत्याही लढ्याच्या यशासाठी जनतेने मनाने त्या लढ्याला आपला समजणे हे कळीचे असते.
तातांनी बाबांना आणखी एक मुद्दा सांगितला होता. गांधींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान शून्य मानले तरी फरक पडत नाही. त्यांनी आमच्यासारख्या पैशाने आणि जातीने बळकट कुटुंबांना गरीबी, अस्पृश्यता, जात यांसारख्या सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील बनवले. हे त्यांचे अतुलनीय योगदान आहे. अप्पासाहेब पटवर्धन, फाटक गुरुजींसारख्या मंडळींना अस्पृश्यांसाठीच असलेल्या कामांमध्ये भाग घेण्यास प्रेरित करणे हे अफलातून आहे. हृदयपरिवर्तन करून आयुष्यभर असे जगायला प्रेरित करणे सोपे नाही. तो चमत्कार गांधींनी केला.
शाळेत आम्हाला सविनय कायदेभंग, स्वदेशी चळवळ वगैरे शिकवले होते. पण त्यातील मर्म लक्षात आले नव्हते. गांधींनी मध्यमवर्गीयांना गरीबी, अस्पृश्यता, जात यांसारख्या सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील बनवले, हे त्यांचे वेगळेपण होते. आमचे कुटुंब हा त्याचा पुरावा होता.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना विचारले की तुम्ही इतके अरसिक कसे? त्यावर गांधी म्हणाले, “छे छे, मी अरसिक नाही. उलट मला रसिकतेचा ध्यास आहे. आज किलबिलाट करणाऱ्या पक्षांना काल चारा मिळाला आहे. पण ज्या पक्षांना काल चारा मिळाला नाही म्हणून जी गाऊ शकली नाहीत, त्यांचे पोट कसे भरेल जेणेकरून तीदेखील उद्या गाऊ शकतील, या विवंचनेत मी आहे.”
गांधी धार्मिक व्यक्ती होते. गुजरातचे संत नरसी मेहता यांचे शिष्य. ‘वैष्णव जन तो…’ हे त्यांचे धर्मसूत्र. ईशावास्य उपनिषद समजावून घेण्यासाठी त्यांनी विनोबांकडून ‘ईशावास्यवृत्ती’ लिहून घेतली. गीतेवर ‘अनासक्तीयोग’ हे भाष्य लिहिले. रामनामावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. दंगलग्रस्त भागात लोकांना भीतीवर मात करण्यासाठी ते रामनामाचा जप करण्याचा सल्ला देत. ते स्वतःही तेच आचरणात आणत.
स्वातंत्र्याबरोबर भारताला फाळणी भोगावी लागली. त्यात क्रूर रक्तपात झाला. गांधींना फाळणीसाठी जबाबदार धरले गेले. बाबांचे मत होते, पाकिस्तानची मागणी गांधींनी केली की जिनांनी? प्रत्यक्ष कृतीदिनाची हाक देऊन हत्याकांडे कोणी घडवले? गांधींनी की जिनांनी? मग फाळणीचे विरोधक जिनांना शिव्या न देता गांधींना का शिव्या देतात?
गांधी दंगलग्रस्त भागात शांतता पसरवण्यासाठी फिरत होते. ते सांगत होते, तुमच्या शेजारच्या निरपराध लोकांना मारू नका. त्यांच्या आवाहनाला दंगलखोर प्रतिसाद देत होते. गांधींच्या भूमिकेच्या विरोधी मंडळींची भूमिका होती जर पाकिस्तानमध्ये हिंदूंना मारले, तर आम्ही आमच्याजवळच्या मुसलमानांना मारले पाहिजे. मुळात मतभेद या मुद्द्यावर आहे. अर्थात गांधीजी हा मुद्दा केवळ पाकिस्तानच्या मागणीनंतर किंवा मुस्लिमांच्या बाबतीतच मांडत होते, असे नाही. ब्रिटिशांच्या बाबतीतही त्यांचा व्यवहार तसाच होता. सुरुवातीपासूनच ते हीच विचारधारा मांडत होते आणि लोकांनी ती विचारधारा स्वीकारली होती. गांधीजींच्या आवाहनाला दंगलखोर प्रतिसाद देत होते, असे बाबा म्हणाले.
निर्मल कुमार बोस, जे दंगलग्रस्त नौखालीत गांधीजींचे सोबती होते, आणि जेन शार्प, ज्यांच्या गांधींवरील पुस्तकाला थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी प्रस्तावना दिली होती. ही दोन्ही पुस्तके बाबांनी मला वाचायला दिली. आईनस्टाईनसारखा प्रचंड प्रज्ञावान माणूस गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेला होता. तो म्हणत होता, “गांधीसारखा हाडामासाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.”
गांधीजींचा संदर्भ मला नंतर आमच्या सायकीयॅट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये मिळाला. एरिक एरिकसन नावाच्या शास्त्रज्ञाने गांधीजींचे चरित्र लिहिल्याचा तो संदर्भ होता. पुढे एरिक फ्रॉम या मनोविश्लेषकाचे सिद्धांत अभ्यासताना ‘आंतरमुक्ती’चा प्रश्न लक्षात आला. फ्रॉम म्हणतो, मुक्ती दोन प्रकारच्या असतात:
• सरंजामीशाहीपासून बहुजन समाजाची मुक्ती,
• साम्राज्यशाही देशांपासून वसाहतींची मुक्ती,
• भांडवलदार वर्गापासून कामगार वर्गाची मुक्ती, हे ‘बाह्य मुक्ती’चे प्रकार आहेत.
या मुक्ती आवश्यक आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. दुसरी मुक्ती आहे ‘आंतरमुक्ती’:
• मनात दडलेल्या वासनांपासून मुक्ती,
• ‘मी आणि माझे यापुरतेच’ पहाण्याच्या प्रवृत्तीपासून मुक्ती,
• आधुनिक संस्कृतीने चहूबाजूंनी बंबार्डिंग करून पसरवलेल्या चंगळवादी प्रवृत्तीपासून मुक्ती.
गांधीजी हे आधुनिक काळातील एकमेव नेते होते, जे या दोन्ही मुक्तींसाठी प्रयत्न करत होते. फ्रॉमने प्रतिपादन केलेल्या या दोन्ही मुक्तींचा आपल्या जीवनात प्रत्यय आणणे हेच गांधीजींचे खरे योगदान आहे.

  • डॉ. रूपेश पाटकर
  • Related Posts

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    You Missed

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry